आम्ही तर शिवसेनेकडे विधानसभेच्या केवळ १२७ जागाच मागत होतो. ही मागणी त्यांनी जर मान्य केली असती, तर आमच्या १२३ जागा कशा निवडून आल्या असत्या, असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्याने भाजपचा फायदा झाला, हे स्पष्ट केले. मात्र मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक युतीनेच लढविणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे शिवसेनेशी युतीबाबत भाजपचे ‘तळ्यात-मळ्यात’ धोरण दिसत असून कार्यकर्त्यांचा गोंधळ होत आहे.
शिवसेनेशी युती तुटल्याने भाजपला आपली ताकद समजली, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्य परिषदेत केले होते. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी पक्षाची भूमिका मांडली. त्यावेळी आम्ही शिवसेनेला १४७ जागा देऊन भाजपसाठी १२७ जागाच मागत होतो. आमच्या ताकदीचा आम्हाला अंदाज नव्हता. पण आम्ही हिंमत करून युती तोडली आणि आमचे सरकार सत्तेवर आले.
..तर कारवाई
काही सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पाठविलेला निधी काही दिवस वापरला. काहीतरी कारणे काढून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचविली नाही. बुलडाणा बँक व अन्य काही सहकारी बँकांची पाहणी केल्यावर लक्षात आले. त्यातील गैरव्यवहारांची चौकशी करू. जनतेच्या पैशांचा अपहार होऊ देणार नाही. गरज भासल्यास फौजदारी कारवाई करू, असे  फडणवीस यांनी स्पष्ट केले.