तळेखार येथे भर पावसात रास्ता रोकोचा प्रयत्न

गावठी दारू आणि बीअर शॉपीमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या मुरुड तालुक्यातील तळेखार येथील महिलांनी गुरुवारी दुर्गावतार धारण केला. या भागातील ५०० हून अधिक महिला भरपावसात रस्त्यावर उतरल्या. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर महिलांनी आपले आंदोलन स्थागित केले.

तळेखार येथील बीअर शॉपी बंद करावी तसेच या भागातील गावठी दारूचे धंदे उद्ध्वस्त करावेत यासाठी या भागातील महिलांनी वारंवार मागणी केली.

५ मे रोजी झालेल्या ग्रामसभेतही या संदर्भातील ठराव घेण्यात आला. ७ मे रोजी महिलांनी आपल्या मागण्यांचे निवेदन विविध शासकीय यंत्रणा तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांना दिले होते. तळेखार येथील चेतना काटकर, प्रियवंदना ठाकूर, निर्मला म्हात्रे, सरपंच धर्मा पाटील, विजय सुतार, जनार्दन खोत यांनी तळेखार येथील गावठी दारू व बीअर शॉपी बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु पोलीस यंत्रणेकडून म्हणावी तशी कारवाई होत नव्हती. थातुरमातुर कारवाई करून डोळेझाक केली जात होती. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. आणि त्या रस्त्यावर उतरल्या. भाजपच्या मुरुड तालुका महिला आघाडी अध्यक्षा वृषाली कचरेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले. पाऊस पडत असतानाही या महिला मागे सरकल्या नाहीत. भाजप मुरुड तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी, युवा मोर्चा मुरुड तालुका शहर अध्यक्ष प्रवीण बकर, मुरुड

तालुका युवा मोर्चा सरचिटणीस मुकेश खोत, विजय सुतार, जीवन खोत, जगदीश खोत, नरेंद्र काटकर, सुभाष खोत, तळेखारचे सरपंच अशोक वाघमारे, उपसरपंच धर्मा पाटील, दत्ता काटकर, चेतन ठाकूर, निर्मला म्हात्रे प्रियंवदा ठाकूर, नरेंद्र काटकर, महादेव काटकर, जनार्दन खोत आदींच्या नेतृत्वाखाली तळेखार गावातील तळेखार, तळे, शिवगाव, बौद्धवाडी, आदी गावांतून पाचशेहून अधिक महिलांनी तळेखार येथील बीअर शॉपीसमोर ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. त्यानंतर या महिलांनी गावासमोरील रोहा-अलिबाग रस्ता रोखून धरण्याचा प्रयत्न केला.

अखेर रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी आठवडाभरात गावठी दारूचे धंदे बंद केले जातील असे आशवासन दिले. त्याचबरोबर गावातील बीअर शॉपी बंद करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कायदेशीर पावले उचलली जातील असे सांगितले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.