आज उजाडला की, काल संपलेला आहे, मृतवत् आहे, ही जाणीव कालच्या ओझ्यांपासून मुक्त व्हायला आपल्याला मदत करील. आज जसा आहे तसा आनंदानं जगता येईल. तेच ‘उद्या’च्या बाबतीत. उद्यासाठीचा विचार, नियोजन, त्यानुसार आज करायची कामं यांना ‘आज’ जरूर स्थान आहे. पण ‘उद्या’ची काळजी, चिंता, भय यांनी आज दबून जायचं काहीच कारण नाही.

सकाळची कार्यालयीन वेळ. बारानंतर साहेबांच्या केबिनमधून एक सूचना आली की, एक वरिष्ठ अधिकारी काही वेळातच ऑफिसमध्ये स्पॉट व्हिजिटसाठी येत आहेत. थोडय़ाच वेळात त्या साहेबांची कार बाहेर थांबली. सॅल्यूट करून दार उघडणाऱ्या दरवानाकडं ओळखीचा कटाक्ष टाकून ते त्यांच्याबरोबरच्या सचिवासह साहेबांच्या केबिनमध्ये गेले. केबिनमधले साहेबही पटकन पुढं आले, त्यांनी स्वागत केलं. पंधरा ते वीस मिनिटांत त्यांच्या हातातल्या कागदांवरून, उलगडत असलेल्या फाईलवरून, ते सचिवांना लिहून घ्यायला सांगत असलेल्या सूचनांवरून, काम महत्त्वाचं आहे आणि ते काम चटकन उरकलं जाणार याचा अंदाज, बाहेरून आतली चाहूल घेणाऱ्यांना लागला.

वरिष्ठ अधिकारी स्वत: एकटेच बाहेर आले. वेगवेगळ्या विभागांत जाऊन त्यांनी प्रत्येकाला ओळख दिली. तिथंच एक टेबलवर असलेल्या व्यक्तीजवळ ते थांबले. ‘येस रोहितजी’ अशी वैयक्तिक ओळखीनं सुरुवात करून त्यांच्याशी चार शब्द बोलले. आले तितक्याच वेगानं ते बाहेरही पडले.

काही माणसं उठून ‘रोहितजीं’च्या टेबलाजवळ आली. नवीन मंडळींना उत्सुकता होती, यांची काही खास ओळख असावी. रोहितजींच्या चेहऱ्यावर मात्र कोरडेपणा आणि थोडे त्रासिक भाव होते. ओळखीचा उल्लेख इतरांनी केल्यावर ते म्हणाले, ‘‘ते आपलं तुमच्यावर इम्प्रेशन टाकायला ठीक आहे. मी काही त्याला आज ओळखत नाही. फार पूर्वीपासून ओळखतो.’’ विचारणारी मंडळी ऐकतच राहिली. ‘‘माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहानच. वयानं आणि नोकरीतही. प्रमोशनचा अभ्यासही आम्ही बरोबर केला. तो लकी ठरला. पहिल्या प्रयत्नात पास होऊन आता कुठल्या कुठं गेला. आम्ही राहिलो आहे तिथंच!’’ कुणी तरी म्हणालं, ‘‘पण त्यांनी एवढय़ा गडबडीत थांबून तुमची आदरानं चौकशी केली!’’ रोहितजींच्या चेहऱ्यावर फारसा बदल झाला नाही, ‘‘तो आपला देखावा!’’

डायोजेनिसची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एके दिवशी दिवसाढवळ्या दुपारी हातात कंदील घेऊन रस्त्यावरून जाताना त्याला अनेकांनी पाहिलं. तशी त्याची थोरवी लोकांना माहीत होती. असेल काही तरी नवीन प्रकार म्हणून काहींनी दुर्लक्ष केलं. काही त्याच्यावर विचार करीत पुढं निघून गेले. तो मात्र रात्रीच्या अंधारात एखाद्या माणसाच्या चेहऱ्याकडं कंदिलाच्या प्रकाशात पाहावं, तसं भर सूर्यप्रकाशात पाहात, निरीक्षण करीत पुढं चालत होता. त्याची थोरवी जाणणाऱ्या एकानं मात्र त्याला जवळ आल्यावर थांबवलं, आणि विचारलं, ‘‘एवढय़ा भर उन्हात आपण कंदील लावून काय शोधत आहात?’’ डायोजेनिस म्हणाला, ‘‘मी माणूस शोधतोय.’’ त्यावर आश्चर्य वाटून त्याला थांबवणाऱ्या सद्गृहस्थानं विचारलं, ‘‘अहो ही इतकी माणसं रस्त्यावरून जात-येत आहेत आणि तरी तुम्ही माणूस शोधताय?’’ डायोजेनिस शांतपणे म्हणाला, ‘‘हो, मी माणूसच शोधतो आहे. तुम्हाला वाटताहेत, दिसताहेत, त्या माणसांच्या आकृती आहेत. पण मला मात्र खऱ्या अर्थानं माणूस भेटला नाही.’’

जगात अशी अब्जावधी माणसं जगत आहेत. ती माणसं आहेत, तशी त्यांची आणि इतरांची समजूतही आहे. तरीसुद्धा माणसात अपेक्षित असलेल्या, त्याला खऱ्या अर्थानं माणूस ठरवणाऱ्या ‘माणुसकी’चे गुण असलेली, एवढय़ा अब्जावधी माणसांत किती माणसं आपण ‘माणूस’ म्हणून दाखवू शकू? विचार केला तर उत्तर कुठं तरी हजार-पाचशे माणसांवर येईल. तसंच आपल्यासह आपल्याभोवती, लक्षावधी माणसं जगतात, अगदी आपल्याबरोबर, संपर्कात. ती सारी आपल्या डोळ्यांसमोर आज जगताहेत. पण त्या हजारो माणसांतली किती माणसं ‘आज’ जगत आहेत? असं विचारलं तर उत्तर ‘सगळी’ असं देता येत नाही. कारण विचार करायला लागलं की, लक्षात येतं, की आधी उल्लेख केला तसे किती तरी ‘रोहितजी’ आपल्यात आहेत. ते आज जगताना दिसत आहेत, पण या कालच्याच नव्हे तर कधीच्या तरी भूतकाळातल्या गोष्टींची ओझी डोक्यावर घेऊन जगत आहेत. त्यामुळं ‘आज’च्या जगण्यात, वर्तमानात त्यांना त्रागा आहे, त्रास आहे. स्वत: भूतकाळात जगून आपल्या वातारणातसुद्धा तसेच नकारात्मक भाव पसरवीत आहेत.

आज वास्तविक यांना नोकरी आहे, पगार आहे, सुखवस्तू जीवन आहे. पद नसेल पण अर्थातच त्या पदाचे त्रासही त्यांना आज नाहीत. त्यामुळं आज वर्तमानात आनंदात राहायला, आहे त्यात आनंदी जीवन जगायला खरं काहीच अडचण नाही. उलट ‘आज’चा विचार केला तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पद, पसा, प्रतिष्ठा याबरोबर असलेले त्रास, ताणही आहेत. पण त्यांनी त्याचा आज वर्तमानात जगताना कुठं गोंधळ होऊ दिलेला नाही, उलट आजही त्यांच्या एके काळच्या सहकाऱ्याबद्दलच्या मित्रत्वाची, आदराची भावना ते ‘आज’ही टिकवून आहेत. ‘आज’ जगण्यातला आनंद ते स्वत: घेत आहेत आणि इतरांनाही देत आहेत. उलट हे ‘आज’ जगण्याकडं दुर्लक्ष झाल्यामुळं आजच्या किती तरी आनंदांना मुकलेले आहेत. ‘काल’ – भूतकाळात – जगत असल्यामुळं अधिकाऱ्यांनी आज यांना दिलेल्या आनंददायी आदरालासुद्धा ते ‘देखाव्या’चा रंग अकारण फासून स्वत:च दु:खी झालेले आहेत.

जगतात तर सगळेच. पण खऱ्या अर्थानं ‘आज’ जगणारे खूप कमी असातात! जे केवळ ‘आज’ जगतील, ते सरळ, सहज, अधिक आनंदी जीवन जगू शकतील. हे कुठल्याही क्षेत्रात लहान-मोठय़ांना, स्त्री-पुरुषांना सर्वाना करण्यासारखंही आहे आणि आनंददायीही आहे. पण आपल्या असं लक्षात येईल की, ‘आज’चा आनंद माहीत नसल्यामुळं, सावधानता नसल्यामुळं, किंवा जगण्याचं धाडस नसल्यामुळं माणूस कालची ओझी-संबंध, कल्पना, स्थिती, अपेक्षा-डोक्यावर घेऊन आज जगताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला ‘उद्या’ किंवा भविष्यात काय व्हावं, होणार, त्या विषयीच्या कल्पना, चिंता, काळजी, अनिश्चितता – यांचीही ओझी डोक्यावर घेऊन जगताना दिसेल.

लहानपणची श्रीमंती, लाड, इतरांकडून होणारं कौतुक – याला त्या त्या वेळेला महत्त्व असतं. आज कदाचित सारं जरुरीपुरतं असेल, त्याचा आनंद आजच्या जगण्यात आहे, पण आजचं ‘आज’ जगलं तरच! कदाचित परिस्थिती ही याच्या उलटही असू शकते. आज श्रीमंती असेल, उच्च शिक्षण असेल, त्याचा आनंदही आजचा ‘आजच’! त्यात जुनी गरिबी, अशिक्षितपणा, लोकांकडून अशांमुळं झालेले अवमान – या गोष्टी विसरून एक तर त्यांच्याबद्दल दुर्भाव किंवा आपल्या कर्तृत्वाचा अहंकार असं ‘आज’मध्ये मिसळायचं काही कारण नाही. असं आज वर्तमानात जगता आलं तर कालचा मत्सर आज प्रेम करण्यात आड येत नाही, कालची आपुलकी आजचा दुरावा स्वीकारण्यात आड येत नाही. कालचं शत्रुत्व आजची मत्री स्वीकारण्यात आड येत नाही. या आणि अशा अनेक गोष्टी आपलं आजचं जीवन हलकं, आनंदी आणि मुक्त करतात!

तीच गोष्ट कालची. माणसं, कालचे संबंध,‘आज’च्या जगण्यात आणतात. काल कुणाकडून त्रास, अवमान, सुखदु:ख झालं असेल, पण ते ओझं ‘आज’च्या दिवसावर ठेवू नये. आज हा ‘आज’ आहे. तो जसा माझा बदलला तसा तो इतरांचाही बदलू शकेल. मग आज जे घडेल, जो भेटेल, जो जसा वागेल, तसं त्याच्याशी मोकळेपणानं, तणाव न घेता, सहजतेनं वागता येईल. ते ‘आज’च्या जगण्यातला आनंद काय असतो, त्याचा अनुभव आपल्याला देईल. मग जुने राग, लोभ, अपमान, दु:ख, अपेक्षाभंग – असल्या गोष्टींनी अनेकांना आलेली आजची जगण्याची चांगली संधी वाया जाते.

याचा अर्थ ‘काल’ला काहीच किंमत नाही, असं नव्हे. त्यातून ‘उद्या’ अधिक चांगला जगण्यासाठी शिकण्यासारख्या काही गोष्टी जरूर मिळतील. काल जमवलेली तांत्रिक माहिती, शिक्षण यांचाही आज उपयोग करून घेता येईलच. पण आज उजाडला की, काल संपलेला आहे, मृतवत् आहे. ही जाणीव कालच्या ओझ्यांपासून मुक्त व्हायला आपल्याला मदत करील. आज जसा आहे तसा आनंदानं जगता येईल. तेच ‘उद्या’च्या बाबतीत. उद्यासाठीचा विचार, नियोजन, त्यानुसार आज करायची कामं यांना ‘आज’ जरूर स्थान आहे. पण ‘उद्या’ची काळजी, चिंता, भय यांनी आज दबून जायचं काहीच कारण नाही. कालच्या चुकांतून शिकलेलं आज उपयोगी पडतं. कालच्या उपकारांची जाणीव आजचं जीवन समृद्ध करते. उद्याच्या हितासाठी केलेलं नियोजनही उपयुक्त आहे. त्यात आज मोकळेपणानं जगल्यामुळं मिळणाऱ्या संधी ही दुधात साखर आहे!

मग नोकरीत काल एखादा हाताखाली असेल तर मार्गदर्शनाचा आनंद, आज बरोबर असेल तर सहकाऱ्यानं काम करण्याचा आनंद आणि उद्या तोच आपला वरिष्ठ असेल, त्याच्याकडून मार्गदर्शन, निर्णय घेऊन जगण्यातला आनंद – तिन्ही वेळी समानच राहतील! काल मूल म्हणून सांभाळण्यात, आज कर्तबगार तरुण म्हणून पाहण्यात आणि उतारवयात तो करीत असलेली सेवा घेण्यात – आनंद समानच असेल. असंच सगळीकडे कुटुंबात, माणसांत, वेगवेगळ्या संबंधात घडेल!

‘काल’ ही कधीच निघून गेलेली गाडी आहे. त्यात ‘आज’ बसायला जाऊ नये. ‘उद्या’ ही कदाचित येणारी किंवा कधी न येणारी गाडी आहे. त्यामुळं तिची काळजी केली तरी त्यात आज बसता येणार नाही. ‘आज’ आपण सहज, सरळ आणि थेट समोर उभ्या असलेल्या ‘आज’च्याच गाडीत प्रवेश करू शकतो, बसू शकतो, जगण्याची खरी संधी ‘आज’हीच आहे.

त्यासाठी फक्त ‘आज’च्या आनंदाची विद्या येत असावी! ती आली तर अर्थात हेही लक्षात येईल, की हजारो माणसं दिसत असूनही डायोजेनिसला जसा ‘माणूस’ शोधावा लागला, तसं आपल्याला आज जगणारी हजारो माणसं दिसली तरी ‘आज’ – वर्तमानात जगणारा माणूसही असाच शोधावा लागेल! निदान आपण तरी तसं होऊ शकू. आनंदाची गरज आपल्याला तरी आहेच ना!

सुहास पेठे drsspethe@gmail.com