विभागीय महारोजगार मेळावा
केवळ पुस्तकी ज्ञानाचे दिवस आता संपले असून शिक्षणात मूल्यवर्धन केल्याशिवाय किंवा शिक्षणाला अतिरिक्त कौशल्याची सांगड घातल्याशिवाय नोकरी मिळणार नाही, हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिला.
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित विभागीय महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी, पालकमंत्री प्रवीण पोटे, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार डॉ. अनिल बोंडे, रमेश बुंदिले, रवी राणा, प्रभुदास भिलावेकर, चैनसुख संचेती, राजेंद्र पाटणी, संजय कुटे यांच्यासह प्रधान सचिव दीपक कपूर, आयुक्त विजय वाघमारे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, यूएनडीपीचे भारताचे प्रमुख क्लेमेंट शेवे उपस्थित होते.
एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न आहे, दुसरीकडे कौशल्यपूर्ण मनुष्यबळाचा अभाव आहे. ही दरी मिटवण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. देशात कौशल्य विकसित करून रोजगार देण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात आणली. त्यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता या स्वतंत्र विभागाची स्थापना केली. अशा प्रकारचा विभाग स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. माती कुणी विकत घेत नाही, मात्र त्यातूनच निर्मित झालेल्या मडक्याला किंवा कलाकृतींना मोल असते. अशाच पद्धतीची कौशल्या विकासाची संकल्पना आहे. देशातील ७५ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत, पण यात रोजगार कमी आहे. शेतीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे. कौशल्ययुक्त रोजगार शेती समृद्ध करेल.
उद्योगांसाठी त्याच भागातील मनुष्यबळ प्रशिक्षित करून ८० टक्के भूमिपुत्रांना रोजगार देण्याची शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राजीव प्रताप रुडी म्हणाले, भारतात फक्त ४ टक्के लोक कौशल्य प्रवीण असून अमेरिकेत हेच प्रमाण ५० टक्के, जर्मनीमध्ये ७४ टक्के, जापानमध्ये ८० टक्के तर कोरियामध्ये ९६ टक्के आहे. पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमासाठी मेकर्स घडवण्याचे काम कौशल्य विकासाच्या माध्यमातून करायचे आहे. कौशल्याला नेहमी कनिष्ठ दर्जातून पाहिले गेले आहे. त्याची सांगड नोकरीशी न घालता केवळ पदवी मिळवण्यापुरते साधन म्हणून त्याचा वापर करण्यात आला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दहावी, बारावी या पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्याचे वेगवेगळया व्यवसायाचे प्रशिक्षण मुला-मुलींना दिल्यास ते फायद्याचे ठरेल. आज बांधकाम क्षेत्रात ३ लाख, वीणकाम क्षेत्रात २ लाख, किरकोळ क्षेत्रात दीड लाख प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आहे. कौशल्य विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राने चांगली प्रगती केली आहे, असे रूडी म्हणाले.उद्योगांच्या गरजेनुसार आयटीआयच्या अभ्यासक्रमात अद्यावत बदल करण्यात येतील, असे डॉ. रणजीत पाटील म्हणाले. प्रास्ताविक दीपक कपूर यांनी केले, तर विजय वाघमारे यांनी आभार मानले.