रायगड जिल्ह्य़ात तब्बल पाच वर्षांनी थंडीची लाटची लाट आली आहे. उत्तरेकडील हिमवृष्टीचा आणि थंडीचा परिणाम आता कोकणातील बहुतांश भागात पाहायला मिळतो आहे. किनारपट्टीवरील भागातही तपमानाचा पारा घसरला आहे. जिल्ह्य़ात या हंगामातील सर्वात कमी तपमानाची नोंद रविवारी करण्यात आली आहे. या दिवशी १४.४ तपमानाची नोंद झाली आहे. तर माथेरानमध्ये पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे.
  तब्बल पाच वर्षांनी जिल्ह्य़ात थंडीचा जोर आहे. २००८ मध्ये जिल्ह्य़ात १३.४ अशं सेल्सिअस तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर फारशी थंडी जाणवली नव्हती. २००९ मध्ये १६.४ अंश सेल्सिअस, २०१० मध्ये १७.४ अंश सेल्सिअस, २०११ मध्ये १४.८ अंश सेल्सिअस अशा तपमानाची नोंद झाली होती. तर २०१२ मध्ये पारा १४.४ पर्यंत घसरला होता. मात्र पाच वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्य़ातील कमाल व किमान तपमानाचा पारा घसरला असल्याचे दिसून आले आहे. माथेरानमध्ये तर १२ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. अजून १० दिवस तरी जिल्ह्य़ात थंडीचा प्रभाव जाणवेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. जिल्ह्य़ात कर्जत, खोपोली, सुधागड पाली, रोहा, माणगाव, महाड,पोलादपूर परिसरात थंडीचा जास्त जोर पाहायला मिळतो आहे. त्यामुळे लोकरी कपडय़ांची मागणी वाढली आहे.