जीएसटी व नोटाबंदीच्या अविचारी निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी झाली, असे टीकास्त्र माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर सोडले. क्लिष्ट स्वरूपाच्या जीएसटीमधील विसंगती दूर न केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होण्याचा इशाराही सिन्हा यांनी व्यक्त केला. जीएसटी, नोटाबंदी, शेतकरी विरोधी धोरण यावर त्यांनी चौफेर टीका केली.

अकोल्यात शेतकरी जागर मंचाच्या वतीने ‘भारतीय अर्थव्यवस्था, नोटाबंदी, जीएसटी व शेतकरी’, या विषयावर यशवंत सिन्हा यांचे व्याख्यान रविवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर यशवंत सिन्हा यांच्या पत्नी निलिमा सिन्हा व शेतकरी जागर मंचचे पदाधिकारी उपस्थित होते. देशातील जनता आíथक संकटात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवर लिहिल्या लेखानंतर जनतेला आपली समस्या मांडल्याचे समाधान मिळाले. अर्थव्यवस्थेसंदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाहीत, यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आता तात्काळ दिलासा देण्याची आवश्यकता असून, २०२२ पर्यंत वाट पाहण्याची आता त्यांच्यात क्षमता नसल्याचा टोलाही त्यांनी मोदींना लगावला. महाराष्ट्रात नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या कृषिमालाच्या धोरणावर त्यांनी सडकून टीका केली. मर्यादित स्वरूपात शेतमाल खरेदी करण्याचे धोरण नाफेडने बदलावे, अन्यथा देशव्यापी आंदोलनाची सुरुवात अकोल्यातून करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

जीएसटीला विरोध नव्हे तर, मी त्याचा समर्थक होतो, असे स्पष्ट करून जीएसटीच्या किचकट स्वरूपामुळे त्याला सर्व पातळीवर विरोध होत असल्याचे यशवंत सिन्हा म्हणाले. जीएसटी लागू करतांना विचार झाला नाही. जीएसटीमध्ये लहान व्यापाऱ्यांना तीन महिन्यातून एकदा रिटर्न भरण्याची दिलेली सूटही त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने घातकच आहे. व्यापारयांचे मोठे नुकसान होत आहे. जीएसटी म्हणजे ‘गुड अॅन्ड सिम्पल टॅक्स’ नाही तर ‘बॅड अॅन्ड काँप्लिकेटेड टॅक्स’ झाल्याची टीका त्यांनी केली. नोटबंदी पूर्णपणे अपयशी ठरली. नवीन रोजगार निर्मिती नाही, बेरोजगारी, महागाई वाढली, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव कमी असतांना देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकले आहेत. समस्या ओळखून निराकरण करणारे योग्य शासन असते. मात्र, सध्या तर जनतेला ‘मित्रो’ संबोधून दिशाभूल करण्याचेच काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

राजशक्तीवर नियंत्रणासाठी लोकशक्ती हवी

लोकशाहीमध्ये राजशक्तीवर लोकशक्ती असते. त्यामुळे राजशक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता देशभर लोकशक्ती निर्माण होण्याची खरी गरज आहे, अशी अपेक्षा  यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली.