कराड दक्षिण मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर मावळते मुख्यमंत्री येथे कोटय़वधीची विकासकामे केल्याचा आव आणत आहेत. स्वत:ला स्वच्छ चारित्र्याचे, पारदर्शक समजतात. मग सिंचन घोटाळय़ाचा पुरावा असूनही सत्तेवर का राहिलात? राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, मग त्यांच्याबरोबरच्या सत्तेला लाथ मारून घरी का बसला नाही? अशी जळजळीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.
भाजप महायुतीचे उमदेवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी विंग (ता. कराड) येथे ते बोलत होते. या वेळी डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील, जगदीश जगताप, कराडचे माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील मलकापूरच्या नगराध्यक्ष शारदा खिलारे, डॉ. अतुल भोसले उपस्थित होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, की शेतक-यांना न्याय न देऊ शकणारे पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या आशीर्वादावर सत्तेत आहेत. आता त्यांचा कार्यकाल संपला असून, त्यांना दिलेल्या सेवेची मुदत संपली आहे. कराडात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार असून, पृथ्वीराज चव्हाणांना पराभूत करणा-या डॉ. अतुल भोसले यांचा थेट मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे भाकीत त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, की पृथ्वीराज चव्हाणांचे कार्यकर्ते भाडोत्री असून, त्यांच्यात अशी सभा घेण्याची हिंमत नाही, माझे मावळे ऊन, वारा, पाऊस व अंधाराची तमा न बाळगता कार्यरत आहेत. त्यांच्यात निष्ठा असल्याने विजयाची खात्री वाटते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की पक्षाच्या दबावामुळेच मावळत्या मुख्यमंत्र्यांना कराडात निवडणूक लढवावी लागत आहे. त्यांना मतदारसंघातील गावेही माहीत नाहीत. त्यांची राजकीय कारकीर्द संपली असून, विद्यमान आमदारांचे वय ८० पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा शेवट निश्चित झाला आहे. सर्वात पुढे महाराष्ट्र माझा, असा जाहिरातींच्या माध्यमातून डंका टिपला जातो. परंतु सर्वात जास्त शेतक-यांची आत्महत्या महाराष्ट्रात झाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.