अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पडलेल्या कथित जलसिंचन घोटाळ्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेली श्वेतपत्रिका त्यांनी स्वत: मात्र  वाचलीच नाही, असा दावा अजितदादांनी शुक्रवारी पिंपरीत केला. त्यामुळे त्यावर कोणतेही भाष्य न करण्याची भूमिका त्यांनी घेतली. १२ डिसेंबरला नवीन बारामती जिल्हा होणार असल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली तसेच ठाण्याचे विभाजन होण्याची गरज व शक्यताही व्यक्त केली. शहर राष्ट्रवादी काँग्रेस व पिंपरी पालिकेच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी पवार शुक्रवारी दिवसभर पिंपरी-चिंचवडला होते. तेव्हा कार्यकर्त्यांसमोर ते म्हणाले, सिंचन घोटाळ्यावरून आपल्यावर खोटेनाटे आरोप झाले आहेत. मात्र, ‘दूध का दूध’ व ‘पाणी का पाणी’ होण्याची गरज आहे. सध्या आपण बाहेरच आहोत. आज पिंपरी व नंतर नाशिक, सातारा, पुण्याला जाणार आहे. पुढे नागपूरचे अधिवेशन आहे. शासनाने काढलेल्या श्वेतपत्रिकेत काय आहे, ते आपल्याला माहिती नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी माध्यमांवर पुन्हा जोरदार आगपाखड केली. वरिष्ठ नेत्यांशी आपले मतभेद नाहीत. मुख्यमंत्री व आपल्यात बेबनाव असल्याचे चित्रही निर्माण केले जाते. मात्र, कुणीही गैरसमज करून घेऊ नये. पाण्यावरून वाद होता कामा नये. पाणी सर्वाचेच असून त्यावर कोणाची मक्तेदारी नाही. येत्या ‘१२/१२/१२’ ला नवीन बारामती जिल्हा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. वास्तविक तसे काहीही नाही. मलाही त्याविषयी काही माहिती नाही. एखादा नवीन जिल्हा होणारच असेल तर सर्वाधिक मोठे क्षेत्र असलेल्या ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन होईल. सध्या तेथे चार खासदार व २४ आमदार आहेत. त्यामुळे ठाण्याला नवीन जिल्हा होण्याची गरज आहे. नव्या जिल्ह्य़ासाठी ६०० कोटींपर्यंत खर्च होतो. सध्याच्या दुष्काळातून आपण बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे बारामतीबाबत कोणताही विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.