इतिहास आणि संस्कृतीने घडवलेल्या किमयेचे दर्शन एखादा अज्ञात स्रोत अवचित देऊन जातो. आख्यायिकेसारखी भासणारी नर्मदा नदी आणि तिची सुंदर रूपे माझ्यासमोर उलगडली गेली ती सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्यामुळे. त्यांनी केवळ नर्मदाकाठी वसलेल्या आदिवासी जमातींबद्दल पुस्तकं, नर्मदेबद्दल प्रवासवर्णनंच लिहिली नाहीत, तर तब्बल १३१२ किलोमीटर पायी चालून नर्मदा परिक्रमाही पूर्ण केली. सोबत मोजके कपडे घेऊन, कोणत्याही शिध्याशिवाय. भारतातल्या नद्यांविषयी जाणून घेण्याची न भागणारी तहान गो.नीं.ना भेटल्यानंतर माझ्या मनात जागृत झाली. त्यानंतर मी देशातल्या सात महत्त्वाच्या नद्या आणि त्यांची वैशिष्टय़ं यांविषयी माहिती देणारा दृक्-श्राव्य कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर करण्याचं धाडसही दाखवलं.

नर्मदेशी माझी ओळख करून दिली ती मराठीतले सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत गोपाळ नीलकंठ दांडेकर यांनी. ही गोष्ट आहे १९८०च्या दशकाच्या सुरुवातीची. मुंबई-पुणे रस्त्यावर तळेगाव इथे माझं एक सुंदर कॉटेज होतं आणि दांडेकर कुटुंबीय तिथून जवळच राहत होते. काही मित्रमंडळींनी मला त्यांच्याकडे नेलं. खूपच सौहार्द होतं त्यांच्या वागण्यात. त्यांच्या आयुष्याबद्दल सांगत असतानाच त्यांनी त्यांचे नर्मदा परिक्रमेचे अनुभवही सांगितले. एखाद्या नदीभोवती किंवा स्थळाभोवती घातलेली प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा. मला नद्यांबाबत खूप उत्सुकता होतीच. त्यामुळे या परिक्रमेचे अनुभव ऐकणं ही माझ्यासाठी मेजवानीच ठरली. त्यांचे विस्मयकारक अनुभव ऐकून मी भारल्यासारखी झाले आणि नंतरच्या काळात, जणू काही ते विधिलिखितच होतं, मला स्वत:ला नर्मदेची किती तरी रूपं बघण्याची संधी मिळाली. नर्मदेला दिलेल्या अनेक भेटींत मला काय दिसलं आणि मी नर्मदेच्या प्रेमात कशी पडले याचंच हे इतिवृत्त.

morarji desai drink urine
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

नर्मदेचं उगमस्थान, अमरकंटक : जीवनाचं अनोखं प्रतीक असलेल्या नद्यांबद्दल मला कायमच प्रचंड आकर्षण वाटत आलंय. या नद्यांमध्ये इतिहास घडवण्याची शक्ती आहे, आजूबाजूचा परिसर हिरवागार करून टाकण्याची क्षमता आहे, शेती-मळ्यांना पाणी देऊन अब्जावधी लोकांना पुरेल इतकं अन्नधान्य पिकवण्याचं सामथ्र्य आहे. त्यामुळे भारतात या नद्यांना आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत समजलं जातं. देशातलं अभिजात साहित्य, पारंपरिक कला, संगीत आणि सण यातून नदीचा गौरव केला जातो. देशातल्या सात महान नद्या या अर्थातच भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि आध्यात्मिक वारशाचे आधारस्तंभ समजले जातात. या सात नद्या म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती, कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि नर्मदा किंवा रेवा. बिल एटकेन या प्रख्यात लेखक आणि निसर्गशास्त्रज्ञांनी त्यांच्या ‘सेव्हन सेक्रेड रिव्हर्स ऑफ इंडिया’ नावाच्या प्रसिद्ध पुस्तकात या नद्यांचं वर्णन केलं आहे. भारतातल्या या पवित्र नद्यांच्या अस्तित्वाच्या अनुभवाबद्दल त्यांनी लिहिलंय. एटकेन यांना भारतातल्या नद्यांबद्दल एवढा खोल जिव्हाळा वाटायचा की त्यांनी हिमालय हेच आपलं घर मानलं आणि अनेक र्वष ते तिथेच राहिले. माझ्या दृष्टीने बोनस म्हणून मी त्यांचं हे पुस्तक पुन:पुन्हा वाचलं. नर्मदेचा उगम मी माझ्या डोळ्यांनी बघितला तेव्हा मला अतीव सुख वाटलं.

मार्बल रॉक्स : मी नर्मदेच्या तीराने प्रवास करत राहिले. खडकांभोवती खळाळणारी नर्मदा बघण्यासाठीही मी उत्साहाने गेले. पहिल्यांदा मी हे आश्चर्य अनुभवलं ते माझी मुलगी मोनिशा हिचा जबलपूरमध्ये नृत्याचा कार्यक्रम झाला तेव्हा. आम्ही बरेच जण तिकडे गेलो होतो. नृत्य करणाऱ्या मुली, त्यांचा आई वर्ग, संगीतकार आणि नृत्य दिग्दर्शक असा मोठा ग्रुप होता. आम्ही गाडी भाडय़ाने घेऊन संपूर्ण शहराचा दौरा तर केलाच, शिवाय बोटीने नर्मदेत गेलो मार्बल रॉक्स बघण्यासाठी. या मार्बल रॉक्सच्या दर्शनाने मला एवढं वेड लावलं की, आम्ही पुन्हा तिकडे गेलो निसर्गाचा तो चमत्कार बघण्यासाठी. त्या पाण्यातून निसर्ग जणू काही मोठी भिंत बांधतोय असं ते दृश्य. नर्मदेच्या निळ्या-पांढऱ्या फेसाचं ते उत्सवी नृत्य माझ्या मनात रेंगाळत राहिलं.

ओंकारेश्वर मंदिर : नर्मदेला मी दुसऱ्यांदा भेट दिली ती एका कापड गिरणीने दिलेल्या आमंत्रणामुळे. ही मिल आणि मी काम करत असलेलं मासिक यांचा एक संयुक्त प्रकल्प होता. त्याबाबतीत चर्चा करण्यासाठी त्यांनी मला बोलावलं होतं. ज्योतिर्लिगांपैकी एक असलेलं नर्मदाकाठचं ओंकारेश्वर मंदिर मी तेव्हा बघितलं आणि या मंदिराच्या स्थापत्यशास्त्राने मला अवाक् करून सोडलं. आदि शंकराचार्यानी ज्योतिर्लिगांचा दर्जा दिलेल्या १२ मंदिरांपैकी ओंकारेश्वर एक आहे. मी उज्जनमधल्या महाकालेश्वर मंदिरातही जाऊन आले. हे मंदिरही १२ ज्योतिर्लिगामध्ये गणलं जातं. या सगळ्या प्रवासात मला वारंवार आठवत राहिलं ते

गो. नी. दांडेकरांशी झालेलं दीर्घ संभाषण आणि नर्मदेच्या शांत सौंदर्याचं त्यांनी केलेलं वर्णन.

महेश्वरी साडय़ांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी होळकर राजघराण्यातील रिचर्ड आणि सॅली होळकर यांनी सुरू केलेल्या एका प्रकल्पाला भेट देण्याच्या निमित्ताने मी पुन्हा नर्मदेकडे गेले. राणी अहल्याबाई होळकरांचा भव्य राजवाडा नर्मदेच्या काठावरच उभा आहे. ही नदी इतिहासातल्या कित्येक घडामोडींची साक्षीदार असेल याची कल्पना इथे येते.

मांडूतला जहाज महल : नर्मदेला दिलेल्या आणखी एका भेटीत मला मांडूतला नर्मदेकाठी बांधलेला एक राजवाडा बघण्याची संधी मिळाली. माळव्याचा पहिला सुलतान बाझ बहादूर याने सोळाव्या शतकात बांधलेला हा राजवाडा. बाझ बहादूरची लाडकी राणी होती रूपमती. माळव्याच्या आजूबाजूच्या कित्येक राज्यकर्त्यांना या रूपसुंदर राणीला पळवून नेण्याची इच्छा होती. मात्र इतिहास सांगतो की, शत्रूने माळवा जिंकला, तेव्हा राणी रूपमतीने मांडूच्या जहाज महालातून उडी मारून नर्मदेत जीव दिला.

भडोचमधली नर्मदा : माझी नर्मदेशी पुढची भेट झाली ती कामाच्या निमित्ताने भडोचला गेले होते तेव्हा. नर्मदा नदीचं मुख अर्थात ती समुद्राला मिळते ते ठिकाण इथून बघणं सोपं होतं. अर्थात माझ्यासाठी ही भेट संस्मरणीय ठरली ती एका ज्येष्ठ संग्राहकांचा खासगी संग्रह बघायला मिळाला म्हणून. ते नर्मदेपासून जवळच राहत होते. त्यांनी अनेक वर्षांपासून जमवलेल्या असंख्य कलाकृती मला दाखवल्या. त्यांनी मला नर्मदेबद्दल एक विस्मयकारक गोष्ट सांगितली. नर्मदेकाठी राहणाऱ्या पक्ष्यांच्या अनेकविध प्रजाती घरटं बांधताना एक काळजी नेहमी घेतात. पावसाळ्यातही नर्मदेचा स्तर पोहोचू शकणार नाही, एवढय़ा उंचीवर हे पक्षी घरटी बांधतात. नदीची पातळी किती वाढू शकते याचा अंदाज पक्ष्यांनाही असतो तर. हे कळल्यानंतर मला सजीव आणि निसर्ग यांच्यातला संबंध काहीसा उमगला.

अर्थात शेवटी माझं आणि नर्मदेचं जे काही नातं माझ्या आयुष्यात तयार झालं, ते महान साहित्यिक गोपाळ नीलकंठ दांडेकर यांनी केलेल्या परिक्रमेच्या वर्णनामुळेच. आजही असंख्य लोक नर्मदा परिक्रमेसाठी प्रवास करतात. दांडेकर म्हणाले होते की, परिक्रमेची सुरुवात नदीच्या उगमस्थळापासून, अमरकंटकपासून होते. तिथून निघालेले लोक नदीच्या काठाने भडोचपर्यंत, जिथे ती समुद्राला मिळते, जातात आणि मग पुन्हा उगमाशी येतात. धार्मिक यात्रेसाठी निघालेले लोक अन्न, बिछाना किंवा उबदार कपडे सोबत बाळगत नाहीत. पाणीसुद्धा सोबत नेण्याची परवानगी नाही. ते एखाद्या खेडय़ातून जातात, तेव्हा गावकरी त्यांना अन्न आणि पाणी देतात. ते रात्री झाडाखाली झोपतात. दांडेकर यांच्या मते ही परीक्षा आहे तुमच्या सहनशक्तीची. मात्र, १८०० किलोमीटरची ही परिक्रमा पूर्ण झाली की मनात दाटून येते विजयाची आणि हर्षांची भावना.

नर्मदेने मला दिलेला प्रत्येक अनुभव अविस्मरणीय आहे आणि प्रत्येक अनुभव जादूई, विस्मयकारकही आहे. कदाचित नद्यांचं मला कायमच आकर्षण वाटत आलंय ते म्हणूनच.

भाषांतर – सायली परांजपे – sayalee.paranjape@gmail.com

विमला पाटील chaturang@expressindia.com