रस्ते किंवा रेल्वेपेक्षा जलमार्गे वाहतुकीचा पर्याय जास्त किफायतशीर असल्यामुळे समुद्राबरोबरच देशातील खाडय़ा व नद्यांचाही त्या दृष्टीने वापर करण्यासाठी विकास केला जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केले.

देशात प्रथमच जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्याजयगड येथील बंदरामध्ये ऑस्ट्रेलियाहून दोन लाख टन कोळसा जलमार्गाने आणण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. देशाच्या विकासाच्या दृष्टीने दळणवळणाच्या साधनांचे जाळे निर्माण करण्याचे महत्त्व विशद करून गडकरी म्हणाले की, रस्ते वाहतुकीतील सुधारणेबरोबरच १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहने भंगारात काढण्याची आवश्यकता असून त्यासाठी बंदर परिसरातच पूरक उद्योग सुरू करण्याची योजना आहे. बंदर, रस्ते आणि रेल्वे या दळणवळणाच्या तीन प्रमुख साधनांपैकी जलवाहतूक हा सर्वात किफायतशीर पर्याय असल्यामुळे सुमारे १५ लाख कोटी खर्चाचा सागरमाला हा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचबरोबर देशातील खाडय़ा व नद्यांचाही जलवाहतुकीच्या दृष्टीने विकास करण्याची योजना आहे. जयगड बंदर ते मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी फाटय़ापर्यंत बांधण्यात आलेल्या ४२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, तर जयगड-डिंगणी या नियोजित रेल्वे मार्गाचा कोनशिला समारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, जेएसडब्लू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल, मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन बीव्हीजेके शर्मा इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.