निसर्ग संवर्धनासाठी असलेल्या ‘आययूसीएन’ (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर)या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या लाल यादीत अत्यंत संकटग्रस्त म्हणून नोंद झालेल्या रानपिंगळा (फॉरेस्ट आऊलेट) चंद्रपूर जिल्ह्य़ातील आगरझरीच्या जंगलात दिसून आल्याने पक्षी अभ्यासकांना एक दिलासा मिळाला आहे. मध्य भारतातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील सातपुडा पर्वतरांगांमध्येच आतापर्यंत या पक्ष्याचे वास्तव्य होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये तानसा अभयारण्यात तो दिसून आल्याने उत्तरेकडील पश्चिम घाटाच्या कोरडय़ा प्रदेशात आणि तत्सम प्रदेशात त्याच्या अस्तित्त्वाची
नोंद झाली.
११४ वर्षांच्या इतिहासात रानपिंगळयाची धोक्याच्या श्रेणीत नोंद होती. १९९७ मध्ये महाराष्ट्रातील नंदूरबार mh05जिल्ह्य़ातील सातपुडा पर्वतरांगांतील शहाद्याजवळच्या तोरणमाळच्या संरक्षित जंगलात तो दिसला. त्यानंतर गुजरातमधील पिपलाडपासूनच्या पर्वतरांगांत आणि महाराष्ट्रातील तोरणमाळ ते यावल आणि मेळघाट तसेच मध्य प्रदेशातील कालीभीत येथे त्याचे अस्तित्त्व आढळले.
छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागातही त्याच्या काही प्रजाती आढळल्या. मात्र, तापी नदीच्या दक्षिण भागात त्याचे अस्तित्त्व दिसून आले नाही. अत्यंत संकटग्रस्त म्हणून नोंद असलेल्या रानपिंगळयाला राज्यपक्षी म्हणून मान्यता देण्याचा घाट तीन ते चार वर्षांपूर्वी बीएनएचएसने (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) घातला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी रानपिंगळयावरील संशोधनावरूनही वादंग निर्माण झाले होते.
आगरझरीच्या जंगला परिसरात उंच झाडावर एक खूप लहान घुबड बसलेले वन्यजीव निरीक्षक दिनेश खाटे, अभिषेक येरगुडे, वनदीप रोडे यांना निरीक्षणादरम्यान दिसून आले. त्याचे छायाचित्र घेतल्यानंतर हा दुर्मीळ रानपिंगळा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

१८७३ मध्ये शोध
१८७३ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी ब्लेविट यांनी पूर्व मध्य प्रदेशात रानपिंगळयाचा शोध लावला. १८७७ मध्ये अ‍ॅथनी ब्लेविटी यांनी छत्तीसगडमधील रायपूर-बासना रोडवर, सराईपल्ली ते गोमार्धा, पाल्कम ते खरीअर, उदान्ती अभयारण्य आणि महानंदी नदीजवळ सिरपूर येथे शोधला. १८८४ मध्ये जेम्स डेव्हिडसन यांना तत्कालीन नंदूरबार जिल्ह्य़ातील तळोदा येथे तो दिसला. मध्यप्रदेश आणि ओडिशा येथेही तो सापडला. १९१४ मध्ये कर्नल रिचर्ड मेनर्टझगेन यांनी इंग्लंडमध्ये त्यांना एक प्रजाती सापडल्याचे जाहीर केले. मात्र, हा शोध वादात सापडला. १९९७ मध्ये डॉ. पामेला रासमुसेन, बेन किंग आणि डेव्हिड अडॉट यांनी उत्तर महाराष्ट्रात रानपिंगळा शोधला आणि बीबीसी लंडनवरून ही बातमी प्रसारित झाली. १९९८ मध्ये तत्कालीन मानद वन्यजीव रक्षक किशोर रिठे, निशिकांत काळे, डॉ. खोडे, पी.एम. लाड यांनी अमरावती जिल्ह्य़ात त्याचे वास्तव्य आढळले. सँच्युरी एशियात त्यावर लेखही प्रकाशित झाला.