शिवसेनेशी असलेली २५ वर्षांंची युती तोडण्याची सूचना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच केली होती. त्यानुसार आम्ही युती तोडणारच होतो, असा गौप्यस्फोट पक्षाचे राज्याचे प्रभारी राजीवप्रताप रूडी यांनी केला. पक्षाला राज्यात १३० पेक्षा कमी जागा नको होत्या. त्या मिळत नव्हत्या हेच युती तुटण्याचे मुख्य कारण आहे. राज्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुनामी आली असून यामध्ये शिवसेनेसह सर्व पक्ष वाहून जातील असे ते म्हणाले.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी रूढी यांच्या सभेने झाली. या सभेत ते बोलत होते. शिंदे यांच्यासह विजय देशमुख, संभाजीराजे भोसले, नामदेव राऊत, अशोक खेडकर, प्रसाद ढोकरीकर आदी या वेळी उपस्थित होते.
रूडी म्हणाले,की भाजपचे कार्यकर्ते राज्यातील शिवसेनेच्या युतीला कंटाळले होते. अमित शहा यांनी ते नेमकेपणाने ओळखले होते. त्यांनीच आता भाजपचे कार्यकर्ते व मतदारांना स्वबळावर भाजपचे सरकार आणण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आता सर्व चॅनल्सनी व वृत्तपत्रांनी राज्यात भाजपचे सरकार येणार हे सांगितले आहे. शिवसेनेवर आरोप करणार नाही असे म्हणत त्यांनी मतदरांना काय हवे हे आतातरी ओळखा असे आवाहन केले. दिल्लीवरून निघालेली भगवी राजधानी एक्सप्रेस मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा, छत्तीसगढ घेत अता महाराष्ट्रात सुसाट येत आहे, असे ते म्हणाले. दोन्ही काँग्रेसच्या १५ वर्षांच्या कारभावर शहा यांनी या वेळी जोरदार टीका केली.