जागतिक नृत्यदिनानिमित्त उद्या (मंगळवारी) पंचमवेद अकादमीच्या वतीने नृत्यांजली, शात्रीय नृत्य व पारितोषिक वितरण या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. संध्या पुरेचा (मुंबई) यांना नृत्यमहर्षी पुरस्काराने कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे. दुपारी एकपासून दयानंद सभागृहात हा कार्यक्रम होईल. डॉ. पुरेचा, अभिजित देशमुख, दीपमाला मस्के, डॉ. अमित घुले यांची उपस्थिती असेल. आचार्य पार्वतीकुमार यांच्या शिष्या असलेल्या डॉ. संध्या पुरेचा यांना नृत्यमहर्षी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता अॅड. त्र्यंबकदास झंवर, पंडित शांताराम चिगरीगुरुजी, आनंद गोस्वामी यांच्या उपस्थितीत नृत्यांजली हा शास्त्रीय नृत्य कलाविष्कार लातूरकरांना पाहावयास मिळणार आहे. मधुरा पावसकर ठाणे, अश्विनी घोरे नगर, नमिता भोपटकर पंढरपूर, सुगंधा विश्वास मुंबई, अंकिता ठाकूर, निता सुर्वे, चित्रा दळवी, मंदिरा मनीष या मुंबईतील नृत्यांगना, तसेच मिताली भिडे रत्नागिरी, वर्षां पंडित नगर, अजय शेंडगे औरंगाबाद, कश्मिरा त्रिवेदी ठाणे नृत्याविष्कार सादर करणार आहेत. प्रा. विनोद निकम व अनुराधा निकम हेही नृत्यकला सादर करणार आहेत. रात्री तालमणी सतीश कृष्णमूर्ती (मुंबई) यांच्या कलाकारांचा तालकचेरी हा तालवादनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ लातूरकरांनी घेण्याचे आवाहन पंचमवेदच्या वतीने करण्यात आले आहे.