माझी प्रगती भलेही थोडी कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान होऊ  नये अन् प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे, ही भावना असणे हे माणूसपणाचे लक्षणच.

एका नावाजलेल्या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या, श्रीमंत आणि हुशार पल्लवीची मध्यमवर्गीय पण खूपच हुशार असलेल्या  वर्गातील हेमाशी स्पर्धा असायची. पदव्युत्तर शिक्षणाकरिता त्याच महाविद्यालयाकडून स्पर्धात्मक शिष्यवृत्ती परीक्षा नेहमीप्रमाणे घेतली गेली. हेमापेक्षा पल्लवीला चारच गुण जास्त मिळाले. या शिष्यवृत्तीचा फायदा असा की त्यामुळे तिला दोन वर्षे प्रशिक्षणाकरिता जायला मिळणार होते.

अर्थात शिष्यवृत्ती मिळाली नसती तरी तिचे वडील तिला देशातच उत्तम महाविद्यालयामध्ये त्या प्रशिक्षणाकरिता पाठवू शकत होते. हेमाला मात्र हे शक्य नव्हते. शिष्यवृत्ती नाही मिळाली तर तिला नोकरी करणे भाग होते. हा विचार करून पल्लवीने विश्वस्तांकडे जाऊन विनंती केली, ‘‘ही शिष्यवृत्ती तुम्ही हेमाला दिली तर, तिचे नुकसान न होता, होणारा फायदा तिच्या दृष्टीने खूप मोठा असेल. कृपया शिष्यवृत्ती तिलाच द्या.’’

विश्वस्त हे ऐकून आश्चर्यचकित झाले. पल्लवीच्या मनाचा मोठेपणा वाखाणण्याजोगाच होता. हेमाचे नुकसान होऊ  नये म्हणून तिला स्वत:ची प्रगती थोडी कमी झालेली मान्य होती. विश्वस्तांनी या वर्षी विशेष बाब म्हणून हेमाला पूर्ण आणि पल्लवीला अर्धी शिष्यवृत्ती दिली.

कमलेश हा सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग करणारा आपल्या क्षेत्रातला हुशार माणूस म्हणून प्रसिद्ध आहे. कोणतीही लहान-मोठी समस्या तो चुटकीसरशी सोडवतो, त्यामुळे प्रगतीची शिडी तो पटापट चढत होता. ऑफिसमध्ये इतरांना कोणतीही मदत तो आनंदाने करत असे. त्यानेच मिळवलेल्या एका मोठय़ा आणि महत्त्वाच्या कराराचे काम सुरू झाले. दोन वर्षांत काम पूर्ण करून देताना तारांबळ उडणार आहे हे माहीत असल्याने त्याने विनोद आणि प्रेमा या दोन हुशार, कामसू असणाऱ्यांना त्याने प्रोजेक्टमध्ये काम दिले. सगळे हिरिरीने कामाला लागले. महत्त्वाकांक्षी लोकांना आपापली कार्यक्षमता, कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली.

विनोद आणि प्रेमाने खूपच मेहनत केली. चौकटीच्या बाहेर जाऊन, इतरांच्या वाटय़ाची कामे करून प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण केले. प्रेझेंटेशन यशस्वी झाल्याने ग्राहक, वरिष्ठ, सहकारी सगळेच खूश होते. खूपच छान काम झाल्यामुळे कमलेशला सीनियर मॅनेजरची जागा देऊ  केली गेली. यशाचे खरे धनी, मुख्य वाटेकरी विनोद, प्रेमा आहेत. एक वेळ मला बढती देऊ  नका, पण त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला, इन्सेनटिव, अ‍ॅप्रीसिएशन मिळाले पाहिजे, असे त्याने वरिष्ठांना सांगितले. वरिष्ठांनाही ते पटले आणि त्यांनी त्याला बढती दिलीच, पण त्याचबरोबर त्या दोघांनाही योग्य तो  मोबदला दिला.

गीता ग्रामोपाध्ये – geetagramopadhye@yahoo.com