आईवडिलांच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा

पतीच्या निधनानंतर तिला सांभाळण्याऐवजी अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून पीडित महिलेल्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहूर येथील सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. योग्य अन्नपाणी न मिळाल्याने या महिलेच्या हाडांचा सापळा झाला असून, तिच्यावर सध्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जयश्री दुधे असे या विधवा महिलेचे नाव असून ती नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे वास्तव्याला होती. पती सुरेश दुधे यांचे २०१२ मध्ये अपघाती निधन झाल्यावर सासरकडील मंडळींनी तिचा छळ सुरू केला. तिला दोन मुले आणि एक मुलगी आहे. या महिलेला एका खोलीत डांबण्यात आले. तुझ्याचमुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून या महिलेचा दररोज मानसिक छळ केला जात होता. तिला अनेक दिवस उपाशी ठेवले जात होते. शेजाऱ्यांनाही बरेच दिवस याची माहिती नव्हती. कौटुंबिक कलह असावा, असे समजून तब्बल वर्षभर नातेवाईकांनीही याकडे दुर्लक्ष केले. जयश्रीचे आईवडील अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा येथे राहतात. तिचा छळ होत असल्याची कल्पना त्यांना नव्हती. तिच्यासोबत कुणाचा संपर्क होऊ नये, याची काळजी सासरकडील लोक घेत होते. काही दिवसांपूर्वी तिचे आईवडील घरी नसताना या महिलेला सासरकडील लोकांनी एका गादीत गुंडाळून घरासमोर सोडून दिले. ही महिला अन्नपाण्याविना कुपोषित बनली असून तिची ढासळलेली प्रकृती पाहून आईवडिलांना जबर धक्का बसला. या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. आजारी असतानाही जयश्रीवर उपचार करण्याचे सोडून सासरकडील मंडळींनी तिचा छळ केल्याचा आरोप जयश्रीचे वडील भाऊराव कुऱ्हाडे यांनी केला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कुऱ्हा पोलिसांनी या प्रकरणात सासरकडील लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून प्रकरण तपासासाठी माहूर पोलिसांकडे सोपवले आहे. या संपूर्ण प्रकरणात मात्र, माणुसकीचा मृत्यू झाल्याचे चित्र समोर आले आहे.