‘‘काय फायदा तुमची महागडी फी देऊन? डॉक्टर, दुकानदाराला या गोळ्या परत घ्यायला लावा अन् मला माझी फी परत द्या!’’ एव्हाना मी पुढच्या औषधोपचाराची दिशा मनात लिहायला सुरुवात केली होती, तो त्याच्या या वाक्याने लेखणी मनातच थबकली. माझ्या संतापाचा फणा मान वर करायला लागला. हृदयाच्या ठोक्यांनी एकदम तिसरा गीयर टाकला. तोच एक अघटित घडले. माझ्या मनाने ‘यू टर्न’ घेतला आणि..

क्रोध, राग ही सर्वसामान्य भावना. या भावनेच्या आविष्काराला वयाचं-काळाचं बंधन नाही. मात्र रागीट माणसाचा सामना करताना क्रोधाच्या मुक्तीची वाट आपल्यातच दडलेल्या क्रोधाच्या उगमापर्यंत जाते हे मला त्या दिवशी कळलं!

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

सुमारे पन्नाशीचा तो आडदांड माणूस दवाखान्यात शिरला तेव्हाच भांडणाच्या मन:स्थितीत होता. आगाऊ फी मागणाऱ्या स्वागतिकेला त्याने नंतर देतो, असं गुरकावून उत्तर दिलं. त्याला बोलवेपर्यंत तो धुसफुसतच येरझारा घालीत होता. माझ्या कक्षात प्रवेश करण्याची देर, त्याने खसकन खुर्ची ओढून बसकण मारली. मी काही बोलायच्या आत माझे प्रिस्किप्शन पेपर टेबलावर आदळले. प्लॅस्टिक पिशवीतून पुढय़ात गोळ्या ओतल्या आणि तोफ डागली, ‘‘काऽऽऽही फरक नाही पडला माझ्या आईला तुमच्या गोळ्यांनी. आज पाच दिवस झाले ती सारखी ओरडते आहे. घरचे सगळे मला शिव्या देताहेत, माझी कामं बंद पडली आहेत. शेजारी ‘आवरा तुमच्या म्हातारीला’ ओरडत आहेत. सारी गल्ली परेशान आहे. शेवटी खाटेला बांधून ठेवलं तिला अन् आलो आज काम बुडवून.’’

मी कागद समोर ओढला. साठ वर्षांची म्हातारी बाई. एका वर्षांपूर्वी तिला अर्धागवायू झाला होता. त्यानंतर ती अधूनमधून बडबडायला लागली. ओरडू लागली. ‘ऑरगॅनिक सायकोसिस’ निदान झालं आणि मी पाच दिवसांपूर्वी गोळ्या दिल्या होत्या. वय जास्त, तब्येत किरकोळ म्हणून कमी प्रमाणातल्या दिल्या होत्या.

चूक माझी नव्हती. त्याला मी आईंना रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली होती. त्याला त्यानं असमर्थता व्यक्त केली होती. जो रुग्ण आपल्या देखरेखीखाली नाही, त्याला सढळ डोस देणं मला धोक्याचं वाटलं, त्यामुळे मी कमी प्रमाणाच्या गोळ्या दिल्या. वय जास्त, प्रकृती किरकोळ, मेंदू अकार्यक्षम झालेला, हे सर्व लक्षात घेऊन उपचाराच्या गोळ्यांची निवड, प्रमाणाची निवड आणि अशा स्वरूपाच्या रुग्णांच्या पूर्वानुभवाची जोड करून डॉक्टर औषधे लिहितो. तो आडाखा असतो. कधी अचूक बसतो, कधी त्यात फेरफार करावा लागतो. सूर लागण्यापूर्वी खुंटय़ा पिळून तंबोरे जुळवण्यासारखंच हे!

‘‘काय फायदा तुमची महागडी फी देऊन? काय फरक, नुसते दवाखान्याचे हेलपाटे! डॉक्टर, दुकानदाराला या गोळ्या परत घ्यायला लावा अन् मला माझी फी परत द्या!’’

एव्हाना मी पुढच्या औषधोपचाराची दिशा मनात लिहायला सुरुवात केली होती, तो त्याच्या या वाक्याने लेखणी मनातच थबकली. पेन कागदात रुतलं. माझ्या संतापाचा फणा मान वर करायला लागला. हृदयाच्या ठोक्यांनी एकदम तिसरा गीयर टाकला. जबडा त्वेषाने आवळला. तापत्या दुधाला उकळी यावी तशी क्रोधाची एक उकळी वरवर येऊ  लागली. ‘‘नाही फरक पडला तर माझी काय चूक? तुला अ‍ॅडमिट कर म्हणून सांगितलं होतं! गोळ्या हळूहळूच वाढवाव्या लागतात. एका उपचारात फरक पडायला मी काय देव आहे? आणि फी परत करायला हे काय दुकान वाटलं का? नाही देत, जा!’’ ही सारी वाक्ये मनात क्षणार्धात कॉपी-पेस्टही झाली, पूर्वानुभवातून! कारण आजवर मी याच प्रतिक्षिप्त क्रियेतून गेलो होतो. अनेकदा त्याची परिणती व्हायची तीच होत होती- भांडणात! तणातणी, कलह, ओरडाआरडी, मग पुढे त्या प्रसंगाची कडवट चव मनात रेंगाळणं. उगाच तमाशा झाला, ही नखाला जिव्हाळी लागावी तशी वारंवार होणारी अप्रिय जाणीव.

एव्हाना त्या माणसाच्या अवास्तव संतापाला त्याच त्वेषाने उत्तर देण्यासाठी उकळत्या क्रोधात बुडवलेली सगळी वाक्ये माझ्या जिभेपर्यंत येऊन थडकली होती. ती बाहेर पडणार, तोच एक अघटित घडले.

माझ्या मनाने ‘यू टर्न’ घेतला.

रागाचा पारा चढलेल्या मनापासून एक विश्लेषक मन वेगळं झालं. ते मन लेखकाचं! मी नुसता व्यावसायिक तज्ज्ञ नव्हतो, लेखक होतो. त्यातही समस्याग्रस्त माणसाचं विश्व रेखाटणारा. या माझ्या भूमिकेशी मी प्रामाणिक होतो, त्यामुळे व्यावहारिक पातळीवर वावरणाऱ्या ‘मी’सोबत ते जग तटस्थपणे न्याहाळणारं एक आतलं, छुप्या सीसीटीव्ही कॅमेरासारखं मनही कार्यरत होतं. हा कॅमेरा माझंही चित्रीकरण करू लागला. समोरचा माणूस रागावला आहे हे दिसतच होतं, पण मलाही राग येतोय हे मला समजू लागलं. क्रोधाची एक लाट माझ्या मेंदूला व्यापून टाकण्याच्या तयारीत असतानाच तिचं तटस्थ, प्रामाणिक निरीक्षण करणाऱ्या मनानं आता मेंदूवर ताबा मिळवायला सुरुवात केली. भरधाव वेगाने दरीत कोसळण्याच्या वाटेवर असलेल्या बेफाम गाडीवर एखाद्या कुशल चालकाने महत्प्रयासाने नियंत्रण मिळवावे, तसा काही क्षणात हा प्रकार घडला. क्रोधाची लाट ओसरू लागली, तिची जागा कुतूहलाने घेतली. या माणसाची एक कहाणी आहे. सत्तर किलोमीटर प्रवास करून आलेला हा माणूस पोटार्थी आहे. त्याच्या उत्पन्नाचे, मदतीचे स्रोत सीमित आहेत. परिस्थितीनं त्याला कचाटय़ात पकडलंय. म्हाताऱ्या आईला एवढय़ा अंतरावर आणणं-नेणं, तिच्या औषधाची तरतूद करणं हेच त्याच्यासाठी खूप आहे. त्यात औषधे निरुपयोगी ठरल्यावर त्याला घरच्यांनी मूर्खात काढलं असेल. दिवसभर कष्ट करून मिळणाऱ्या निवांत झोपेला तो पाच दिवस मुकला आहे. दोष माझा नव्हता, पण त्याचाही नव्हता! त्याच्याबद्दल सहानुभूतीची जागा आता तद्नुभूतीने घेतली होती.

त्याने पैसे परत मागितल्याचा मला प्रामुख्याने राग आला होता. त्याने दिलेल्या पैशाचे खरे तर मी मोल केले होते. माझी बुद्धी, कौशल्य, अनुभव पणाला लावले होते. त्याचा उपयोग होणं न होणं माझ्या हातात नव्हतं. त्याची भावना पैसे बुडाल्याची होती. ‘इतके पैसे घेता आणि रुग्ण बरा होत नाही’ ही त्याची सरधोपट विचारसरणी पैशांच्या कमतरतेतून आली होती. पैसे खर्च झाल्यापेक्षा बुडवल्या गेल्याची भावना जास्त वाईट. या वैफल्यातून क्रोध जन्म घेतो. कदाचित परिस्थितीने कोंडीत पकडल्यावर त्याला संतापाशिवाय दुसरी कुठलीच संरक्षक व्यवस्था शिकवली गेली नसेल. वैफल्याचा परिपक्व निचरा कसा करावा हे कुणी सांगितलं नसेल. तो परिपक्व मार्ग मला येत नसेल, त्याचा वापर मी करीत नसेल, तर माझ्या शिक्षणाचा, ज्ञानाचा काय उपयोग? पैसे खर्चून मी ऐन वेळी रात्रीच्या प्रवासाचा बर्थ मिळवू शकतो, चढय़ा दराने विमानाचे तिकीट काढू शकतो, तर त्या माणसाचे पैसे परत करून त्याचा क्रोध विकत घेऊ शकत नाही?

मी शांतपणे नोटा मोजल्या. समोर ठेवल्या. तो धुमसतच होता, पण मी कुठलीच प्रतिक्रिया देत नसल्याचे पाहून हवेशिवाय निखारे विझत जावे तसा त्याचा राग क्षीण होत चालल्याचे मला जाणवले. एव्हाना क्रोधासारख्या अप्रिय भावनेच्या आहारी जाणाऱ्या माझ्या प्राणिज मेंदूवर माझ्या सुसंस्कृत प्रमस्तिष्काने परिपक्वतेचं पांघरूण पसरलं होतं. त्या क्षणी मला जाणीव झाली, या प्रतिक्षिप्त क्रोधाच्या भावनेनं मला आजवर किती वेळ वेठीला धरलं होतं, ओलीस ठेवलं होतं. क्रोध-संताप-विखार-विध्वंस-उपरती या चक्रातून कितीदा घुसळलं होतं. या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग मला माझ्या लेखन-विचार करणाऱ्या मनानेच दाखवला होता. त्या माणसाच्या क्रोधाचा सामना मला माझ्याच क्रोधाच्या उगमापाशी घेऊन गेला होता.

क्रोध ही एक ऊर्जा आहे. क्रोधावर क्रोध एक चक्र निर्माण करतो. त्याला मग बोचरा वेग येतो, क्रौर्याचे आरे फुटतात, विध्वंसाची धार येते. सगळी सूत्रं प्राणिज मेंदूच्या हाती जातात. विवेकाचा आवाज क्षीण होतो. क्रोधाला (दुसऱ्याच्या आणि स्वत:च्या) ओळखणे आणि समजून घेणे, हीच भावनिक साक्षरता! ती नसेल, तर आम्ही ज्ञानवंत सारे निरक्षर असूत.

‘‘हे तुमचे पैसे. तुमच्या आईचं वय झालेलं आहे. तिला पक्षाघात आहे. अशा स्थितीत चढय़ा प्रमाणात औषध देणं धोक्याचं ठरलं असतं. आता मला त्या प्रमाणाचा अंदाज आला आहे. मी गोळ्या बदलून देऊ  शकतो. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मला वाईट वाटतं. तुमचा राग साहजिक आहे. मात्र तुम्हाला दुसऱ्या तज्ज्ञाची भेट हवी असेल तर चिठ्ठी देतो.’’

त्याने पैसे उचलले. बाहेर पडला. अध्र्या तासाने पुन्हा आला. या वेळी तो शांत होता. क्रोधाच्या रस्त्यावरनं त्याने अध्र्या तासात ‘यू टर्न’ घेतला होता. माझ्यासारखाच!

डॉ. नंदू मुलमुले – nandu1957@yahoo.co.in