सध्याच्या घडीला सोशल मीडियाचे जाळे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपमुळे संवादाला गती आली.  त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅप प्रणालीचा वापर करून नांदेड पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. सभोवतालच्या परिसरात अवैध धंदे सुरु असतील तर, त्याचा फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅप करा, तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी मोबाईल क्रमांकही नागरिकांना शेअर केला आहे.

जिल्ह्यात बेकायदेशीर दारू दुकाने, जुगार, मटका, सरकारी धान्य दुकानातील काळा बाजार, क्रिकेटचा सट्टा,जनावरांची तस्करी, वाळू तस्करी असे अनेक अवैध प्रकार सुरु आहेत. त्याविरोधात पोलिसांनी मोहीम राबवली असून या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नागरिक अवैध व्यवसायांसंदर्भात पोलीस अधीक्षक यांच्या ९४२३५९७३३३ आणि या मोहिमेचे पथक प्रमुख चिंचोलकर यांच्या ९०११९२७७९६ या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून माहिती देऊ शकतात. नागरिकांकडून मिळालेल्या व्हॉट्सअॅप तक्रारीनंतर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय माहिती देणाऱ्याचे नावही गुप्त ठेवण्यात येणार आहे. नांदेड पोलीसांनी सुरु केलेल्या या मोहिमेचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.