मनोविकृतिशास्त्रातल्या ‘फोबिया’ किंवा भयगंडाची ही कहाणी. भयगंड हे  अतार्किक असतात. गर्दीची, प्रवासाची, एकटेपणाची, बंद जागेची भीती ही अशी अकारण, अवास्तव आणि अतिप्रमाणात असते. या भीतीने माणूस बाहेर जायचे टाळतो, गर्दीला घाबरतो, बंद खोलीत त्याचा जीव घुसमटतो. मात्र भयगंडावर मात करणं सोपं आहे..

जठारपेठेतल्या मधल्या गल्लीतल्या किशोर पुराणिकची-माझ्या शाळकरी मित्राची आजी वारल्याची बातमी आली अन् माझ्या पोटात धस्स झालं! मी असेन त्यावेळी पाचवी-सहावीत. माझ्या घरापासून शाळेच्या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या गल्ल्या तीन. किशोरचा बंगला मधल्या गल्लीत. त्या बंगल्याच्या प्रशस्त व्हरांडय़ात तो हातात पुस्तक घेऊन येरझारा घालीत पाठांतर करायचा. शाळेत जाताना त्याच्या लोखंडी फाटकाशी उभ्या उभ्या भेट व्हायची. किशोरची आई मला फार आवडायची. गोरीपान, लहान चणीची ही बाई, चेहऱ्यावर नेहमी एक सोशिक, अगत्यशील भाव. किशोरची आजीही तशीच. मला ती फार मायाळू वाटायची. अथर्वशीर्ष पाठ असलेला बटू म्हणून माझ्यावर तिचा विशेष जीव!

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

त्याच्या वडिलांचा पॅकेजिंगचा व्यवसाय होता. माणूस धडपडय़ा. व्यवसाय उत्तम चालू लागला. सगळं ठीक चाललं होतं. मग कुठल्याशा व्यवहारात त्यांना फटका बसला आणि भरभराटीचे दिवस काही वर्षांतच संपले. कारखाना गहाण पडला, फक्त घर राहिलं. तेही किशोरच्या आईनं सर्व दागिने विकल्यानं राहिलं. या प्रसंगानंतर आठ दिवस किशोर खेळायलाच आला नाही. एकदा अचानक मला शोधत आला, ‘‘तू उद्या दुपारी जेवायला ये, आईनं सांगितलंय,’’ सांगून तो घाईघाईत गेलाही. त्याच्या आईने या कौटुंबिक अरिष्टातून सुटण्यासाठी त्यावेळी फार प्रचलित असलेले संतोषीमातेचे सोळा शुक्रवार धरले होते, त्याचं उद्यापन होतं. संसाराची घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी अपार कष्ट घेणारी ती माऊली अगतिक झाली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवार. दुपारी शाळा आटोपून मी सरळ किशोरकडे पोचलो. आजी विमनस्कपणे कोपऱ्यात बसली होती. तिला ताप होता. ती अर्धवट ग्लानीतच होती, मात्र आरती सुरू झाल्याबरोबर धडपडत उठली. किशोरचे वडील डावा हात कुबडीसारखा काखेत धरून मान खाली घालून जेवले. एकूणच त्या वातावरणामुळे मला जेवण गेलं नाही. संध्याकाळी  भूक लागल्याने मी थोडं आंबट दही साखर टाकून खाल्लं. तेवढय़ात बाहेरून आई आली. माझ्या हातात दह्य़ाची वाटी पाहून ती एकदम म्हणाली, ‘‘अरे! तू उद्यापनासाठी गेला होतास ना? तिथे जेवल्यावर काही आंबट खायचं नसतं!’’

माझ्या हातातली वाटी गळून पडायचीच राहिली. अरे हो, खरंच! जेवण वाढता वाढता किशोरची आई म्हणालीच होती, ‘‘नीट जेवा रे, आज घरी जाऊन जेवायचं नाही, आंबट तर अजिबात खायचं नाही!’’ आता काय! मी अजाणतेपणी व्रताचा एक नियम तोडला होता. आणि  सकाळी बातमी आली, किशोरची आजी वारली! मी आंबट दही खाल्ल्याचा तर हा परिणाम नव्हे? माझी घाबरगुंडी उडाली. मधल्या गल्लीच्या तोंडाशी जाऊन मी किशोरच्या घराकडे भीत भीत डोकावलो. पांढऱ्या कपडय़ातल्या माणसांची लगबग अन् जमिनीवर ठेवलेला आजीचा देह, मी उलटय़ा पावली धूम ठोकली! जणू जमलेला प्रत्येकजण माझ्याकडे बोट दाखवून म्हणत होता, ‘‘यानेच आंबट खाल्लं अन् आजीचा जीव गेला!’’

दुसऱ्या दिवशी मी अर्धा तास अगोदर निघून मधली गल्ली टाळून शाळेत लांबच्या रस्त्याने गेलो. मग ती माझी सवयच होऊन गेली. मधली गल्ली तशीही निर्मनुष्यच. त्याच्या वडिलांनी घराला ‘शुभकर्मधाम’ नाव ठेवलं तेव्हाच कुणीतरी म्हणालं, कर्म हा शब्दच अशुभसूचक आहे! आपल्याकडे ‘लग्नकार्य’ असते, लग्नकर्म नव्हे. ‘श्राद्धकर्म’ असते, श्राद्धकार्य नाही!

एके दिवशी मित्राबरोबर मी चित्रपट पाहायला गेलो. एकाच सायकलवर दोघे. मी नको नको म्हणत असताना त्याने मधली गल्ली धरली. दोन-तीन घरेच ओलांडली असतील, मला छातीत धडधडायला लागलं. हातापायाला कापरं सुटलं. अंग थंडगार पडलं. मी सायकलवरनं उडी मारली अन् उलटा धूम पळत सुटलो ! गल्लीच्या तोंडाशी, मुख्य रस्त्यावर आलो, तेव्हा बरं वाटलं. त्या दिवसापासून मी ती गल्ली सोडली. क्रिकेट सुटल्याने किशोरची भेटही मंदावली. धंदा नसल्याने कुटुंबाची वाताहतच झाली. घर ओसाड पडलं.

पुढे शिक्षणाच्या वाटा विखुरल्या. व्यवसायांनी दूरचे देश धरले. मात्र माझं गावी क्वचित सण-कार्यप्रसंगी जाणं व्हायचं. स्टेशनवरनं घरी जाताना रिक्षावाला हमखास जवळची वाट म्हणून मधली गल्ली पकडायचा. छातीत सूक्ष्म धडधडायचं. मी पुराणिकांच्या बंगल्याकडे चोरटा कटाक्ष टाकायचो. गंजलेलं लोखंडी प्रवेशद्वार, गवत माजलेली पायवाट, सुरकुतल्या भिंतीचं, मान खाली घातलेलं वयोवृद्ध घर पाहून माझ्या मेंदूला थंड हवेची एक शिरशिरी स्पर्शून जायची. खरं तर आता जाणतेपणी संतोषीमाता, आंबट दह्य़ाची मनाई आणि किशोरच्या आजीचा मृत्यू याचा अर्थाअर्थी संबंध नाही हे कधीचंच कळलं होतं. मनात ज्ञानाचा पुरेसा प्रकाश पडला होता. पण त्या मधल्या गल्लीने प्रवेश केल्याबरोबर भीतीची धूसर भावना, कुठल्याही आवाजाशिवाय धुकं पसरावं तशी पसरत होती. जणू एखादं मेलेलं जनावर उचलून नेल्यावरही कुबट वास थोडा वेळ रेंगाळत राहावा तशी. कधी कधी वास दृष्याला येतो, तशी भीतीही त्या गल्लीच्या दर्शनालाच चिकटली होती. त्या भीतीवर माझा ताबा नव्हता.

मनोविकृतिशास्त्रातल्या ‘फोबिया’ किंवा भयगंडाची ही कहाणी आहे. भयगंड हे  अतार्किक असतात. गर्दीची, प्रवासाची, एकटेपणाची, बंद जागेची भीती ही अशी अकारण, अवास्तव आणि अतिप्रमाणात असते. या भीतीने माणूस बाहेर जायचे टाळतो, गर्दीला घाबरतो, बंद खोलीत त्याचा जीव घुसमटतो. माझ्या भयगंडाचं कारण स्पष्ट होतं, अनेकांच्या भयगंडाचं कारण कधी कधी शोधूनही सापडत नाही. मात्र भयगंडावर मात करणं सोपं आहे. भीती उत्पन्न करणाऱ्या प्रसंगापासून तुम्ही जितके दूर पळाल तितकी भयगंडाची हिंमत वाढत जाईल. जितका वारंवार सामना कराल तेवढा भयगंड निष्प्रभ होत जाईल. बोथट होत जाईल. लिफ्टची भीती वाटते, वारंवार मुद्दाम लिफ्टमध्ये बसा. प्रवासाची भीती वाटते, प्रवास करा. आपल्या भयाला अलिप्त होऊन अनुभवा! घाबरा, पण हटू नका!

परवा अनेक वर्षांनी पुन्हा गावी गेलो होतो. मुद्दाम गाडी मधल्या रस्त्यावरनं घेतली. पुराणिकांच्या घराच्या जागी अनेक फ्लॅटची उंच इमारत उभी होती. पाìकगमध्ये महागडय़ा मोटारी होत्या, मुलं खाली खेळत होती. मी पत्ता विसरलोय असं वाटून थांबून एकाला विचारलं, ‘इथे पुराणिक राहात होते ना?’

‘अं..नाही बुवा! पत्ता काय सांगितलाय?’

मी खिसे चाचपल्यासारखं केलं. माझ्या भीतीचा पत्ताच नव्हता! ‘हरवला वाटतं’, पुटपुटत मी गाडी चालू केली. किशोरच्या आजीचं भूत विरळ होत, विरघळत चाललं होतं.

घरी भावानं सांगितलं, किशोर आर्किटेक्ट झालाय, सारं कुटुंब पुण्याला शिफ्ट झालंय.

‘आणि वडील?’ माझ्या डोळ्यांसमोर डावा हात उजव्या काखेत कुबडीसारखा धरून मान खाली घालून जेवणारे त्याचे वडील आले.

‘वारले. चांगले दिवस आलेले पाहून गेले!’

मला बरं वाटलं. आता किशोरची माझी भेट कधी होईल ती होईल. मात्र भयगंडाच्या सावटाने ती भेट काळवंडलेली नसेल. संतोषीमातेची कहाणी मी त्याला कदाचित सांगणार नाही. कारण त्याचा किशोरशी, आजीच्या मृत्यूशी संबंध नाही. त्या आंबट दह्य़ाचा आणि व्रत उलटल्याचा परिणाम भयगंडाच्या रूपाने मी भोगलाय! पण आज तो भयगंड ओसरला आहे. आज मी जठारपेठेतल्या त्या मधल्या रस्त्यावरनं शीळ वाजवत जाऊ  शकतो! मनातल्या भयाच्या धूसर तरंगाकडे त्र्ययस्थ होऊन पाहू शकतो. संतोषीमातेचं व्रत आज सुफळ संपूर्ण झालं आहे.

डॉ. नंदू मुलमुले nandu1957@yahoo.co.in