मोबाइलचे बिल भरता, मग वीजबिल का नाही, या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी समाचार घेतला. अजित पवार व खडसे यांच्यात काय ‘फरक’ असे विचारताना ‘मेहनतीने सरकार मिळाले आहे. ते नीट चालवावे अन्यथा राष्ट्रवादीपेक्षाही भाजपची अवस्था वाईट होईल,’ असा चिमटा लोहा येथे बोलताना घेतला. नांदेड, परभणी जिल्ह्य़ांतील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधत दुष्काळी भागाची पाहणी केली.
सलग तिसऱ्या वर्षी मराठवाडय़ात दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांच्या सुख-दु:खात शिवसेना नेहमीच मराठवाडय़ाच्या सोबत राहील, असे सांगत विधिमंडळ अधिवेशनात दुष्काळावरून शिवसेनेचे नेते सरकारला जाब विचारतील, असे ठाकरे म्हणाले. दुष्काळासंदर्भात विरोधी पक्षनेते एकनाथ िशदे व प्रताप पाटील चिखलीकर सरकारकडे बघतील, असे सांगत कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना त्यांनी आर्थिक मदत दिली. दुष्काळी दौऱ्यात भाजपवरही जोरदार टीका केली. विशेषत: एकनाथ खडसेंना त्यांनी चिमटा घेतला. मोबाइल बिल भरता, मग वीजबिल का भरत नाही, असे वक्तव्य खडसे यांनी केले होते. भाजप व आघाडीचे सरकार यात फरक असायला हवा. तो दिसू द्या, असे सांगत मेहनतीने सरकार मिळाले आहे. ते नीट चालवावे, असा सल्लाही त्यांनी दिला. नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथील मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. दौऱ्यात त्यांच्यासमवेत ६३ आमदार येतील, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ४०-४२ आमदारांनी हजेरी लावल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठवाडय़ात दुष्काळाची स्थिती भयावह आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. शिवसेना राजकारणविरहित मराठवाडय़ाच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.
‘‘युती’ची करमणूक बंद करा’
मराठवाडय़ात दुष्काळी दौऱ्यानिमित्ताने आलेल्या उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आडून आडून टीका केली. उस्मानाबादेत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपकडून युतीच्या नावाखाली जनतेची फसवणूक होत आहे. युतीच्या अनुषंगाने सुरू असणारी करमणूक बंद करा, असे सांगत शिवसेना विरोधी बाकावर बसण्याच्या निर्णयावर ठाम असल्याच्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. लातूरमध्येही याच आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना राज्यभर आढावा घेत आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या हिताशी काळजी असेल, तर १५ डिसेंबरची वाट न पाहता केंद्राच्या मदतीने तत्काळ मदत जाहीर करावी, असेही कदम म्हणाले.