जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना व्याघ्रदर्शन घडविणारी सहा महिला गाईडस्ची पहिली तुकडी दाखल झाली आहे. राज्यातील चार व्याघ्र प्रकल्पात प्रथमच महिला गाईडचा यशस्वी प्रयोग ताडोबात झाला  आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ात शहरापासून ४५ कि.मी. अंतरावर पट्टेदार वाघांसाठी देशविदेशात प्रसिध्द असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. ६२५.०४ चौ.कि.मी क्षेत्रात पसरलेला हा विस्तीर्ण व्याघ्र प्रकल्प म्हणजे मध्य भारतातील निसर्ग, घनदाट अरण्य आणि वन्यजीवांचे अव्दितीय आश्रयस्थळ आहे.
 राज्यात मेळघाट, सहय़ाद्री, पेंच व ताडोबा, असे चार व्याघ्र प्रकल्प असून यापैकी ताडोबात जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर पर्यटकांना व्याघ्रदर्शन घडविणारी सहा महिला गाईडस्ची तुकडी दाखल झाली आहे. यात शहनाज बेग, गायत्री वाढई, काजल निकोडे, माया जेंगढे, भावना वाढई यांचा समावेश आहे.