निमज येथील शाळा जिल्हा परिषदेची आहे यावर आपला विश्वासच बसत नाही. एखाद्या खासगी शाळेला लाजवेल असे शाळेचे वातावरण, संगणकाच्या माध्यमातून जगाशी नाते सांगणारे विद्यार्थी, त्यांचा आगळावेगळा गणवेश पाहून आपण भारावून गेलो. सर्व वर्गात संगणक विद्यार्थी स्वत: हाताळतात ही बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अन्न व औषध प्रशासन, पर्यटनराज्यमंत्री अमित देशमुख यांनी काढले.
तालुक्यातल्या निमज येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ई-लìनग स्कूल प्रकल्पांतर्गत सर्व वर्गात ३२ इंची एलईडी संगणक ठेवण्यात आले आहेत. ग्रामस्थ, पालक, गावातील विविध संस्थांनी दिलेल्या सुमारे दीड लाख रुपयांच्या लोकवर्गणीतून हा प्रकल्प साकारला आहे. त्याचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, पंचायत समितीचे प्रभारी सभापती बाळासाहेब गायकवाड, दूध संघाचे संचालक संपतराव डोंगरे, सरपंच जिजाताई िशदे, उपसरपंच विलासराव कासार, रामनाथ डोंगरे, पाराजी डोंगरे, गटशिक्षणाधिकारी वसंतराव जोंधळे, विस्तार अधिकारी भालेराव व ज्ञानेश्वर वाकचौर, केंद्रप्रमुख शिवाजी देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात देशमुख यांनी शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांचा आकर्षक रंगसंगतीचा गणवेश पाहूनच शाळेचे वेगळेपण अधोरेखित होत असल्याचे ते म्हणाले. आपण अनेक शाळांतले संगणक कक्ष बघितले, मात्र प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे आणि तेही प्लाझ्मा टीव्हीसारखे मोठय़ा आकाराचे संगणक अशी कल्पकता प्रथमच या शाळेत बघावयास मिळाली. शाळेच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण संगणकाच्या माध्यमातून तेही विद्यार्थ्यांनी केले, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. ई-लìनगच्या माध्यमातून निमजसारख्या खेडेगावातील मुले जगाशी नाते सांगायला सिद्ध झाली आहेत. सरकारी मदतीच्या आशेवर न राहता गावकऱ्यांनी दीड लाखाची लोकवर्गणी शाळेला दिली. गावच्या सरकारी शाळेसाठी असे योगदान देणारे गावकरीही अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी नमूद केले. निमजचा हा पॅटर्न आपल्या लातूर जिल्हय़ात राबवणार असल्याचेही ते म्हणाले. थोरात, आमदार तांबे, सभापती गायकवाड यांनीही शाळेचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.