नववर्षांचे स्वागत दारू नाही, दूध पिऊन करण्याचा नवा फंडा यंदा दापोलीत राबवण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सखी समुपदेशन केंद्राच्या या संकल्पनेला दापोलीकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दरवर्षी सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी बेधुंद मद्यपानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. व्यसनाधीनतेच्या आहारी जात नववर्षांचे स्वागत करण्याची ही अघोषित प्रथा मोडीत काढण्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सखी समुपदेशन केंद्राने रचला. ‘व्यसनाला बदनाम करू या, दारू नको दूध पिऊ या’ असा नारा दिला आहे. त्यानिमित्त संध्याकाळी दापोलीतील केळसकर नाक्यावर एक कप दूध मोफत देण्यात आले. अनिसच्या अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, तसेच डॉ. विद्या दिवाण, संपदा पारकर, नगरसेविका गौरी शिर्के, वैशाली इदाते, रुतिका नलावडे, शिल्पा दरीपकर आदी सखीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
दरम्यान, नववर्षांचे स्वागतासाठी दापोलीतील रिसॉर्ट मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले हेते.
या दोन्ही शहरांना जवळ असलेल्या या पर्यटनस्थळाला थेट दुबईतील फक्त महिला पर्यटकांनी दिलेली पसंती दापोलीसाठी कौतुकाची बाब ठरली.