पालकमंत्री उदय सामंत पुरस्कृत व जयहिंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘बहर’ युवा महोत्सव यंदा येत्या ८ जानेवारीपासून आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती हे महोत्सवाचे आकर्षण आहे.
युवा कलाकारांच्या गुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी ‘बहर’ महोत्सव गेली सात वष्रे आयोजित केला जातो. कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या महोत्सवाला हजेरी लावली आहे. महोत्सवातील विविध स्पर्धाच्या प्राथमिक फेऱ्या उद्यापासून (३ जानेवारी) सुरू होत असून ८ जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. प्राथमिक फेऱ्यांपैकी उद्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा, ४ जानेवारी रोजी गीत गायन स्पर्धा तर ५ जानेवारीला व्यक्तिमत्त्व स्पर्धा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात होणार आहेत. ८ जानेवारी रोजी बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धा शिवाजी क्रीडा संकुलात होणार आहेत. ८ जानेवारी रोजी संध्याकाळी उद्घाटनानंतर रेकॉर्ड डान्स स्पर्धा, ९ जानेवारीला संध्याकाळी गीत गायन आणि १० जानेवारीला संध्याकाळी ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत. याच दिवशी रात्री उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते विविध स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ होणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी नमूद केले.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता व्यक्तिमत्त्व स्पर्धा असून रात्री ९ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. तसेच या महोत्सवात यंदा प्रथमच छायाचित्र स्पर्धा घेतली जाणार असून मोबाइल कॅमेरा आणि डिजिटल कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्रे, अशा दोन गटांमध्ये परीक्षण केले जाणार आहे.