‘आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दु:ख नसतेच असे नाही, फक्त त्यांना दु:खाशी दोन हात करण्याची कला साधलेली असते.’
नेहमी चेहरा उदास ठेवून आपलं दु:ख सर्वासमोर प्रकट करणे काहींना आवडत नाही. प्रत्येकाला काही तरी अडचणी असतात. त्यांच्यावर मात करून आनंदी आयुष्य जगलं पाहिजे. हे अवघड असेल पण अशक्य नाही. बिकट परिस्थितीशी झगडा देऊन आनंदाने जगणारा ऑस्कर गोव्याच्या एका छोटय़ा गावातील समुद्रकिनारी राहतो. आई कार्ली बाजारात मासे विकायची. वडील सालोमन उत्तम ड्रायव्हर होते. पर्यटकांना स्वत:च्या कारमधून प्रेक्षणीय स्थळे ते दाखवत, गाइडचे काम तेच करीत. चांगली कमाई व्हायची. ऑस्करला अभ्यास अजिबात आवडत नसे. बारावीनंतर त्याने पुढे न शिकण्याचा निर्णय आई-वडिलांना सांगितला. त्यांना वाईट वाटले. पण ‘तुला जे आवडते ते कर, आम्ही कोणतीही जबरदस्ती करणार नाही,’ हे त्यांचे म्हणणे ऐकून तो खूश झाला. वडिलांचा व्यवसाय आधुनिक पद्धतीने करायचा त्याचा मानस होता. पण वडील अचानक वारले. दु:खाचा डोंगर कोसळला. कार्ली आणि तो सैरभैर झाले. जवळच्यांनी आधार दिला, मदत केली. दु:खातून बाहेर निघताना साथ दिली. हळूहळू दोघे आनंदात राहू लागले. ऑस्करने व्यवसाय वाढवताना शिल्लक संपविली, थोडे कर्ज काढले. एक पॉश कार घेतली. चेहऱ्यावर दु:ख, उदासी असली तर पर्यटकांना आवडत नाही, आपण सतत हसतमुख असलं पाहिजे हे त्याला पटलं. तो उत्तम इंग्रजी बोलत असे, त्याचाही फायदा झाला. गेलेलं माणूस आपण कितीही रडलो तरी परत येणार नाही, हा विचार करून कार्लीसुद्धा छान कपडे घालून कधी कधी एखाद्या ग्रुपबरोबर जाऊ लागली. हास्य-विनोद करत स्थळांची माहिती देऊ लागली.
ऑस्करने ऑफिस थाटलं. व्यवसायात मित्रांना कामं दिली. दु:ख बाजूला ठेवून आनंदाने काम केल्याचा फायदा सात-आठ जणांना झालाच, आनंदाचं झाड अंगणात असावं असं आजूबाजूच्यांना वाटू लागलं.
दु:खाशी दोन हात करत आनंदाने पाळणाघर चालवणारी मीनल ही पंचवीस वर्षांची तरुणी. दहा वर्षांची असताना आई-वडील पाठोपाठ गेल्याने तिला फार नैराश्य आलं. सर्वात मोठा भाऊ कपडय़ांच्या व्यवसायात स्थिरस्थावर होता. वडिलांनी पैसे ठेवले होते. त्यामुळे आर्थिक प्रश्न नव्हता. शाळेत असताना तिच्या आजाराविषयी कोणाच्या काही लक्षात आले नाही. दहावी-बारावी करताना तिच्या वागण्यातील फरक भावाच्या लक्षात आला. तज्ज्ञांची औषधे, तिला सतत माणसांच्या संपर्कात ठेवणे, आवडीचीच कामं करायला सांगणे असे उपचार सुरू झाले. पण तिने स्वत: प्रयत्न करायलाच पाहिजेत, असे डॉक्टरांनी बजावून सांगितले. थोडी पथ्ये पाळल्यानंतर, मनात येणारे विचित्र विचार येत नाहीत असं तिचे तिलाच पटलं. तिला मुलांशी खेळायला फार आवडायचं. मग ती शेजारच्या मुलांना शाळेत नेऊ -आणू लागली, त्यांचा अभ्यास घेऊ लागली. आपोआपच ती आनंदी दिसू लागली. भावाच्या बायकोच्या मदतीने एक छोटा फ्लॅट घेऊन तिने फक्त चार मुलांचे पाळणाघर सुरू केले.
दु:खाला न जुमानता आनंदाने राहिले तर आयुष्य खूप सुंदर आहे हा अनुभव मीनलला आला. मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडे आवर्जून जाणे-येणे, मन आनंदी ठेवण्याकरिता नाटक, सिनेमा, कधी पिकनिकला ती जाऊ लागली. दु:ख,निराशा बाजूला सारून आनंदात राहिल्याने भाऊ -वहिनीच्या चेहऱ्यावरही हसू दिसते आहे हे पण तिला कळले. दु:ख उगाळत न बसता आपल्याबरोबर इतरांचे आयुष्य आनंदी केले पाहिजे, असं ठरवून ती पाळणाघरात मन रमवू लागली.

गीता ग्रामोपाध्ये
geetagramopadhye@yahoo.com

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
autism spectrum disorder
Health Special: स्वमग्नता (autism spectrum disorder) म्हणजे काय? उपचारांवर लक्ष केंद्रित करा…
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
Personality Traits According to Zodiac Signs in Marathi
Personality Traits : प्रेमात पडण्यापूर्वी ‘या’ राशींचे लोक खूप वेळ घेतात; सहज प्रेमात पडत नाही