पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात शुक्रवारी जलधारांनी चिंब होत गणेशभक्तांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. मांगल्याच्या पावलाने आलेल्या विघ्नहर्त्यांचे घरोघरी, तसेच सार्वजनिक तरुण मंडळांत आगमन झाले असून आगामी दहा दिवस हा उत्साह ओसंडत राहणार आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने श्री मूर्ती मंडळाकडे नेताना गणेशभक्तांची धांदल उडाली. काही काळ या उत्साहावर पाणी पडले. मात्र दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने वातावरणात पुन्हा उत्साह भरण्यास सुरुवात होऊन रात्री उशिरापर्यंत मिरवणुकांचा जल्लोष सुरु होता.
गणेशमूर्ती नेण्यासाठी कुंभारवाडय़ात सकाळपासूनच गर्दी झाली होती. यंदा दूरचित्रवाणीवर सुरु असलेल्या ‘जय मल्हार’ या मालिकेतील खंडोबा देवाची प्रतिकृती असलेली मूर्ती खरेदी करण्याकडे कल होता. विशेषत ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे ते तर प्राधान्याने अशीच मूर्ती आवर्जून घेत होते. विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी माळांसह सजवलेल्या टेबलावर विघ्नहर्त्यां गणरायाची भक्तिभावे विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरातील मानाच्या गणपतींचे आणि विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीचे वाजत गाजत मिरवणुकीने आगमन झाले.
दुपारनंतर सार्वजनिक तरुण मंडळांचे कार्यकत्रे श्री मूर्ती नेण्यासाठी दाखल होत होते. संयुक्त मित्र मंडळाची शिवाजी चौकात २१ फुर्टी मूर्ती  विराजमान झाली आहे. दिलबहार, रविवार पेठ या मंडळांनी धार्मिक परंपरेला अनुसरुन श्री मूर्ती पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणली. श्रींचे आगमन होताना डॉल्बीला फाटा मिळाल्याचे दिसून आले. त्याऐवजी ढोल-ताशे, बेंजो, लेझीम, झांजपथक यांना प्राधान्य मिळाल्याचे दिसून आले. प्रमुख मंडळांच्या मिरवणुका सायंकाळनंतर निघाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरु होत्या. काही मंडळांच्या मूर्तीचे रंगकाम पूर्ण झाले नसल्याने त्यांना उशिराने प्रतिष्ठापना करावी लागली. दुपारी जोरदार पाऊस झाल्याने तरुण मंडळांना त्यांच्या मोठय़ा आकाराच्या श्री मूर्ती घेऊन जाताना कसरत करावी लागली.
दरम्यान, आज बाजारात फुले, फळे खरेदीसाठी गर्दी झाली होती. महालक्ष्मी मंदिर, िशगोसी मार्केट, कावळा नाका रोड येथे फुले खरेदीसाठी गर्दी झाली होती. फुलांबरोबरच श्री गणरायाच्या पूजेसाठी दूर्वा, आघाडा खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होती. सजावटीच्या साहित्याचा बाजारही फुलला होता. उत्सव काळात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून जागोजागी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, इचलकरंजी येथे सोन्याच्या दागिन्यांनी मढविलेली कबनूरच्या मानाची गणेशमूर्ती, चांदीच्या आभूषणांनी सजविलेली यशवंत कॉलनी मंडळाची मूर्ती यासह नटराज चौक, टायगर चौक, जनहित गणेश मंडळ, झेंडा चौक मंडळ, जयभवानी मंडळ, राणाप्रताप मंडळ आदी मंडळांच्या गणेशमूर्ती आकर्षणाच्या केंद्रिबदू बनल्या होत्या.