महायुतीतील जागावाटपाचा निर्णय झालेला नसतानाच त्यातील घटक पक्षांनी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी थेट आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असे सांगत अपेक्षित जागा न मिळाल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्यापुढे मोकळा असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी थेट जागा वाटपाच्या मुद्द्याला हात घालत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले.
महायुतीमध्ये अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. तर आम्ही लोकांमध्ये जाऊ. काय घडले हे लोकांना समजावून सांगू. आम्ही मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदासाठी आसुसलेलो नाही. आम्हाला सत्तेची पर्वा नाही. गावातील सामान्य लोकांच्या हक्कांसाठी आम्ही लढतो आहोत, असे ते म्हणाले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत ३८ जागांची यादी दिली असली, तरी चर्चेत १२-१३ जागा मिळाल्या तरी समाधानी राहिलो असतो. मात्र, कोणी चर्चा करायलाच तयार नाही आणि आमच्यामुळे महायुतीच्या जागावाटपात पेच निर्माण झाला आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे, असे सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये सांगितले होते.