राष्ट्रवादी प्रणीत एका कामगार संघटनेच्या सुमारे शंभर कामगारांनी आज दुपारी ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीला धमकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेची गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल ‘लोकसत्ता’जवळ दिलगिरी व्यक्त केली आहे.
गेल्या ७ फेब्रुवारीच्या अंकात ‘राष्ट्रवादीच्या नावावर उद्योगांकडून खंडणी वसूल करणाऱ्यांचा सुळसुळाट’ असे वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्तात बाहेर गावाहून आलेली एक महिला कार्यकर्ती कामगार संघटनेच्या नावावर हे उद्योग करीत असल्याचे नमूद करण्यात आले होते. यामुळे संतप्त झालेल्या या कार्यकर्तीने आज स्वत: समोर न येता सुमारे शंभर कामगारांना कार्यालयात पाठविले. या कामगारांनी त्यावेळी हजर नसलेले ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी देवेंद्र गावंडे कुठे आहेत, अशी विचारणा केली. सुमारे अर्धा तास हे कामगार कार्यालयाजवळ उभे होते. नंतर आम्ही सोमवारी पुन्हा पाच हजार कामगारांना घेऊन कार्यालयावर धडक देणार आहोत, असे सांगत ते निघून गेले. या घटनेची माहिती लगेच राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांना देण्यात आली. त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. महिला मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांना हा प्रकार कळताच त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी संपर्क साधून पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. माध्यमांच्या स्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो, असे ते म्हणाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाने जाब विचारण्याच्या या अनोख्या पध्दतीचा निषेध केला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांनासुद्धा देण्यात आली आहे. दरम्यान, या महिला कार्यकर्तीला पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी दिली.