* दोन महिन्यांत सात टीएमसी पाणी गायब
* दोन लाख हेक्टर शेती धोक्यात
सोलापूर जिल्ह्य़ाची भाग्यदायिनी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणी वितरण नियोजनबाह्य़ पद्धतीने होत असून, त्याबद्दल प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी गाजत असताना व एकूणच या धरणातील पाण्याचा मुद्दा संवेदनशील बनला असताना, सध्या या धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत या धरणातील तब्बल ७ टीएमसी पाण्याचा वापर कसा आणि कोठे झाला, याचा मेळ लागत नाही.
जिल्ह्य़ातील बहुतांश बागायती क्षेत्र उजनी धरणाच्या पाण्यावरच अवलंबून असून सध्या या धरणातील पाणीसाठा जवळपास तळापर्यंत गेल्याने धरणाच्या माध्यमातून ओलिताखाली सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले आहे. गेल्या वर्षभरात उजनी धरणातून तब्बल ५२ टीएमसी गायब झाल्याचा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा आक्षेप आहे. कायदा धाब्यावर बसवून नियोजनबाह्य़ पद्धतीने धरणातील पाणी उचलल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मोहिते-पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार अजित पवार यांनी चौकशी करण्याचे मान्य केले. परंतु चौकशीच्या हालचाली दिसत नाहीत.
विसर्ग नसताना पाणी पळाले!
या धरणातील पाण्याची परिस्थिती विचारात घेतली असता १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत धरणातून तब्बल १३.६७ टक्के एवढा पाणीसाठा कमी झाला आहे. गेल्या दोन महिन्यांतील माहिती तपासली असता यात १९२ दलघमी म्हणजे तब्बल ७ टीएमसी पाणी कमी झाल्याचे लक्षात येते.
 पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी २५०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. (प्रत्यक्षात हे पाणी पंढरपूरच्या चंद्रभागेत पोहोचले नाही.) हा अपवाद वगळता धरणातून कोणताही विसर्ग नसताना एवढे पाणी गायब झाले कसे, असा सवाल शेतकरीवर्गातून उपस्थित होत आहे.
बळी तो पाणी पळवी!
या धरणातील पाण्याचे वाटप नियोजनबाह्य़ पद्धतीने झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीच्या काही लोकप्रतिनिधींनी ‘बळी तो कान पिळी’ या पद्धतीने उजनी धरणातील पाणी गायब केल्याच्या तक्रारी आहेत.
उजनी धरणात आजघडीला जेमतेम एक टक्का म्हणजे १५ दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे. हे पाणी भीमा व सीना नदीत उजव्या व डाव्या कालव्याद्वारे सोडले गेले असते तर कोटय़वधींचे होणारे शेतीचे नुकसान टळले असते, असे सांगितले जाते.