जम्मू-काश्मिर ही काही अल्पसंख्यांकांची जहागिरी नाही. हिंदु वसाहतींमध्ये अल्पसंख्यांक वास्तव्य करु शकतात. तर मग जम्मू-काश्मिरमध्ये हिंदुंच्या वसाहती का नकोत, असा सवाल भाजपचे वादग्रस्त खासदार योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धर्मनिरपेक्ष राजकारणाने देशाचे मोठे नुकसान केल्याचा आरोपही त्यांनी केला.
अल्पसंख्याकांनी हिंदुंना वेगवेगळ्या पंथात, जातीत विभागून फूट पाडण्याचे काम केले. त्यानंतर धर्मातराद्वारे अल्पसंख्यांकांची संख्या पध्दतशीरपणे वाढविण्यात आली. ही संख्या वाढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या हिंदुंना हद्दपार करण्यात आले. जम्मू-काश्मिरबरोबर ईशान्येकडील राज्यात हे घडल्याचा आरोपही त्यांनी केला. मुस्लिमबहुल प्रदेशातुन हिंदुंना हाकलून दिले जात असल्याच्या मुद्यावर धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय नेते व पक्ष काही बोलत नाही. हिंदूुत्ववादी संघटनांनी घरवापसी अभियान सुरू केल्यावर मात्र संबंधितांकडून एकच गहजब करण्यात आला. धर्मनिरपेक्ष पक्षांनी मताच्या राजकारणासाठी ही कार्यशैली अवलंबली. जम्मू-काश्मिरमध्ये हिंदुच्या वसाहती उभारण्याचा निर्णय अल्पसंख्याकांना विचारून घेणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अल्पसंख्यांकावर विश्वास ठेवता येणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात िहंदुत्ववादी विचारप्रणाली रुजली असती तर देशाची फाळणीही झाली नसती. विविध गटातटात विभागुन हिंदुंना एकटे पाडण्याचा डाव आखला गेला. यामुळे ही स्थिती लक्षात घेऊन हिंदुंनी संघटीत होऊन हिंदुत्ववादी विचारप्रणाली स्वीकारली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.