घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात रागाच्या भरात पत्नीला फरशीवर आपटून, तिच्या डोक्यात वीट मारून व गळा दाबून खून केल्याप्रकरणी पती महेश बाबर यास पोलिसांनी अटक केली. रामवाडीजवळील भैरू वस्तीत पहाटे हा प्रकार घडला.
स्वाती महेश बाबर (२२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती महेश (२५) यास सलगर वस्ती पोलिसांनी अटक केली असून त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
मृत स्वाती व संशयित आरोपी महेश यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. त्या अगोदर चार वर्षांपूर्वी मृत स्वाती हिचा पहिला विवाह झाला होता. परंतु पतीने नांदविण्यास नकार दिल्यामुळे ती माहेरी राहत असताना तिचा संबंध महेश याच्याशी आला व त्यातून दोघांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. त्यांना सव्वा वर्षांची मुलगी व तीन महिन्यांचा मुलगा आहे. परंतु पहाटे स्वाती ही आपल्या घरात बेशुद्धावस्थेत व रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून घरमालकाने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती कळविली. त्यानुसार पोलिसांनी धाव घेऊन महेश यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता घरगुती भांडणातून रागाच्या भरात महेश याने स्वाती हिचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
दागिने लुटण्याचे प्रकार
विजापूर रस्त्यावर कंबर (संभाजी) तलावाजवळ एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र चोरटय़ांनी हिसका मारून चोरून नेले. तर पुणे रस्त्याजवळ अवंती नगरानजीकही एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र चोरटय़ांनी हिसका मारून चोरून नेल्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटनांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. स्वाती शशिकांत इंगळे (रा. आचार्य दोंदेनगर, जुळे सोलापूर) या पतीसह मोटारसायकलवर बसून शहराकडे येत असताना कंबर तलावाजवळ पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील पाठीमागील चोरटय़ाने हिसका मारून स्वाती यांच्या गळ्यातील ३५ हजारांचे सोन्याचे मणिमंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. सदर बझार पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे. पुणे रस्त्याजवळ अवंतीनगरीनजीक राजश्री रविकिरण दोशी (४२, रा. अवंतीनगरी) या रस्त्यावरून पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरटय़ांपैकी पाठीमागील चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून पोबारा केला.
क्षुल्लक कारणावरून शिक्षकाचा चाकूने भोसकून खून
धार्मिकस्थळात स्वच्छता करताना पाणी अंगावर उडाल्याने झालेल्या भांडणातून एका शिक्षकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी कर्नाटकातील एका तरुणाचा सदर बझार पोलीस शोध घेत आहेत. रिझवान महिबूब नालबंद (वय २४, रा. शनिवार पेठ, सोलापूर) असे खून झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
मृत रिझवान नालबंद हे शनिवार पेठेतील आपल्या घराजवळील एका दर्गाहमध्ये पाणी मारून स्वच्छता करीत होते. तेव्हा दर्गाहमध्ये आलेल्या साकलेन साबरी (रा. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक) याच्या अंगावर पाणी उडाले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने रिझवान नालबंद यांच्याशी भांडण काढले. परंतु दुसऱ्या दिवशी साकलेन याने नालबंद यांना कालचे भांडण आपापसात मिटवू या म्हणून हरिभाई देवकरण प्रशालेजवळ बोलावून घेतले. त्यानुसार नालबंद हे तेथे गेले असता साकलेन याने भांडण मिटविण्याऐवजी पुन्हा भांडण काढले आणि पॅन्टीच्या खिशातील चाकू काढून नालबंद यांच्या पोटावर वार केले. नंतर तो पळून गेला. यात गंभीर जखमी झाल्याने नालबंद यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता अखेर त्यांचा मृत्यू झाला. नालबंद हे राष्ट्रवादीचे माजी महापौर खाजादाऊद नालबंद यांचे पुतणे होत. सदर बझार पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली असून फरारी झालेल्या साकलेन साबरी याचा शोध घेतला जात आहे.