मोदीरूपी वादळाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का दिला. वादळे येऊन धक्का देऊन जात असली तरी  कार्यकर्त्यांनी विचलित न होता विधानसभा निवडणुकीचा प्रचार निर्धाराने करावा, असे आवाहन माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांनी रविवारी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयकांवर निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. या पाश्र्वभूमीवर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा काँग्रेस भवन येथे पार पडला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना खलप बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आवाडे यांनाच उमेदवारी देण्याच्या मागणीच्या जोरदार घोषणा दिल्या. तर अनेक वक्त्यांनी आवाडे यांनाच उमेदवारी का देण्यात यावी याचे समर्थन केले.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची गरज व्यक्त केली. समोर कोणीही असो विजय फक्त काँग्रेसचाच आहे असे सांगून आवळे आणि आवाडे हे दोघे एकत्र आल्याने त्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल असेही ते म्हणाले. माजी वस्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची घोषणा सत्वर करण्याची गरज व्यक्त करून विधानसभा निवडणुकीत आपली उमेदवारी राहणार असल्याचा पुनरुच्चार केला.माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी, आम्हीच आमचे शत्रू बनल्याने सातत्याने पराभवाला तोंड द्यावे लागल्याचे सांगून इथून पुढच्या काळात हातात हात घालून पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी एकत्र आल्याचे सांगितले.जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस शामराव कुलकर्णी, खजिनदार प्रसाद खोबरे, शशांक बावचकर आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी केले. आभार शिक्षण मंडळ सभापती तौफिक मुजावर यांनी मानले.