बंदुकांच्या सावलीत हळूवार फुलत गेलेल्या एका प्रेमकथेला वरिष्ठांनी मान्यता देण्यास नकार दिल्यामुळे चळवळ सोडून पळून आलेल्या नक्षलवादी प्रेमी युगुलाला विवाहाच्या बंधनात बांधण्याचा प्रयोग गडचिरोली पोलिसांनी अहेरी येथे यशस्वी करून दाखवला. आम्ही केवळ गोळय़ा चालवत नाही तर हळूवार मनात आकार घेणाऱ्या प्रेम भावनांचीही दखल घेतो हे पोलिसांनी नक्षलवाद्यांना दाखवून दिले.
 एटापल्ली तालुक्यातील नैनगुंडाच्या संतोष केड्डीकेला हा २१ वर्षांचा असताना चळवळीत दाखल झाला. कामगिरीच्या बळावर त्याला लवकर बढती मिळत गेली. पाच वर्षांपूर्वी तो प्लॅटून क्रमांक ३ चा उपकमांडर व नंतर क्रमांक ७ चा कमांडर झाला. दक्षिण गडचिरोलीच्या जंगलात फिरणाऱ्या संतोषची नेहमी पेरमिली दलम सोबत भेट व्हायची. या दलमची साधी सदस्य असलेली निर्मला उर्फ शांती कुडियामीशी संतोषची ओळख झाली. भामरागड तालुक्यातील येचली बासागुडाची राहणारी निर्मला चार वर्षांपूर्वी चळवळीत दाखल झाली होती. दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. त्यामुळे या प्रेमाची चर्चा चळवळीत सुरू झाली. वरिष्ठांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी या दोघांच्या भेटी बंद असे फर्मान जारी केले.
माओच्या विचारात व क्रांतीच्या लढय़ात प्रेमाला जागा नाही, असे या दोघांना स्पष्टपणे सांगण्यात आले. भेटीवर बंदी आणल्यामुळे संतोष व निर्मला आणखी अस्वस्थ झाले. या दोघांनी लग्नबंधनात अडकण्याची इच्छा वरिष्ठांकडे व्यक्त केली. त्यालाही नकार मिळाला. अखेर या दोघांनी चळवळीतून पळून जाण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांपूर्वी दोघेही बाहेर पडले व आपापल्या घरी जाऊन राहू लागले. नक्षलवाद्यांची नजर चुकविण्यासाठी लपून राहण्याचा निर्णय या युगुलाने घेतला. या पलायनाची माहिती वरिष्ठांना कळताच जहाल नक्षलवादी रजिताला हे प्रकरण हाताळण्यासाठी देण्यात आले. रजिताने संतोषचा शोध घेतला नाही पण निर्मलाच्या घरी जाऊन तिला मारहाण केली व जबरीने तिला चळवळीत घेऊन गेली. निर्मलाच्या प्रेमाची ताकद एवढी की आठ दिवसांनी ती पुन्हा पळून आली. दोनवेळा तिने प्रयत्न केला. या सर्व घडामोडींवर संतोष बारीक लक्ष ठेवून होता पण जिवाच्या भितीमुळे त्याला काही करता येत नव्हते. अखेर या दोघांनी शेजारच्या आंध्रात पळून जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी कापूस वेचणीची कामे केली. जवळ थोडे पैसे जमल्यावर हे प्रेमीयुगुल परत आले. अचानक एक दिवस संतोष पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यावेळी निर्मलाचा भाऊही त्याच्या सोबत होता. चौकशीच्या दरम्यान संतोषची प्रेमकथा ऐकून वरिष्ठ अधिकारीही चकीत झाले.
या प्रकरणाची माहिती कळल्यानंतर गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम व पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. या दोघांना आत्मसमर्पण योजनेचा लाभ देण्याचे ठरविण्यात आले. अहेरीतील मानव दयाल सभागृहात अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल श्रीरामे, एसडीपीओ सुहास बावचे यांच्या उपस्थितीत अगदी धुमधडाक्यात या दोघांचे सोमवारी शुभमंगल झाले.
पोलिसांनी या दोघांची लग्नपत्रिका तयार केली होती. शेकडो लोक या लग्नाला हजर होते. अधिकारी तसेच सी-६० च्या जवानांनी पदरचे पैसे खर्च करून या लग्नाचा खर्च केला. लग्नासाठी संतोष व निर्मलाच्या नातेवाईकांना खास वाहने पाठवून आणण्यात आले होते. सी-६० चे जवान आपल्याच नातेवाईकाचे लग्न आहे अशा थाटात वरातीत नाचत होते. पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या युध्दात केवळ बंदुकच नाही तर भावनेलाही महत्त्व आहे, हे दाखवून देत पोलिसांनी नक्षलवाद्यांवर मात केली.