चेन स्नॅचिंग, छेडखानी आदी महिलांविषयक गुन्हे घडत असतानाच्या पाश्र्वभूमीवर मोठा गाजावाज करून दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला महिला चार्ली पथकाचा चांगला उपक्रम नागपुरात रखडला असल्याचे चित्र आहे.  नागपुरात २१ मार्च २०१३ रोजी जाँबाज महिला चार्ली पथक सुरू करण्यात आले होते. नागपुरात २३ पोलीस ठाणे असून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरासरी चार महिला चार्ली पथके गस्त घालतील. एका पथकात दोन महिला शिपाई राहतील. पुरुष चार्ली पथकाप्रमाणेच एका दुचाकीवर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत हे महिला चार्ली पथक ठिकठिकाणी गस्त घालेल. हेल्मेट, काठी, तसेच एक वॉकीटॉकी त्यांच्याजवळ राहील. शहरातील प्रत्येक गल्ली-बोळात शिरून या महिला बेधडक गस्त घालतील. याशिवाय, शाळा-महाविद्यालये, बँका, विविध कार्यालये, थिएटर तसेच बाजारपेठा, बस थांबे आदी गर्दीच्या ठिकाणी त्या जातील. महिला-मुलींशी त्या संवाद साधतील, त्यांची विचारपूस करतील. गस्त घालत असताना गुन्हेगारांवरही त्यांची नजर राहील. प्रशिक्षण घेत असतानाच त्यांना अत्याधुनिक शस्त्रे चालविण्याचे, तसेच ज्युदो-कराटे, काठी चालविणे आदी प्रशिक्षण देण्यात येतेच. याशिवाय, नोकरीत लागल्यानंतरही त्यांना खास कमांडो प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण त्यांना निरंतर दिले जाणार आहे.
महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांना संवाद कौशल्यासंबंधी विशेष धडे देण्यात आले आहेत. आता प्रत्यक्ष महिला शिपाई संवाद साधणार असल्याने महिलाही त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधतील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.  
एरवी केवळ बंदोबस्तात किंवा पोलीस ठाण्यातच महिला पोलीस दिसतात. रस्त्यावर केवळ पुरुष पोलीस गस्त घालतात. चेन स्नॅचिंग, पर्स पळविणे, विनयभंग, अत्याचार आदी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. रोज किमान एक चेन स्नॅचिंगची एक घटना घडतेच. त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस सक्रिय असले तरी हवे तेवढे यश आलेले नाही. त्यामुळे महिला पोलिसांची गस्त सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तेव्हा घेतला.
 महिलांमध्ये पसरलेले असुरक्षिततेचे वातावरण पाहता त्यांच्यात हिंमत निर्माण करण्यासाठी, तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हे सहाय्यभूत ठरणार असल्याने नागपुरात असा प्रयोग पहिल्यांदाच केला गेला.
स्पेशल महिला चार्ली पथक उत्साहात सुरू झाले खरे. मात्र, आताशा असे पथक दिसत नसल्याचा अनेक महिला-तरुणींचा अनुभव आहे. महाल व सक्करदरा बाजार, इतवारी, सीताबर्डी, वेस्ट हायकोर्ट रोड आदी बाजारपेठांमध्ये दुपारी अथवा सायंकाळी महिला पोलीस शिपाई फिरताना दिसतात. एवढा अपवाद सोडला तर गस्त घालताना महिला पोलीस दिसत नाही, असे अनेक महिलांचे मत आहे.
विशेषत: चेन स्नॅचिंग, विनयभंग, छेडखानी आदी महिलांसंदर्भातील गुन्ह्य़ांमध्ये वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत महिला पोलिसांनी दिवसा का होईना निरंतर गस्त घालण्याची गरज आहे, पण असे होत नाही. त्या पोलीस ठाण्यात मात्र दिसतात. संगणक अथवा टपाल पोहोचविण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात असल्याचे लपून राहिलेले नाही. प्रत्येक पोलीस ठाण्यात किमान दहा, तर शहरात सुमारे ६०० महिला पोलीस शिपाई आहेत. याशिवाय, प्रत्येक पोलीस ठाण्यात सरासरी दोन महिला उपनिरीक्षक आहेत. प्रत्येक पोलीस भरतीत चाळीस टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. असे असतानाही स्पेशल महिला चार्ली पथकाचा चांगला उपक्रम रखडला असल्याचे चित्र आहे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ व्रत पोलीस विसरलेले नाहीत. याबरोबरच बंदोबस्तही पोलिसांना करावा लागतो. बंदोबस्तात असल्याने गस्त घातली जात नसेल. मात्र, स्पेशल चार्ली पथक अद्यापही कार्यान्वित आहे. महिला-तरुणांची गर्दी असते अशा शाळा, महाविद्यालये, मॉल्स, बाजार आदी ठिकाणी महिला पोलिसांचे विशेषत्वाने लक्ष असल्याचे गणेशपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर नंदनवार यांनी स्पष्ट केले.