गावात अलीकडेच झालेल्या हरिनाम सप्ताहासाठी जमलेल्या वर्गणीचा हिशेब मागितला म्हणून संतप्त झालेल्या सरपंचाने साथीदारांसह एका महिलेवर बलात्कार केल्याची अत्यंत अमानुष घटना नगर जिल्ह्य़ातील नेवासे तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरपंच व त्याच्या साथीदारांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
नेवासे तालुक्यातील राजेगाव येथे गेल्याच आठवडय़ात हरिनाम सप्ताह झाला. या सप्ताहासाठी मोठय़ा प्रमाणात वर्गणी गोळा करण्यात आली होती. सप्ताहाच्या संयोजनात गावचा सरपंच लक्ष्मण घुले याचा प्रमुख पुढाकार होता. घुले याच्याकडे एका ग्रामस्थाने वर्गणीचा हिशेब मागितला. विशेष म्हणजे फेब्रुवारीत याच घुलेने कायदा धाब्यावर बसवत स्वतच्याच अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले होते. घुलेच्या या कृत्याची तक्रार संबंधित ग्रामस्थाने पोलिसांकडे केली होती. आताही संबंधित ग्रामस्थाने हिशेबाची विचारणा केल्यामुळे संतप्त झालेल्या घुले याने रविवारी सकाळी त्याच्या घरावर हल्ला केला. सरपंच व त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात संबधिताच्या घरातील सामानाची मोडतोड झाली. तसेच ग्रामस्थाची पत्नी, मुलगी व मुलगा यांनाही बेदम मारहाण झाली. या मारहाणीत हिशेब मागणाऱ्या ग्रामस्थाचा पाय मोडला. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. मात्र, घुलेवर कारवाई झाली नाही. दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या ग्रामस्थाला नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तेथे उपचार सुरू असतानाच संतापाने धुमसणाऱ्या घुले याने रविवारी रात्री पुन्हा एकदा संबंधित ग्रामस्थाच्या घरावर हल्ला केला. यावेळी त्याने ग्रामस्थाच्या पत्नीलाच लक्ष्य बनवले. महिलेच्या २१ वर्षीय मुलाला शेजारच्या खोलीत डांबून ठेवत रात्रभर संबंधित ग्रामस्थाच्या पत्नीवर सरपंच व साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला. ‘माझ्याविरोधात तक्रार करता, आता तुम्हाला जिवंत सोडणार नाही’, अशा धमक्या देऊन सरपंच व त्याचे साथीदार पहाटे निघून गेले. सोमवारी सकाळी पीडित महिलेने मुलासह पोलीस ठाणे गाठले व माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना उजेडात आली. पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे तातडीने फौजफाटय़ासह राजेगावात दाखल झाल्या. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी लक्ष्मण घुले, शिवाजी महादेव शिरसाठ, भागवत बन्सी घुले, संदीप रामकृष्ण शिरसाठ यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.