‘‘मी कसं जगावं हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार फक्त मलाच आहे.’’ पंचवीस तीस स्त्रियांसमोर उभी  राहून एक नीटनेटकी दिसणारी, छानशी साडी नेसलेली पन्नाशीची स्त्री तावातावाने बोलत होती. चार इमारतींच्यामधील प्रांगणात हा कार्यक्रम सुरू होता. खरं तर याला कार्यक्रम म्हणणे योग्य नाही, कारण ती महिला दुखावलेली दिसत होती. मी ज्यांना भेटायला गेले होते त्या काकू तिथेच बसलेल्या दिसल्या. पाच मिनिटांतच सारं काही माझ्या लक्षात आलं. ती जी बोलत होती तिच्या पतीचं सहा महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं. व्ही.आर.एस. घेतलेली ‘ती’ एकटीच राहत होती. पण सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांशी संलग्न होती. अनेकांना मदत करत होती. त्यासाठी तिला बाहेर पडणं गरजेचंच होतं आणि टापटिपीची तिला सवय असावी. ती रोज चांगली साडी नेसून, एखादा मॅचिंग दागिना घालून कामाकरिता जाई.

आजूबाजूच्या कोणालाच तिचं हे वागणं पसंत नव्हतं. तिला येता जाता टोमणे ऐकावे लागत. ‘नवरा गेल्याचं हिला दु:ख नाही. डोळ्यात कधी पाण्याचं टिपूस दिसत नाही.’ अशी बोलणी ऐकून ती वैतागली होती. म्हणून तिने इमारतींतल्या सगळ्या महिलांना  प्रांगणात बोलावलं होतं. तिनं आपली कैफियत मांडायला सुरुवात केली. ‘‘माझ्यावर जी वेळ आली आहे ती कोणावर येऊ  नये. पण दोघांपैकी एक कोणीतरी आधी जाणारच. मागे राहील त्याने उरलेलं आयुष्य रडत कुढत काढू नये. मी फाटके कपडे घालून घरात रडत बसले तर गेलेलं माणूस परत येणार नाही. मला वाईट वाटतं, दु:ख होतंच, माझ्या भविष्यात काय आहे मला माहीत नाही म्हणून मी रोज सर्वासमोर उदास चेहरा घेऊन बसणे हा दु:ख व्यक्त करण्याचा मार्ग नाही. त्याच त्या गोष्टी उगाळत राहिले तर नैराश्य येईल. त्यापेक्षा आवडणाऱ्या कामात मन रमवते, सतत माणसांच्या संपर्कात राहाते. मन शांत आणि आनंदी ठेवण्याचा तो उत्तम उपाय आहे. तुम्ही माझं दु:ख वाटून घेऊ  शकत नाही, पण ते वाढणार नाही याची तरी काळजी घ्यायला नको का? आपण एकमेकींना मदत केली पाहिजे. आपल्या सोसायटीत मी एकटीच विधवा नाही. माझं सांगणं आहे की, नवरा नाही म्हणून आयुष्यात काहीच नाही, असं न समजता जे करायला आवडते ते करा. तुमच्यापैकी कोणीही माझ्याकडे आलं तरी मी मदत करायला तयार आहे. तुम्ही ठरवा काय ते.’’ असं म्हणून सर्वाना नमस्कार करून ती  निघून गेली. मला तिचं बोलणं पटलं. मनात घर करून बसलं.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस: जनतेला दरवेळी मूर्ख बनवता येत नाही

काही महिन्यांनी मी काकूंना फोन केला. त्या म्हणाल्या, ‘‘अगं, तिच्या बोलण्याचा खूपच सकारात्मक परिणाम स्त्रियांवर झाला. अनेकींनी स्वत:ला तिच्याशी बांधून घेतलं. फक्त विधवाच नाही, तर दुपारी काही काम नसणाऱ्या काही जणी हल्ली लहान मुलांचे कपडे शिवून तिला मुलांना वाटायला देतात. गाणं शिकायचं होतं राहून गेलं, असं म्हणत त्यातल्या दोघी गाणं शिकायला जातात, तर एकीने प्रौढांना शिकवायला सुरुवात केली आहे. ’’ संवाद साधण्याने केवढा फरक पडला होता. माझं आयुष्य माझं आहे हे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे हे सांगत असतानाच, तुमच्या हातात तुमचं आयुष्य घ्या, हेही किती सहजपणे सांगून गेली होती ती.

 

गीता ग्रामोपाध्ये

geetagramopadhye@yahoo.com