मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्य़ात दोनशेपेक्षा अधिक गावे आणि ५० पेक्षा अधिक वस्त्यांना २७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
सर्वाधिक ६८ टँकर अंबड तालुक्यात असून, त्याद्वारे ५४ गावे व ९ वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ८२ खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या. त्याद्वारे ७७ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जालना तालुक्यात १९ गावे, ११ वस्त्यांना २५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बदनापूर तालुक्यात ४८ टँकरद्वारे ३६ गावे, १४ वस्त्यांना, भोकरदन तालुक्यात १४ गावे, २ वस्त्यांना १९ टँकरने, परतूर तालुक्यात १५ टँकरद्वारे १३ गावे, ४ वस्त्यांना, जाफराबाद तालुक्यात १४ टँकरने, तर मंठा तालुक्यात १९ टँकरद्वारे ३७ गावे, १२ वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
टँकरची संख्या वाढत असली, तरी ते भरण्यासाठी पाणीटंचाई असलेल्या गावाजवळ विहिरी वा जलाशय उपलब्ध असणे आवश्यक असते. जिल्ह्य़ातील बहुतेक खासगी विहिरींचे अधिग्रहण टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी केले गेले आहे. बदनापूर तालुक्यातील पाणीटंचाईची जी गावे औरंगाबाद तालुक्यास लागून आहेत, त्यांच्यासाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून टँकर भरण्याचा पर्याय जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहे. गेल्या पावसाळ्यात जिल्ह्य़ात सर्वात कमी पाऊस झालेल्या अंबड तालुक्याच्या ग्रामीण भागात या वर्षी पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे.