धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर तालुक्याच्या दुर्गम भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी लाखो रुपये खर्चुन वनराई बांधण्यात येत असतात. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यांसाठी यावर्षी ग्रामस्थांची मागणीच आली नाही असा डंका अधिकारी पिटत आहेत. त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशालाच हरताळ फासला गेला असून, यंदा पाणीटंचाईसह जनावरांच्या चाऱ्याचाही तीव्र प्रश्न निर्माण होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यातच वनराई बंधारे बांधावेत असा दंडक असताना यावर्षी नोव्हेंबर महिना संपत आला तरीही हे बंधारे बांधण्याबाबत ग्रामस्थांची मागणीच नाही म्हणून बंधारे बांधण्याबाबत अधिकारी उदासीनता दाखवित असल्याने येथे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहापूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायती अंतर्गत गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच सुमारे ३५ लाख रुपये खर्चुन नदी-नाल्यांवर २०० बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले होते. यंदा मात्र हे बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या प्लॅस्टीकच्या पिशव्यांचा बंदोबस्तही आतापर्यंत करण्यात आला नसल्याने लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी हातावर हात धरून बसले आहेत का असा संतप्त सवाल येथे विचारला जात आहे.
दरम्यान, यावर्षी २०० बंधारे बांधण्याचा इष्टांक असून, त्यासाठी सुमारे ७० लाखाचा निधीची तरतूद केली असल्याचे समजते. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे राबविणाऱ्या अन्य शासकीय यंत्रणाही वनराई बंधारे बांधण्याबाबत सुस्त असल्याचे दिसून येत आहे.