पत्नीला घटस्फोटाची मागणी करणा-या पतीस पत्नीच्या नातेवाईक महिलांनी सोमवारी बदडून काढले. महिलांचा रुद्रावतार पाहून उपस्थित बघतच राहिले. अखेर नातेवाइकांनी सोडवणूक केल्यानंतर या नवरोबाने काढता पाय घेतला.
जुन्नर येथील तरुणाचे पानमांजरी येथील तरुणीशी लग्न झाले. काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडू लागले. पत्नी तिच्या वडिलांकडे राहू लागली. आज तालुक्यातील हरेगाव येथील मध्यस्थांनी येथील न्यायालयाजवळील मैदानात बैठक बोलावली. दोन्ही बाजूची मंडळी जमा झाली. पतीची समजूत काढण्यात आली. मात्र त्याने घटस्फोटाचाच लकडा लावून धरला. अखेर संतापलेल्या महिलांनी त्यास चांगलेच झोडपून काढले. त्याने तेथून पळ काढत एका वकिलाच्या कार्यालयात सहारा मिळवला. मात्र तेथूनही त्यास बाहेर खेचून महिलांनी बदडून काढले. नातेवाइकांनी त्याची सोडवणूक केल्यानंतर त्याची सुटका झाली. या प्रकरणी शहर पोलिसांकडे नोंद नव्हती.