जगातल्या प्रत्येक ‘हव्याशा’ वाटणाऱ्या नाण्याच्या छापामागं ‘नकोसं’चा काटा आधीच कोरलेला असतो. दुसरी बाजू कुणाची कधी उलटून पाहिली जाईल, तेव्हा ती दिसते एवढंच.  काही गोष्टी बदलता येतात, पण अनेक गोष्टी ‘नकोशा’ म्हणून टळत नाहीत आणि ‘हव्याशा’ म्हणून मिळत नाहीत

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एखाद्या कंपनीच्या कार्यालयात अर्ज द्यायला जावं लागतं किंवा वॉक्-इन पद्धतीनं थेट मुलाखत द्यायला जावं लागतं. तिथल्या अत्याधुनिक यंत्रणा, स्वच्छता, कार्यपद्धती, संपर्क यंत्रणा, बठक व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा, उत्तम प्रकाश व्यवस्था-असं सारं पाहिलं की बाहेर पडताना अशी नोकरी हवीशी वाटते.

कधी तसा योग येतोही. पहिल्यांदा गेल्यावर अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. आपण आता बाहेर नसून ऑफिसमध्ये आत आहोत, याच्यावर कधी कधी विश्वास बसत नाही. मन सुखावतं. नवं काम, नवी माणसं, नवे संबंध-अशा अनेक गोष्टी समोर येत असतात. त्यात पहिले काही दिवस, काही महिने कसे निघून जातात ते कळत नाही. पहिल्या पहिल्यांदा तर रोज जाण्याची-पोचण्याची उत्सुकता असते.

पण काही दिवसांनी काय होतं कुणास ठाऊक, ते काम हळूहळू अंगवळणी पडतं. त्याच त्याच कामाचा कंटाळा येतो. कधी त्या कामात काही बदल मिळाला, तरी पुन्हा काही दिवसांनी तिथंही पुन्हा ते काम हळूहळू कंटाळवाणं वाटायला लागतं. तिथं काम करणाऱ्या माणसांचे पहिल्यांदा खूप उत्सुकतेनं संबंध ठेवले जातात. शिकण्याचा,  बरोबर काम करण्याचा आनंद असतो. पण त्यातही पुन्हा असं वाटायला लागतं की, बाहेरून आपल्याला जे एवढं अपूर्वाईचं वाटत होतं, ‘हवंसं’ वाटत होतं, तसं तेवढं इथं काही नाही!

माणसं चारचौघांसारखीच आहेत. त्यांच्यात स्पर्धा आहेत, हेवेदावे आहेत, मत्सर आहेत. सुरुवातीला आवरून बाहेर पडण्यातली उत्सुकता कमी होत जाऊन तेही कंटाळवाणं होतं. अनेकदा ते इतकं नकोसं वाटतं, की काही कारण सांगून, आज येत नाही म्हणून सांगावं असं वाटतं. ज्या ठिकाणी केव्हा एकदा जाईन म्हणून आवरून घडय़ाळाकडं पाहात असतो, त्याच घडय़ाळाकडं आता वेळ होत आली जावं लागणार, म्हणून पाहिलं जातं!

यात गमतीचा अनुभव पुढंच आहे. कंटाळवाणं वाटलं आणि शक्य असलं म्हणून महिनाभर रजा टाकली जाते. आठवडाभर आता घडय़ाळाचा काटा नाही, सक्तीनं आवरायला नको, तेच काम, तीच माणसं यांतलं आता काही नाही, म्हणून एकदम हलकंहलकं वाटतं. पुरुषांचा-महिलांचा वेळ निवांत उठण्यात, चहापाण्यात, जेवणात, नवीन पदार्थात, मित्रमंडळींच्याकडं चक्कर टाकण्यात, आवडीच्या वाचनांत, फोन करण्यात, मनोरंजनात जातो. पहिले दोन-तीन दिवस वाटतं, बसऽऽऽ, हे आपल्याला ‘हवंसं’ वातावरण आहे. एखादा आठवडा जातो, नंतर पुन्हा हळूहळू हे मोकळेपणही बरोबर आहे की नाही, अशा शंकेनं सुरुवात होते. निवांत बसण्याचा, फिरण्याचा, खाण्याचा कंटाळा वाढायला लागतो. रजेवर असताना फोन करायचा नाही, असं ठरवलेलं असूनही दोन आठवडे गेले की असं वाटतं, सहज बघू तरी, सध्या तिकडे काय चालू आहे. फोनवरचा सहकारी नेमका उत्साहात असतो. कोणाची बदली, कुठली नवीन स्कीम, नवं प्रोजेक्ट-असली माहिती उत्साहानं सांगतो.

मग मात्र मन बंड केल्यासारखं उठून बसतं. रजा घेऊन मिळालेला निवांतपणा आता ‘नकोसा’ वाटायला लागतो. तो आता ‘आळशीपणा’ वाटतो. असंच काय नुसतं लोळत राहायचं, नेहमीचं काम सुरू झाल्याशिवाय आपल्याला उत्साह येणार नाही असं वाटतं. त्याच उत्साहात कुणा वरिष्ठांना फोन केला जातो. माझी रजेतली कामं आवरली आहेत, उरलेली रजा रद्द करून उद्यापासून हजर व्हावं असं म्हणतो, असं सांगितलं की, ते एकदम उत्साहानं, या, या म्हणतात. मग ऑफिसला जाणं फारच ‘हवंसं’ आणि बरोबर वाटायला लागतं. दुसऱ्या दिवशी उत्साहानं पाच मिनिटं आधीच ऑफिस गाठलं जातं. दोन-चार महिने गेले की पुन्हा रजा, घरचा निवांतपणा ‘हवासा’ वाटायला लागतो.

हे इथंच संपत नाही. तसंच ते ऑफिसपुरतंच किंवा मोठय़ांपुरतंच मर्यादित असतं असं नाही. लहान मूल कुठंतरी कुठला तरी खेळ बघतं, त्याला तो ‘हवासा’ वाटतो. तो खेळ घरी आणलेल्या दिवशी मूल तासन्तास खेळत बसतं.  मग ते ठोकळे जुळवायचा कंटाळा यायला लागतो. तोवर कुठंतरी खेळण्यातली गाडी दिसते.  झोपतानासुद्धा ती गाडी मुलाला उशाशी लागते. इतकी ती ‘हवीशी’ वाटते! हवीशी वाटणारी ती गाडी चार-आठ दिवस स्वत: खेळली जाते, मित्रमंडळींना दाखवून होते. मग हळूहळू खेळण्याचं प्रमाण कमी होतं. मग ती सरळच चालत नाही, तिच्यातला दिवाच लागत नाही-असल्या काहीतरी कुरबुरी सुरू होतात. ती इतकी ‘नकोशी’ होते की, कुणा मित्राला देऊन टाकायलासुद्धा मूल तयार होतं. मग ठोकळ्याशेजारी आता एक गाडी दाखल होते. तोवर तिसरं काहीतरी ‘हवंसं’ वाटायला लागलेलं असतं.

मुलांचं एकवेळ सोडून देऊ. पण आधी पाहिलं तसं, मोठय़ांचंही वेगेवगळ्या पातळीवर तेच चालू असतं, हे क्वचित लक्षात येतं. एखाद्या ड्रेसचा कंटाळा येतो, दुसरा कुठला तरी नवीन, कुणाचा तरी पाहिलेला ‘हवासा’ वाटतो, कधी आणीन असं होतं, आणला जातो. पहिला कपाटात जाऊन पडतो. नवा ‘हवासा’ असलेला दोन दोन, तीन तीन दिवस उत्साहानं घातला जातो. कुणीतरी छान म्हणतं, बाकीचे बरेचसे कुणी काही म्हणतच नाहीत. पुढच्या आठवडय़ात वाटायला लागतं, पहिलाच छान आहे. पुन्हा आधीचाच ‘हवासा’ वाटतो आणि अगदी गणवेश असल्यासारखा घालायला सुरुवात होते. पुन्हा काही दिवसांनी ये रे माझ्या मागल्या होतं.

हेच एखाद्या लग्नाळू मुलाचं किंवा मुलीचं होतं. मुलीला वाटतं ते घर किती छान आहे. ‘हवंसं’ असतं, मिळतं. काही दिवस छान जातात. नंतर एखाद्या दिवशी घरातला पदार्थच आवडत नाही, कुणाचं बोलणंच आवडत नाही, कुणाचे नातेवाईक पसंत पडत नाहीत. त्यात पुन्हा आपल्या पतीनं त्यांचं सगळं बरोबर आहे असं म्हटलं किंवा त्याला त्यात न पटण्यासारखं-पसंत न पडण्यासारखं असं काही वाटलंच नाही, तर एकदम तो ‘हवासा’ मुलगाच बरोबर नाही आणि हळूहळू ‘नकोसा’ वाटायला लागतो. आपण आधी छान होतो, कुठल्या या माणसांत येऊन पडलो असं वाटतं. तो नको, ती माणसं नको, तसले ते नातेवाईक नकोत, ते घर नको-सगळं असं ‘नकोसं’ होऊन जातं!

हे असं किती ठिकाणी घडत असतं. माणसाला एखादं सामाजिक कार्य ‘हवंसं’ वाटतं, केलं जातं. मग तिथले पदाधिकारी, त्यांची एकमेकांतली वितुष्ट, न पटणारे व्यवहार-असं करीत करीत आधी इतकं ‘हवंसं’ वाटलेलं ते कार्य ‘नकोसं’ होऊन जातं! काहींना पर्यटन स्थळं ‘हवीशी’ वाटतात. जाण्यासाठी ते आटापिटा करतात. अनेकदा, खट्ट होऊन परत येतात. निदान पुन्हा न जाण्याइतपत तरी ते ‘नकोसं’ होतं. असं अनेक बाबतीत दिसेल.

खरं तर हे ओळखावं की, जगातल्या अशा प्रत्येक ‘हव्याशा’ वाटणाऱ्या नाण्याच्या छापामागं ‘नकोसं’चा काटा आधीच कोरलेला असतो. दुसरी बाजू कुणाची कधी उलटून पाहिली जाईल, तेव्हा ती दिसते एवढंच. हेही लक्षात येईल की, काही गोष्टी बदलता येतात, पण अनेक गोष्टी ‘नकोशा’ म्हणून टळत नाहीत आणि ‘हव्याशा’ म्हणून मिळत नाहीत, म्हणून मुळातच त्या पेचात न अडकणं उत्तम! मनाला वाटणाऱ्या तात्कालिक सुखाच्या, गरजांच्या, अपेक्षांच्या, बदलांच्या, नावीन्याच्या ओढीपोटी असे अनेक ‘हवेपणा’चे छाप उचलले जातात, हे लक्षात घेतलं, तर दुसऱ्या बाजूचा काटा गृहीत धरला जाईल, त्रास कमी होईल, नाणी फेकली जाणार नाहीत.

जे विचार करून आणखी पुढं जाऊ शकतील, ते मुळातच मनाच्या या ‘हवं-नको’च्या पेचातूनच सुटतील. कारण, शाश्वत आनंद मनाच्या या ‘हवं-नको’च्या पेचाच्या पलीकडं जाण्यात आहे. ज्यांचं ध्येय ‘हवं-नको’च्या पलीकडं जाण्याचं असतं, त्यांना या ‘हवं-नको’च्या गतिरोधकांनी त्या ध्येयाची सावधानता येते. मग आयुष्याच्या वाटेवर लागणारे हे ‘हवं-नको’चे गतिरोधक ते अलगद पार करीत ध्येय गाठतात.  ‘हवं-नको’च्या पलीकडच्या शाश्वत आनंदापर्यंत सावधानतेनं, प्रयत्नपूर्वक जाण्याची झेप फक्त आपल्या या मनुष्यजीवनातच आहे!

सुहास पेठे drsspethe@gmail.com