अंगावर वीज पडल्याने भागूबाई प्रभाकर घोडके (वय ५२) जागीच ठार झाली. अंबड तालुक्यातील पाथरवाला (खुर्द) येथे मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. कांताबाई अशोक ढवळे ही महिला या वेळी जखमी झाली. दोघी महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेल्या होत्या. परतत असताना विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाचा तडाखा त्यांना बसला.
जाफराबाद तालुक्यातील हिरवाबावळी येथील शेतकरी रामराव लोखंडे यांची बैलजोडी वीज कोसळल्याने मृत्युमुखी पडली. गोठय़ावर वीज पडल्याने ही दुर्घटना घडली. मंगळवारी रात्री जाफराबादसह तालुक्यातील माहोरा, टेंभुर्णी आदी गावांच्या परिसरात पाऊस झाला. या पावसाने कांद्याचे पीक व आंब्याचे नुकसान झाले. भोकरदन तालुक्यातील राजूर, चनेगाव, तपोवन, लोणगाव, खामखेडा, चांदई एक्को, चांदई टेपली आदी गावांच्या परिसरातही पाऊस झाला. अंबड तालुक्यातील लोणार भायगाव परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे लिंबाचे झाड ग्रामपंचायत कार्यालयावर पडल्याने नुकसान झाले. गारपिटीने मोसंबी फळबागांची मोठी हानी झाली. अनेक घरांवरील पत्रे उडाले. मंगळवारी सायंकाळनंतर अंबड तालुक्यातील गोंदी, अंकुशनगर परिसरात जोरदार पाऊस झाला. परतूर, अंबड शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली.