स्वच्छतेसाठी युवा हात पुढे सरसावले तर किती मोठे काम केवळ काही तासांच्या श्रमदानातून साध्य होऊ शकते, याची प्रचिती आज शिवाजी विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात आलेल्या रंकाळा स्वच्छता मोहिमेतून आली. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राबविण्यात आलेल्या व स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असलेल्या या मोहिमेत सुमारे एक हजार विद्यार्थी-विद्याíथनींसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आणि रंकाळय़ाच्या इराणी खाणीलगतचा सर्व परिसर स्वच्छ केला. परीक्षांचा व सुटय़ांचा हंगाम असूनही शेकडो आजी-माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व उत्साहवर्धक सहभाग पाहून सारेच उपस्थित मान्यवर भारावून गेले.
राज्यपाल तथा  कुलपती चे. विद्यासागर राव यांनी त्यांच्या कोल्हापूर भेटीदरम्यान केलेल्या आवाहनानुसार आज ही मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेला पाच गटांत विभागून सुरुवात करण्यात आली. मंत्री पाटील व प्रभारी कुलगुरू डॉ. भोईटे यांनी इराणी खाणीपासून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला. खाणीतून प्लॅस्टिक पिशव्या, कचरा यापेक्षाही विसर्जति करण्यात आलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती व मुखवटय़ांचे अवशेष मोठय़ा प्रमाणावर बाहेर काढण्यात आले. ते पाहताना पर्यावरणाची मोठी हानी होण्यास आपण कारणीभूत ठरतो आहोत, याची हळहळ व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी या परिसरातील प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा गोळा करण्याबरोबरच अनावश्यक काटेरी झुडपे साफ केली. महापालिकेचे सफाई कर्मचारीही विद्यार्थ्यांच्या बरोबरीने या मोहिमेत सहभागी झाले. कचरा भरून नेऊन टाकण्यासाठी ट्रक आणि लेव्हिलग करण्यासाठी जेसीबी यंत्राची व्यवस्थाही पालिकेच्या वतीने करण्यात आली होती.
सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने टोप्या व हातमोजे तसेच साफसफाई करण्यासाठी विळे, टोपल्या, झाडू पुरविण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने  जेसीबी, डंपर, पाण्याचे टँकर, सायकल रिक्षा, फिरता दवाखाना यांची व्यवस्था करण्यात आली होती, तसेच विद्यापीठापासून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी विशेष केएमटी बसेसची सुविधा करण्यात आली होती.
पालकमंत्री पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अमित सनी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, महानगरपालिका उपायुक्त अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांच्यासह अनेक शासकीय व महानगरपालिका अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग हे या मोहिमेचे महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरले. पालकमंत्री पाटील यांनी या मोहिमेच्या प्रारंभाची औपचारिक घोषणा केली. ‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वर्षांनंतरही स्वच्छता अभियान राबवावे लागणे दुर्दैवी असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या या मोहिमेमुळे स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले. आता ही केवळ रंकाळा स्वच्छतेची एक दिवसाची मोहीम राहणार नाही. यापुढे विद्यार्थ्यांनी स्वच्छताविषयक जनजागृतीसाठीही पुढाकार घ्यावा, तसेच या मोहिमेला आता स्वच्छ कोल्हापूर अभियानाचे व्यापक स्वरूप देण्याचा मानस आहे,’ असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.