गुजरातमधल्या सोमनाथ मंदिरासाठी मी तयार केलेला ‘साऊंड अ‍ॅण्ड लाइट शो’ आजही लोकप्रिय आहे. देशातल्या पहिल्या पाच ‘साऊंड अ‍ॅण्ड लाइट शो’जमध्ये हा शो गणला जातो याचा मला अभिमान वाटतो. पण ते करण्याचं आव्हान  स्वीकारल्यानंतर मी किती तरी पुस्तकं वाचली, दस्तऐवज चाळले, लोककथा समजून घेतल्या. भारतीय विद्या भवन आणि मुंबईतल्या म्युझियमच्या लायब्ररीतली पुस्तकं आणि मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडे उपलब्ध असलेल्या दस्तऐवजांचा अभ्यास केला आणि महिनाभराच्या अभ्यासानंतर स्क्रिप्टची तयारी पूर्ण झाली..

थोर सिद्धपुरुष आणि तत्त्वज्ञ शंकराचार्यानी भारतातल्या बारा ज्योतिर्लिगांपैकी पहिल्या ज्योतिर्लिगाचा मान ज्याला दिला आहे, त्या ऐतिहासिक सोमनाथ मंदिरासाठी ‘साऊंड अ‍ॅण्ड लाइट शो’ तयार करण्याचं काम मला दशकभरापूर्वी लाभलं. आज हा ‘साऊंड अ‍ॅण्ड लाइट शो’ देशातल्या पहिल्या पाच ‘साऊंड अ‍ॅण्ड लाइट शो’जमध्ये गणला जातोय. इंटरनेटवर ही बातमी वाचल्यानंतर मला राहावलंच नाही. मी पुन्हा एकदा सोमनाथला गेले आणि मीच रचलेला तो दैवी कार्यक्रम डोळे भरून बघितला. मला आठवलं, कशा कशा गोष्टी घडत गेल्या, जशा काही त्या घडणारच होत्या. हा शो कसा आकाराला आला, सगळं कसं मनासारखं होत गेलं. या लक्षणीय आणि चमत्कृतींनी भरलेल्या प्रवासाची कहाणी मी आज सांगणार आहे.

wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
Cyber Crime
कंबोडियात पाच हजार भारतीयांवर सायबर अत्याचार, ५०० कोटींची फसवणूक, सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात!
Bhushan Gagrani BMC commissioner
मुंबईला मिळाले नवे आयुक्त, ‘या’ अधिकाऱ्यावर आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेची जबाबदारी
Kandalvan Ulwe node
उलवे नोडमध्येही कांदळवनावर भराव, सिडको आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

माझी मैत्रीण चांदनी लुथ्रा त्या वेळी भारतीय पर्यटन विकास महामंडळात (आयटीडीसी) काम करत होती. एक दिवस अचानक तिचा फोन आला. सोमनाथ मंदिरासाठी करायच्या ‘साऊंड अ‍ॅण्ड लाइट शो’चं स्क्रिप्ट लिहिशील का, असं तिने मला विचारलं. त्या वेळपर्यंत मी शेकडो फॅशन शोज आणि मिस इंडिया सोहळे आयोजित केले असले, तरी अशा शोचा काहीच अनुभव माझ्या गाठीशी नव्हता. ‘‘अगं, तुला संधी मिळतेय कायम सगळ्यांच्या स्मरणात राहण्याची,’’ ती म्हणाली आणि मी आव्हान स्वीकारून नेटाने कामालाच लागले. या मंदिराबद्दल नेमकं काय सांगायचंय हे जाणून घेण्यासाठी मी अहमदाबादला किती तरी चकरा मारून ट्रस्टींशी चर्चा केली. किती तरी पुस्तकं वाचली, दस्तऐवज चाळले, लोककथा समजून घेतल्या. भारतीय विद्या भवन आणि मुंबईतल्या म्युझियमच्या लायब्ररीतली पुस्तकं आणि मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडे उपलब्ध असलेल्या दस्तऐवजांचा अभ्यास केला. महिनाभराच्या अभ्यासानंतर स्क्रिप्टची तयारी पूर्ण झाली. साधारणपणे एक तासाचं स्क्रिप्ट मी या ‘साऊंड अ‍ॅण्ड लाइट शो’साठी तयार केलं.

या स्क्रिप्टचा पहिला मसुदा मी आयटीडीसी आणि विश्वस्त मंडळाला दाखवला. त्यांच्या सूचनांनुसार काही बदल केले आणि मुख्य म्हणजे स्क्रिप्टची लांबी थोडी कमी केली. या स्क्रिप्टमधल्या विविध कथांच्या कथनासाठी कोणाकोणाचे आवाज वापरायचे आणि गाणी, संस्कृत श्लोक कोणाकडून गाऊन घ्यायचे हे ठरवण्याची वेळ आता आली होती. मुख्य म्हणजे सगळं स्क्रिप्ट एका सूत्रात बांधण्यासाठी लागणारा कथनकार कोण असणार याचा निर्णय आता घ्यायचा होता. हा शो हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या तीन भाषांत करायचा होता. मला आठवलं की, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांसाठी मी मुंबईत काही कार्यक्रम तयार केले होते, तेव्हा बर्लिन म्युझियमने दुर्गेचं एक सुंदर शिल्प आणि राधा-कृष्णाची काही मिनिएचर पेटिंग्ज पाठवली होती. त्यावेळी डॉ. धर्मवीर भारतीय यांच्या ‘कनुप्रिया’ या अभिजात कवितेच्या वाचनाचा एक कार्यक्रम मी बसवला होता. हा कार्यक्रम संपूर्ण सोहळ्याचा हायलाइट ठरला. कारण, ‘कनुप्रिया’ सादर केली होती हिंदी चित्रपटसृष्टीतले विख्यात अभिनेते अमरीश पुरी यांनी. त्या वेळी हेमामालिनी यांनी माता दुर्गेवर बॅले डान्स सादर केला होता. हे आठवल्यानंतर माझ्या मनाने घेतलं की, सोमनाथ शोचे हिंदीमधले कथनकार म्हणून अमरीश पुरी यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारच होऊ  शकत नाही. मी त्यांचा पत्ता शोधून काढला आणि जून २००२ मधल्या एका संध्याकाळी त्यांच्या जुहूतल्या ‘वरदान’ बंगल्यात पोहोचले. माझं सगळं ऐकून घेतल्यावर ते म्हणाले की, त्यांची फी एका दिवसासाठी एक लाख रुपये असेल. माझी पार निराशा झाली. मी त्यांचा निरोप घ्यायला उठले, पण त्यांनी मला थांबवलं आणि ते गंमत करत होते, असं सांगून आमचं जे बजेट असेल, त्यात हे काम करण्याची तयारी त्यांनी दाखवली. अशा प्रकारे आम्ही हिंदी कथन आधी रेकॉर्ड केलं. इंग्रजीतलं नॅरेशन कबीर बेदी यांच्या आवाजात केलं.

आता प्रश्न होता गुजराती अनुवादाचा. माझ्या स्क्रिप्टचा गुजरातीत अनुवाद करायचा होता. गुजराती नॅरेटर म्हणून दर्शन जरीवाला यांचं नाव पक्कं झालं आणि माझ्या हिंदी, इंग्रजी स्क्रिप्ट्सचा आधार घेऊन गुजराती अनुवादही त्यांनीच केला. स्क्रिप्टमधल्या विविध व्यक्तिरेखांना आवाज देण्यासाठी कलाकारांची बांधणीही दर्शन यांनीच केली. अशा प्रकारे, एका पाठोपाठ एक सगळ्या भाषांतली रेकॉर्डिग्ज पूर्ण झाली. कधी कधी यासाठी आख्ख्या रात्रीही जागवाव्या लागल्या. हे सगळं मंजुरीसाठी दिल्लीला पाठवलं आणि लगेचच मंजुरी मिळाली. आता वेळ खूप थोडा उरला होता. कारण, या शोचं उद्घाटन ३१ ऑक्टोबर, २००३ रोजी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवशी व्हावं अशी विश्वस्तांची इच्छा होती. वल्लभभाई पटेल यांनी

के. एम. मुन्शी यांच्या साथीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. भग्नावस्थेतल्या मंदिरांना त्यांचं गतवैभव प्राप्त करून देण्याची शपथ या काही नेत्यांनी घेतली होती. त्या वेळी सरदार पटेल म्हणाले होते, ‘मी मंदिराची पुनर्बाधणी करत नाहीये, तर मी भारताचं हृदय पुन्हा बांधतो आहे. या मंदिराचं गतवैभव परत आणणं हे आपलं सर्वाचं पवित्र कर्तव्य आहे.’ देशभरातल्या लोकांनी यासाठी पैसे उभे केले होते. शिवाय गुजरातच्या राजघराण्यातले दिग्विजय सिंह यांनी मोठी देणगी दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं नाव दिग्विजय दरवाजा असं आहे.

आता वेळ आली होती या शोमधल्या सर्वात उत्तम भागाबाबत निर्णय घेण्याची. हिमालयात प्रवास करताना मी पंडित जसराज यांचे भाचे रतन मोहन शर्मा यांचं गायन ऐकलं होतं आणि त्यांच्या आवाजाने भारावून गेले होते. मी त्यांची भेट घेतली आणि या शोमधली गाणी आणि संस्कृत श्लोक तेच गातील असं निश्चित झालं. त्यांना संस्कृतचे एक प्राध्यापक मार्गदर्शन करतील, असंही ठरलं. विख्यात गायक लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांचे पुत्र भवदीप जयपूरवाले यांनी पाश्र्वसंगीत आणि समूहगीतांची जबाबदारी सांभाळली. माझ्या शोजमध्ये मी स्वत:च संगीत संयोजन करते. तसंच या शोसाठीही मीच ते करायचं ठरवलं.

सगळ्या गोष्टी निश्चित झाल्यानंतर यात सहभागी होणाऱ्यांसाठी आम्ही दोन दिवसांची एक कार्यशाळा घेतली आणि मग उपनगरातला एक स्टुडिओ भाडय़ाने घेतला. पुढच्या सात रात्री आम्ही संगीत आणि संवादांचं रेकॉर्डिग केलं आणि हे रेकॉर्डिग सोबत घेऊन मी दिल्लीला गेले, संगीत आणि संवादांचा फायनल ट्रॅक तयार करण्यासाठी. तिथेही आम्ही संगीत, अवकाश, मध्यंतरं यावर काम केलं. बारीकसारीक चुका दुरुस्त करून शेवटचा हात फिरवला. संगीताचा प्रभाव वाढवण्यासाठी काही बदल केले. शेवटी हा संगीताचा ट्रॅक आणि नॅरेशन एकत्र करून ५८ मिनिटांचा कार्यक्रम तयार केला.

इथे पुन्हा विश्वस्तांच्या एका विनंतीमुळे मला थोडं थांबावं लागलं. स्क्रिप्टमधले सरदार पटेलांचे संवाद विख्यात अभिनेते परेश रावल यांच्या आवाजात घेण्याची ती विनंती होती. परेश रावल यांनी ‘सरदार’ या चित्रपटात पटेलांची व्यक्तिरेखा केली होती. मी घाईघाईने स्वरूप संपत-रावलला फोन केला आणि तिच्याकडून मदत मागितली. स्वरूप परेश रावल यांची पत्नी, तर माझी मिस इंडिया मैत्रीण. परेश तेव्हा हैदराबादमध्ये होते. त्यांच्याशी ती बोलली आणि तिने मला सांगितलं की, ते मुंबईत यायला तयार आहेत. फक्त मी त्यांना विमानतळावरून स्टुडिओत घेऊन जायचं होतं आणि रेकॉर्डिग झालं की त्यांना पुन्हा विमानतळावर सोडायचं होतं. मी स्वरूपने सांगितल्याप्रमाणे केलं. परेश आले, त्यांनी तिन्ही भाषांत संवाद रेकॉर्ड केले आणि त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा हैदराबादला गेले. अशा प्रकारे, संगीत आणि नाटय़ एकत्रित करून ट्रॅक पूर्ण झाला.

हा ट्रॅक आता शोच्या ठिकाणी आवश्यक ती उपकरणं बसवण्यासाठी इंजिनीअर्सच्या सुपूर्द करण्यात आला. ३१ ऑक्टोबर, २००३ ही उद्घाटनाची तारीख निश्चित झाली. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री जगमोहन उद्घाटन करणार होते. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही अन्य विशेष पाहुण्यांसह कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.

आता आमच्या रंगीत तालमी सुरू झाल्या. मी घडय़ाळाकडे न बघता अथक काम करत होते, कार्यक्रम परिपूर्ण व्हावा म्हणून प्रत्येक तपशिलाची काळजी घेत होते. हा कार्यक्रम आता उद्घाटनासाठी तयार आहे अशी खात्री पटल्यानंतर, पूर्ण समाधान झाल्यानंतर पहाटे मी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे निघाले, गेस्ट हाऊसमध्ये जाऊन थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून. नुकतंच तांबडं फुटू लागलं होतं आणि त्या लालसर प्रकाशात मला प्रवेशद्वाराशी पाचेकशे लोक थांबलेले दिसले. आणि मग ते भव्य दृश्य बघण्याची संधी मला लाभली- मंदिराचे भव्य दरवाजे हळूहळू उघडले आणि तिथल्या पुजाऱ्यांनी मला मंदिरात येण्याचं आमंत्रण दिलं. मी मागे वळले आणि मंदिराच्या दिशेने चालू लागले. पहाटे पहाटे शिवलिंगाच्या साधेपणाचं दर्शन घेऊन मी गेस्ट हाऊसकडे गेले. बाहेर प्रतीक्षेत असलेल्या भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडले गेले. मी दुपापर्यंत झोप काढून संध्याकाळच्या सोहळ्यासाठी सज्ज झाले.

जणू काही माझ्या पहाटेच्या प्रार्थनेला उत्तर म्हणून त्या संध्याकाळी सगळं काही ठरवल्याप्रमाणे पार पडलं. ‘साऊंड अ‍ॅण्ड लाइट शो’ प्रेक्षणीय झाला. सगळ्यांच्या प्रशंसेने मी रोमांचित झाले.

त्यानंतर सुमारे बारा वर्षांनंतर, काही महिन्यांपूर्वी, मी सोमनाथ मंदिरात पुन्हा गेले. आश्चर्य म्हणजे, भोवतालच्या परिसराचा कायापालट झाला आहे. मंदिराच्या भोवतालचा तो साधासुधा परिसर, छोटंसं खेडं नाहीसं झालंय. आज, सोमनाथ हे समुद्रकिनाऱ्यावरचं भव्य स्थळ झालंय. अवतीभवती बगिचे फुलले आहेत. सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त आहे. फरसबंद परिसर उत्तम सजवलेला आहे. हजारो भाविकांच्या मदतीसाठी कर्मचारीवर्ग सज्ज आहे. मंदिरातल्या विविध कार्यक्रमांचं वेळापत्रक आहे आणि ते काटेकोरपणे पाळलं जातं. कार्यक्रमांमध्ये सर्वाना सहभागी होता येतं. मी अपार कष्टाने आणि अत्यंत आनंदाने तयार केलेला शो रात्री आठ वाजता सुरू होतो. हा शो दाखवण्यासाठी हजार लोक बसू शकतील एवढं प्रेक्षागृह बांधण्यात आलंय. हे प्रेक्षागृह कायम खच्चून भरलेलं असतं. याचा अर्थ दर आठवडय़ाला काही हजार लोक हा शो बघतात. परिसरातली मंदिरं सुंदर सजवलेली आहेत आणि इथे येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आसपास हॉटेल्स-रेस्टोरंट्सची रेलचेल आहे. वाहतुकीच्या सर्व सोयी आहेत. एकंदर सोमनाथ हे पर्यटनाचं आणि तीर्थयात्रेचं मोठं केंद्र झालं आहे.

या सगळ्या बदलांच्या पाश्र्वभूमीवर मी तयार केलेल्या शोची लोकप्रियता बघणं हा माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद अनुभव होता. शोचं स्क्रिप्ट बांधण्यासाठी टीमसह मी रात्रंदिवस घेतलेली मेहनत मला शो बघताना आठवत होती. आयुष्यात काही तरी महत्त्वाचं केल्याची, मिळवल्याची भावना हा अनुभव मला कायम देत राहील.

भाषांतर – सायली परांजपे -sayalee.paranjape@gmail.com

विमला पाटील chaturang@expressindia.com