शहराच्या मोगलाई भागात घडलेल्या ‘अ‍ॅसिड’ हल्ला प्रकरणातील गंभीर जखमी युवकाचा अखेर मुंबई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी अटक केलेल्या दोन संशयितांना न्यायालयाने सात डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या घटनेतील सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी गवळी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
मोगलाई भागात ३० नोव्हेंबरच्या रात्री सदाशिव अर्जुन गवळी (४२) रा. गवळीवाडा, यांच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर दोघांनी अ‍ॅसिड फेकले. हल्लेखोरांनी आपले चेहरे कपडय़ाने बांधले होते. सदाशिव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्यांना मुंबई येथे उपचारार्थ हलविण्यात आले. सोमवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गवळी यांच्या मृत्यूची बातमी मोगलाई भागात कळताच त्यांच्या निवासस्थानी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून पोलीस प्रशासनाच्या वतीने जादा कुमक तैनात करण्यात आली. गवळी समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी सर्वाना शांततेचे आवाहन केले.
दरम्यान भगवान गवळी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विशाल देवकर गवळी आणि ज्ञानेश्वर संजय गवळी (दोन्ही रा. मोगलाई, गवळीवाडा) या दोघांना अटक करण्यात आली. दोघांनाही न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता सात डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार वेगळाच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्याची मागणी गवळी समाजातून होत आहे.