आठशे स्वच्छतागृहे उभी करणार – एस.चोक्किलगम

यंदाची आषाढी वारी ‘निर्मल वारी’ करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मुक्कामी ५००, तर जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी मुक्कामी ३०० ‘प्री फॅब्रिकेटेड’ स्वच्छतागृहे उभी केली जाणार असल्याचे विभागीय आयुक्त एस.चोक्किलगम यांनी सांगितले.

आषाढी वारी नियोजनाची चोक्किलगम आणि जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी पाहणी केली. यानंतर पत्रकार परिषदेत चोक्किलगम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, यंदाची वारी ‘निर्मल वारी’ म्हणून नावारुपास आणण्याचा शासनाचा संकल्प आहे. यासाठी जागोजागी तसेच पालखी तळावरही स्वच्छतागृहांची उभारणी केली जाणार आहे.  या साठी २ कोटी रुपये शासनाने तातडीने मंजूर केले आहेत.

पंढरपूर येथे ६५ एकर जागेत ११३ सुलभ स्वच्छतागृहे, तर १५०० ‘प्री फॅब्रिकेटेड’ स्वच्छतागृहे उभी केली जाणार आहेत. ६५ एकर जागेत वारकऱ्यांना सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. मंदिर समिती हॅम रेडिओ, सीसीटीव्ही उभे करणार आहे. येणाऱ्या भाविकांना जलद व सुलभरीत्या दर्शन व्हावे या साठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. रेल्वे विभागात स्वच्छतागृह उभे करण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.

उघडय़ावर शौचास बसू नका..

उच्च न्यायालयाने यात्रा कालावधीत चर खणून शौचालय उभे करण्यास बंदी घातली आहे. न्यायालयाचे आदेशाचे पालन करीत २०१७ पर्यंत १७०० कायमस्वरूपी स्वच्छतागृहे उभी केली जाणार आहेत. वारकऱ्यांनी उघड्यावर शौच करू नये या साठी विविध स्वयंसेवी संघटना या कामी मदत करणार आहेत. तसेच पालखी मुक्कामी उघड्यावर शौचास बसू नये या बाबत महाराज मंडळी प्रबोधन करणार आहेत.