चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्य़ातील चार खाणींचा समावेश

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने (वेकोलि) आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात असलेल्या देशभरातील ३४ कोळसा खाणी बंद करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये चंद्रपूर व यवतमाळ जिल्हय़ातील ब्रिटिशकालीन हिंदुस्थान लालपेठ, महाकाली, चांदा रैयतवारी व कुंभारकणी या चार कोळसा खाणींचा समावेश आहे. त्यामुळे १५०० कर्मचाऱ्यांवर बदल्यांचे संकट आहे. वेकोलिची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे.

वेकोलिमध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली त्यांना जमिनीचा मोबदला व नोकरी देण्यात येत असल्याचा दावा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने केला जात असला तरी वेकोलिची आजची आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे. वेकोलिमध्ये ५० हजार कर्मचारी कार्यरत असून भविष्यात स्थिती आणखी बिकट होणार आहे. ही वस्तुस्थिती असतांनाच आता वेकोलि आर्थिक संकटामुळे देशभरातील ३४ कोळसा खाणी बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये चंद्रपूर व यवतमाळ या दोन जिल्हय़ामधील ब्रिटीशकालीन महाकाली, हिंदूस्थान लालपेठ, चांदा रैयतवारी व कुंभारकणी या चार खाणींचा समावेश आहे. महाकाली भूमिगत कोळसा खाणीची स्थिती इतकी वाईट आहे की मार्च २०१७ मध्ये उत्पादन खर्च १२ हजार १०७ रुपये प्रति टन कोळसा पडत असून त्याची विक्री चार ते साडेचार हजार रुपये प्रति टन होत आहे. म्हणजेच एका टनामागे वेकोलिला जवळपास साडेसात ते आठ हजार रुपये टन आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. लालपेठ कोळसा खाणीतून ६ हजार २२ रुपये प्रति टन तर चांदा रैयतवारी खाणीतून १० हजार ९७ रुपये प्रति टन उत्पादन घेतले जात आहे. बाजारभाव यापेक्षा कितीतरी कमी आहे. वेकोलिने या तिन्ही कोळसा खाणींमध्ये आधुनिक यंत्रसामुग्रीव्दारे कोळसा काढण्याचे तंत्र विकसित केले नसल्यामुळे वेकोलिवर ही वेळ आली आहे.

यवतमाळ जिल्हय़ातील कुंभारकणी या खाणीचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे भविष्यात या चारही कोळसा खाणीतील १५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, या चारही कोळसा खाणी बंद होऊ देणार नाही, असा इशारा बीएमएसचे रमेश बल्लेवार यांनी दिलेला आहे.  वेकोलिच्या कोळसा खाणी कितीही आर्थिक तोटय़ात असल्या तरी आम्ही कर्मचाऱ्यांना खाणी बंद झाल्यानंतरही इतर खाणीत बदली करून त्यांच्याकडून काम करवून घेऊ, असे वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे महाप्रबंधक आभासचंद्र सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

शेतकऱ्यांच्या जमिनीला जादा भाव देण्याचा व सदस्याला नोकरी देण्याचा कायदा केंद्रातील काँंग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाल्याची माहिती वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे महाप्रबंधक आभासचंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मुळेच शेतकऱ्यांना जमिनीचे जादा भाव व नोकरी मिळाल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा कायदा काँग्रेस आघाडी सरकारनेच केला, असेही ते म्हणाले.