शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लक्षवेधी आंदोलन

तुळजापर-नागपूर मार्गावरील येथून २० कि.मी. अंतरावर असलेल्या अर्जुना गावाजवळील रस्त्याच्या बाजूला पोलिसांचा प्रचंड ताफा, रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि जमलेले असंख्य लोक कशासाठी, या उत्सुकतेपोटी परिसरातील लोकांची आणखीनच गर्दी झाली. चौकशीत समजले की रस्त्याच्या बाजूला असलेल्या ५० ते ५५ फूट उंचीच्या काटसावरीच्या झाडावर एक तरुण चढलेला आहे आणि तो खाली यायला तयार नाही. खाली उभ्या असलेल्या महसूल, पोलीस, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याने ओरडून ओरडून आपल्या मागण्या सांगितल्या. धनंजय वानखेडे असे त्या तरुणाचे नाव असून तो अर्जुना गावचा राहणारा आहे.

कर्जमाफीचे पैसे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, फवारणीच्या बळी पडलेल्या व उपचार घेत असलेल्या शेतकरी, शेतमजुरांचे पुनर्वसन करा आणि शेतकऱ्यांना जाहीर केलेली १० हजार रुपयांच्या कर्जाची रक्कम त्वरित अदा करा, अशा त्याच्या मागण्या होत्या. त्या सर्व मान्य करू, असे सांगितल्यावरही तो खाली येईना, अखेर त्याची पत्नी सावित्री, शेतकरी समितीचे निमंत्रक देवानंद पवार आणि कवी हेमंत कांबळे तिथे आल्यानंतर व त्यांनी विनंती केल्यावर तो खाली आला. त्याच्याजवळ कीटकनाशकाची बाटली होती असे समजते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी अगोदर दवाखान्यात रवाना केले.