विदर्भासह मध्य भारतात आपले जाळे पसरवणाऱ्या नक्षलवाद्यांनी आता महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगररांगांसह पश्चिम घाटाच्या परिसराला आपले कार्यक्षेत्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे. भाकप माओवादी या पक्षाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने सहकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात कोकण, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या भागांतील पश्चिम घाटांतून सरकारविरोधी कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
माओच्या विचारसरणीचा स्वीकार करीत सशस्त्र हिंसक चळवळ चालवणारे देशभरातील विविध गट २००४ मध्ये एकत्र आले व त्यांनी भाकप माओवादी हा पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या दशकपूर्तीच्यानिमित्ताने आजवरच्या कामाचा आढावा घेतानाच नक्षलवाद्यांनी नवे कार्यक्षेत्र  व त्यातील युद्धाविषयीची सविस्तर चर्चा या पत्रातून केली आहे. सह्य़ाद्री पर्वतांच्या रांगांमध्ये चळवळीचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून आता तेथील जनतेच्या हितासाठी लढण्याची वेळ आली आहे, असे या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या चार राज्यांच्या अगदी मध्यभागी असलेला मदुमलाईचा पहाडी परिसर हे चळवळीचे मुख्य प्रभावक्षेत्र राहणार आहे. या चळवळीने पश्चिम घाटात नवे प्रभावक्षेत्र विकसित केले तर आजवर केवळ मध्यभारतातील जंगलावर लक्ष केंद्रित केलेल्या सुरक्षादारांनासुद्धा नव्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.  
नक्षलवाद्यांनी पाठवलेल्या या पत्राला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. शहरी भागात काम करण्यात तरबेज असलेल्या अरुण भेलकेला नुकतीच पुण्याजवळील मावळ परिसरात अटक करण्यात आली. हा भाग सह्य़ाद्रीच्या पायथ्याशी येतो. नक्षलवाद्यांनी आखलेला खुल्या युद्धाचा बेत तडीस नेण्यासाठी पहिल्या टप्प्यात जनसमर्थनाची गरज भासते. नेमके हेच काम भेलकेकडून करवून घेण्यात येत होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.  
‘ग्रीन हंट’मुळे हतबल?
मध्य भारतात चळवळीच्या सक्रियतेमुळे हादरलेल्या केंद्र सरकारने लाखो जवानांना एकत्र करीत ‘ग्रीनहंट’ ही मोहीम सुरू केली. या मोहिमेमुळे चळवळीला काही प्रमाणात हादरा बसला, अशी कबुली नक्षलवाद्यांनी या पत्रात दिली आहे.  धक्क्यातून सावरत जोमाने सक्रिय होण्याचा चळवळीचा मानस असून आता दहा वर्षांनंतर कार्यक्षेत्राचा बिंदू पश्चिम घाटाकडे वळवणे आता आवश्यक झाले आहे, असेही या पत्रात नमूद केले आहे.
*गेल्या दहा वर्षांत सुरक्षा यंत्रणांविरुद्धच्या युद्धात २,३३२ नक्षलवादी मारले गेले.
*लोकसभा निवडणुकीच्या काळात ६३ जवानांना ठार करण्यात चळवळीला यश आले.
*चळवळीत महिलांचा सहभाग ४० टक्क्यांवर गेला आहे, असे केंद्रीय समितीने या पत्रात म्हटले आहे.
*माओच्या नावावर सशस्त्र हिंसक चळवळ चालवणारे देशभरातील विविध नक्षली गट २००४ मध्ये एकत्र आले व त्यांनी भाकप माओवादी हा पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या दशकपूर्तीच्यानिमित्ताने जारी पत्रात नवे कार्यक्षेत्र  नमूद आहे.
*कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व कोकण या भागात पसरलेल्या सह्य़ाद्रीच्या रांगांमध्ये पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून आता लढण्याची वेळ आली आहे, असे या पत्रात स्पष्ट नमूद आहे.
*चार राज्यांच्या अगदी मध्यभागी असलेला मदुमलाईचा पहाडी परिसर हे चळवळीचे मुख्य प्रभावक्षेत्र राहणार आहे.