अक्काची ही स्वच्छता पराकोटीची वाढली, तेव्हाच नेमके आजोबांकडे आबा गोसावी आले. हे आबा आजोबांचे परिचित, आध्यात्मिक सत्पुरुष. लोक त्यांना समस्या सांगायचे, ते उपाय सांगायचे. मनाला उभारी द्यायचे. अक्काची ‘केस’त्यांना सोपवण्यात आली. आबांनी डोळे मिटून एकच प्रश्न केला- ‘‘अक्का, तो तुला धुवायला लावतो, तो तू आहेस का? नाही ना?’’ अक्काने मान हलवली.

एखाद्या नष्टप्राय होत चाललेल्या प्रजातीचा अखेरचा वंशज पाहिलेला असावा, तसे मला केशवपन केलेल्या अक्काचा चेहरा आठवतो. अक्का आठवते! ती आमची कुठून नात्यात होती देव जाणे; पण एक दिवस घरी आली आणि घरातलीच झाली.

ती बालविधवा होती. आल्या आल्या तिने देवघराच्या खोलीचा ताबा घेतला. छोटीशी खोली, तीत चौरंगावर असंख्य पितळेच्या मूर्ती, तसबिरी, शंख, शाळिग्राम, गोपीचंदन, फुलवातींचा पसारा. भिंतीतल्या उघडय़ा कपाटात तिने आपलं एकमेव सुती पांढरं लुगडं, सोवळ्याची धाबळी, एक कानतुटका कप, तांब्या-पेल्याची एक जोडी एवढी इस्टेट रचली. कोपऱ्यात आसनाची घडी. रात्री तेच लांब करून फरशीवरच झोपायची. उशाला हाताची घडी, पांघरायला अकोल्याच्या उकाडय़ात मिळाली तर हवेची झुळूक. तिचा दिवस पहाटे चारला गार पाण्याच्या अंघोळीने सुरू व्हायचा. मग आजोबांसाठी पूजेचं ताम्हण-पंचपात्रं लख्ख पुसून मांडणं. परडीत जास्वंद, तगर, हिवाळ्यात पारिजात, एकवीस दूर्वाची जुडी.

तिचा स्वयंपाक सोवळ्याचा. तिची चूल वेगळी. ओलेत्या अंगाने धाबळी नेसायची. शेणाने सारवलेल्या चुलीसमोर बसायची. ओवळ्यातलं थोडंही काही हाताला लागलं, की पुन्हा न्हाणीघरात जाऊन अंघोळ, पुन्हा धाबळी नेसायची. हा प्रकार तीन-चार वेळा चालायचा. चुलीजवळ टेकलेलं तिचं भांडं वेगळं, कप वेगळा, ज्वारीच्या पिठाचा डबा वेगळा. एक भाकरी आणि वाटीभर भाजी हा तिचा दिवसभराचा आहार. संध्याकाळी खाल्ली तर लापशी, नाही तर उपाशी.

अक्काची स्वच्छता हा आमच्या चेष्टेचा विषय. नंतर तो मला कुतूहलाचा वाटू लागला. भांडे धू धू धुवायची. मग चार-सहा वेळा हात धुवायची. देवघराची फरशी, कपाट स्वच्छ पुसायची. कुणी परतीच्या प्रवासाला निघालेला पाहुणा घाईघाईत देवघरात नमस्काराला घुसायचा. हाताच्या साखळीत गुडघे घट्ट मुडपून अक्का ते थिजून पाहत असायची. तो पाहुणा जायची देर, त्याची न उमटलेली धुळीची पावलं फरशीवरनं पूस पूस पुसायची. चौरंगाला डोकं टेकलं असेल तर चौरंग पुसायची. भिंतीला हात टेकला असला तर भिंत पुसायची. ‘अक्का, ती बघ मुंगी धुळीचे पाय घेऊन चालत गेली फरशीवरनं!’ आम्ही चिडवायचो, त्यावर ती नुसतीच हसायची. पण कितीही अडवलं, तरी तिची स्वच्छता कमी झाली नाही.

आईला तिच्या अतिरेकी स्वच्छतेचा त्रास व्हायचा. सकाळच्या घाईच्या वेळेस अक्का तिला सांडशी, पळी मागायची. ती नुसती पाण्याने नाही, राखेने धुवून घासून द्यायची. मग आक्का ती निरखून तपासायची. कुठे राखेचा कण दिसला की पुन्हा धुवून मागणार. ‘अहो स्वच्छ आहे आक्का ते, दोनदा धुतलं तुमच्या समोर,’ आई काकुळतीला यायची. पण अक्काचं मन भरायचं नाही. आपल्या स्वच्छतापोटी ती घराला वेठीला धरायची.

तिच्या हातचं पंचामृत अप्रतिम. मात्र ते करेपर्यंत तिच्या धुण्या-पुसण्याच्या पूर्वतयारीनं आजीही बेजार व्हायची. एखादी मांजर दुरून आढय़ावरनं जरी चालत गेली, तरी भांडय़ात काही पडलं असेल या शंकेनं ती भांडे पुन्हा पुन्हा धुवून घ्यायची.

‘‘अक्का तू का धुतेस सारखं सारखं?’’ असं विचारल्यावर ती नुसती हसायची. एक दिवस मात्र मी पिच्छाच पुरवला. पंधरा वर्षांच्या पोरासमोर काय मनातलं गु मांडायचं? थोडा वेळ गप्प बसली. मी डोळ्यांनीच प्रश्न रेटला. मग एकदम म्हणाली, ‘‘अरे ‘तो’ करायला लावतो मला सगळं!’’ तो कोण? माझं कुतूहल जागं झालं. ‘‘अरे जन्माची कहाणी आहे ती माझ्या. अजाणतेपणी लग्न झालं. असेन मी दहा-बारा वर्षांची. नवरा मामलेदार कचेरीत होता. एक दिवस घाई झाली त्याला, देव पूजेच्या ताम्हणात काढून ठेव म्हणाला. थंडीत आंघोळ करायचा मला कंटाळा आला, सरळ सगळे देव उचलून परकराच्या ओच्यात जमा केले, आसन गोळा करून झटकलं परडीत अन् ठेवून दिलं पुन्हा. त्याच्या दोनच दिवसांत नवरा वारला. विहिरीत उतरला होता अंघोळ करायला, वरून शिळा पडली काठावरची. दोन दिवस शोधाशोध केली तेव्हा सापडलं प्रेत. कोणी म्हणतात शेताच्या भांडणात दगड टाकला कुणी तरी, देव जाणे. पण मी पारोशाने शिवले ना देवाला, त्याची शिक्षा मिळाली मला. तेव्हापासून ‘तो’ मला सारखा धुवायला लावतो. कितीही स्वच्छ केलं तरी नाही झालं म्हणतो. मी पापी आहे रे..’’

‘‘कोण आहे तो? कुठे दिसतो तुला?’’ मला हे सगळं एकाच वेळी विचित्र आणि कमालीचं अद्भुत वाटू लागलं.

‘‘अरे मनातच असतो माझ्या तो. आता धू म्हणतो आपली पापं. तो शांत बसेपर्यंत धुवावंच लागतं मला सगळं. कळतं आपलं चुकतेय. स्वच्छच आहे सगळं, पण मन भरत नाही.’’

‘‘अन् नाही धुतलं तर?’’

‘‘तर अस्वस्थ वाटतं, राहवत नाही. मुद्दाम करते का मी हे धू-पूस?’’ अक्काच्या हाताकडे माझी नजर गेली. सारखी पाण्यात राहून तिच्या हाताची त्वचा सोलवटली होती. प्रेतासारखे थंड होते तिचे हात. मातकट गोरा रंग, जाड भिंगाच्या चष्म्यातून लुकलुकणारे डोळे, सुती लुगडय़ाच्या पदराखाली झाकलेलं डोकं, हातापायाची मलूल त्वचा, अक्काचं सारं शरीर जणू या व्याधीनं धुण्यासारखं धोपटून धुवून काढलं होतं. तिच्या साऱ्या अस्तित्वाला तिच्या मनातला ‘तो’ कोपरा जणू दगडावर आपटून धू धू धूत होता. लग्न, वैधव्य हे सोपस्कार नियतीनं तिच्या नकळत्या परस्परच उरकले होते. ज्यानं तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं त्याचा चेहराही तिच्या स्मरणात नव्हता. फक्त पंगतीची खूप मौज होती आणि बुंदीचे लाडू खायला मिळाले होते एवढंच तिला आठवत होतं. (शेकडो लोक जेवले, कोहळ्याची भाजी खूप चविष्ट झाली होती रे!) तसे जेवण पुन्हा तिच्या नशिबी आले नाही. नियती माणसांपुढे ‘ताट’ वाढून ठेवते हे माझ्या असं प्रत्ययाला आलं. हळूहळू तिने आपल्या सगळ्या भुका मारल्या. मग हे धुणं मागे लागलं अन् आयुष्यात खंत करायला कुठली उसंतही उरली नाही.

अक्काची ही स्वच्छता पराकोटीची वाढली, तेव्हाच नेमके आजोबांकडे आबा गोसावी आले. हे आबा आजोबांचे परिचित, आध्यात्मिक सत्पुरुष. लोक त्यांना समस्या सांगायचे, ते उपाय सांगायचे. मनाला उभारी द्यायचे. अक्काची ‘केस’त्यांना सोपवण्यात आली. आबांनी डोळे मिटून एकच प्रश्न केला- ‘‘अक्का, तो तुला धुवायला लावतो, तो तू आहेस का? नाही ना?’’ अक्काने नकारार्थी मान हलवली. ‘‘मग तू का त्याचं ऐकतेस? तो तुझ्या मनाचाच कोपरा धरून आहे पण तू नाहीस. त्याचं ऐकतेस आणि नरक भोगतेस. त्याचं ऐकायचं नाही. त्याला विरोध करायचा. तो धू म्हणेल, धुवायचं नाही! तो तुला अस्वस्थ करेल, तगमग करेल तुझी, त्याचं ऐकायचं नाही. एकदम नाही जमणार, हळूहळू जमेल. रोज थोडा विरोध कर. वेळ वाढवत जा. अस्वस्थ झालीस की देवाचं स्मरण कर. तुला मंत्र देतो.’’

‘‘पण आबा, मी पाप केलंय. मी अंघोळ न करता शिवलेय देवाला,’’ अक्कानं व्याधीचं मूळ उघड केलं. ‘‘अजाणतेपणी केलेल्या कृत्याला पाप म्हणू नये असं ‘विदुर-नीती’ सांगते. त्याला शिक्षा नाही. तू पापी नाहीस!’’

त्या दिवसापासून अक्काच्या मनात बदल झालेला दिसू लागला. अक्कानं आपलं धुणं-पुसणं तेव्हापासून कमी केलं. कठीण गेलं तिला ते. पण आबांच्या शब्दांच्या समजावणीचा परिणाम म्हणा, तिचा प्रयत्न म्हणा, ते कमी होत गेलं. तिला शेणाच्या गोवऱ्या करायला सांगायचो आम्ही, शेणात हात कालवून बसवायचो. मोठा भाऊ, पाण्याशिवाय राहायची सवय व्हावी तिला म्हणून गच्चीवर जाऊन टाकीचा व्हॉल्व बंद करून टाकायचा. हळूहळू तिचे धुण्याचे वेड कमी झाले. तिच्या ‘सुप्त मनातील घुशी बिलंदर’ शांत झाल्या. मंत्र पुटपुटायची कसला तरी, पण तो तेवढय़ापुरता. तिच्या मनातला ‘तो’ हळूहळू परास्त झाला. त्याची सक्ती संपली. शक्ती ओसरली. मनाचा कोपरा मुक्त झाला. अजाणतेपणी पारोशाने अंघोळ घातलेले देव शुद्ध झाले.

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in