‘‘डॉक्टर, तुम्ही पिंकीशी बोलता, तिला गतिमंद असूनही समजावता, म्हणून ती इथे येते. ज्या दिवशी तिला सत्याचा सामना करावा लागेल, त्या दिवशी मरून जाईल ती. त्यापेक्षा तिला राहू देत खोटय़ा आशेवर, भ्रामक दुनियेत की पिंकी कधी तरी बरी होईल, संसार करेल, या स्वप्नावर जितकं आयुष्य जाईल तेवढच जगेल ती.’’ तारे म्हणाले आणि तटस्थपणे सत्याचे डोस पाजणं किती सोपं असतं, ते माझ्या लक्षात आलं.

समजा एखाद्या स्त्रीला एक गतिमंद मूल आहे. या मुलाच्या देखभालीनं ती त्रस्त झाली आहे. ही जन्मजात बुद्धीची कमतरता आहे, मेंदूचं अपंगत्व आहे आणि ते जगातल्या कुठल्याही औषधाने दुरुस्त होऊ  शकत नसल्याने हे मूल आता जन्मभर असंच राहणार हे कळल्यावर, त्या आईच्या अंतर्मनात एक सुप्त विचार येऊ  शकतो, ‘नको हे मूल! ते नष्ट झालं, काही कारणानं मरून गेलं तर..!’

आता असा विचार एका संस्कारित पापभीरू आईच्या मनात येणं, तिच्या बाह्य़मनाला याची जाणीव होणं ही किती भयंकर गोष्ट! अपराधीपणाची तीव्र भावना तिच्या मनात निर्माण होईल. या अपराधी भावनेवर मात करण्यासाठी अंतर्मन काही संरक्षक कवच निर्माण करतं. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ फ्रॉईड त्याला ‘डिफेन्स’ असं म्हणतो. येथे उपयोगात येणारा डिफेन्स म्हणजे ‘रिअ‍ॅक्शन फॉर्मेशन’ म्हणजे मूळ विचाराला (मुलाला मारून टाकावं) दाबून टाकण्यासाठी विरुद्ध विचार व कृती. अशी आई मुलाची अतिकाळजी घेऊ  लागते. त्याच्या समस्येला उत्तर आहेच, ती बरी होणारच या भ्रमात राहू लागते.

तारे पतीपत्नी त्याला अपवाद नव्हते.

तारे हे एक उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांना एका खासगी कंपनीत मोठय़ा हुद्दय़ाची भरपूर पगाराची नोकरी होती. बायको किडकिडीत कृश प्रकृतीची. ते घेऊन आले होते आपल्या दहा-बारा वर्षांच्या गतिमंद मुलीला. लेकीला ढगळ फ्रॉक घातला होता. बॉयकट केलेले अस्ताव्यस्त केस, थोडे बाहेर डोकावणारे दात आणि तोंडाच्या कोपऱ्यात वेडय़ासारखं हसताना जमा होणारी थुंकी!

तिचं नाव पिंकी. लहानपणापासून तिला फीट येत होत्या. त्या औषधोपचाराने आटोक्यात होत्या, पण अधूनमधून यायच्याच. पिंकीचं चालणं-बोलणं सगळंच लहानपणी उशिरा सुरु झालं होतं. ती हट्टीपणा करायची. तिच्या वयापेक्षा लहान मुलांमध्येच खेळायची. मध्येच बडबडायची. अकारण हसायची. टाळ्या पिटत राहायची. तारे या मायलेकीपासून वेगळेच वाटायचे. एखाद्या उच्चभ्रू उद्योगपतीनं आपल्या पदरी काम करणाऱ्या कामगार महिलेला तिच्या मुलीच्या उपचारासाठी भूतदया दाखवून जणू माझ्याकडे आणलं होतं! पण माझा आडाखा चुकीचा निघाला. परीटघडीचे तारे मुलीच्या बाबतीत खूप हळवे होते. तिच्या फीट कमी व्हाव्यात, तिचा बालिशपणा कमी व्हावा यासाठी काहीही करायला तयार होते, पण ते समजदारही होते. गतिमंदत्वाच्या उपचाराला मर्यादा असतात याची त्यांना जाण होती.

आई मात्र ‘डॉक्टर ही बरी होईल ना? अहो, तिचं सगळंच राहिलंय आयुष्यात. शिक्षण राहिलंय, लग्न राहिलंय’ असं म्हणायची. हिचं शिक्षण सोडाच, लग्नाचा विचारही मनातून काढून टाका, असं स्पष्ट शब्दांत सांगायचा मला मोह व्हायचा; पण मी जुजबी शब्दांत तिचं समाधान करायचो. गतिमंद मुलाचा बुद्धय़ांक काढणं, त्यानुसार तिला जुजबी शिक्षण घेता येईल, की फक्त सर्वसामान्य काम शिकवता येईल, की केवळ सांभाळावं लागेल हे ठरवावं लागतं. पिंकीचं गतिमंदत्व तिसऱ्या प्रकारातलं होतं. तिला सांभाळणं, थोडीबहुत स्वत:ची काळजी स्वत: घ्यायला शिकवणं एवढंच प्रशिक्षण शक्य होतं. मी थोडक्यात त्यांना समजावून सांगितलं. पिंकीला फीट कमी करण्याच्या, शांत राहण्याच्या गोळ्या दिल्या.

पंधरा दिवसांनी तारे फक्त मुलीला घेऊन आले. मुलीची आई बरोबर नव्हती. पिंकीचं मन बालकाचं होतं तरी शरीर तरुण होतं. तिला शरीरधर्मानुसार पाळी सुरू झाली होती. मात्र त्या दिवसांत ती स्वत:ची काळजी घेऊ  शकत नव्हती. अशा परिस्थितीत तिच्या काळजीनं तारे थोडे अस्वस्थ झाले होते. तिची आई या गोष्टीचा धसका घेऊनच आजारी पडली होती.

मी पिंकीशी थोडं बोललो. तिला समजावण्याचा प्रयत्न केला. ‘‘पिंकी, आता घरातच छान खेळत जा, आईला मदत करत जा. कपबश्या विसळत जा!’’

‘‘कप फुटले की आई रागावते काका.’’

‘‘मी सांगतो आईला. पण घरकाम करता जा!’’

या माझ्या पिंकीला बोलतं करण्यावर, तिची विचारपूस करण्याच्या पद्धतीवर तारे खूश होत. त्यांना मी अनेक वेळा सांगितलं की, तुम्ही औरंगाबादला राहता, तेथे उत्तम मानसरोगतज्ज्ञ आहेत; पण तारेंची माझ्यावर श्रद्धा होती. ते म्हणत, ‘‘माझी कुठेही बदली होऊ दे, मी तुमच्याचकडे येणार!’’

पंधरा दिवसांनी थेट औरंगाबादहून पिंकीची आई  लेकीला घेऊन हजर झाली. तारेंनी दोघींना खास मोटारीने तब्येत तपासायला पाठवलं होतं. मी पिंकीला तपासलं. तिचे दात मला घाणेरडे दिसले.

‘‘अहो डॉक्टर, हिला पानसुपारीच्या पुडय़ा खायची सवय लागली आहे.’’ आईनं पिंकीच्या तक्रारी सुरू केल्या.

‘‘काय सांगता! कोण देतं हिला पुडय़ा?’’

‘‘अहो, स्वत:च समोरच्या दुकानात जाते आणि विकत आणून खाते! अभ्यास करीत नाही.’’

मला कळेना, कसं समजवावं या बाईला, की जिचा बुद्धय़ांक पंचावन्न आहे (म्हणजे बुद्धी वयाच्या अर्धीच आहे) अशी मुलगी कशी शिकणार?

‘‘पिंकीची आई, इतर सर्वसाधारण मुलांसारखी ही शिक्षण घेऊ शकणार नाही. हिला हिच्या बुद्धीनुसार कामं करता आली तरी खूप आहे.’’ मी समजावलं.

पिंकीच्या आईनं नुसती मान हलवली. मी गोळ्या लिहून दिल्या. त्या एकवार समजावून घेत ती म्हणाली, ‘‘ते सगळं ठीक आहे डॉक्टर, पण उद्या ही सासरी जाईल तेव्हा कसं होईल हिचं?’’

पिंकीच्या लग्नाचे स्वप्न पाहाणाऱ्या या बाईच्या बुद्धीची मला चिंता वाटायला लागली. तिचं लग्न तर दूरच राहो, तिनं फीटस्मुक्त होऊन घरी शांत बसून आयुष्य काढलं तरी खूप, असं म्हणायला हवं हे मला ओरडून सांगावंसं वाटलं, पण मी सोडून दिलं.

पुढल्या खेपेला तारे पिंकीला घेऊन एकटेच आले. तिचं पानसुपारीच्या पुडय़ा खाणं चालूच होतं.

‘पिंकी, पानसुपारीच्या पुडय़ा नाही खायच्या. आवळासुपारी खात जा! आणि कपबशा विसळते की नाहीस?’ मी विचारताच पिंकीने खिदळून टाळ्या पिटायला सुरुवात केली. मी पिंकीला बाहेर पाठवून तारेंना सत्य परिस्थितीची जाणीव दिली. तिच्या आईच्या अवास्तव अपेक्षांबद्दल सांगितलं.

त्यांनी ते सर्व शांतपणे ऐकून घेतलं. थोडं थांबून ते समजुतीच्या स्वरात म्हणाले,

‘‘डॉक्टर, मला समजत नाही का हे सगळं; पण तिची आई ऐकायला तयार नाही! समजूनच घेत नाही ती. सत्य परिस्थितीचा सामना करण्याची तिच्यात कुवत नाही. इतका जीव आहे मुलीवर तिचा, तुमच्याआधी हे सत्य परखडपणे सांगणारे तीन डॉक्टर तिने सोडून दिले. तुम्ही पिंकीशी बोलता, तिला गतिमंद असूनही समजावता, म्हणून ती इथे येते. घरी पिंकीची पराकोटीची काळजी घेते. स्वत:चा छळ करकरून तिला शिकवण्याचा प्रयत्न करते. आपली मुलगी गतिमंद आहे, तिचा मेंदू अपंग आहे, आता ती अशीच राहणार आणि तिला फक्त सांभाळावं लागणार, या सत्याचा ज्या दिवशी तिला सामना करावा लागेल, त्या दिवशी मरून जाईल ती. तिला आधीच एक हार्टअ‍ॅटॅक येऊन गेलाय. हे सत्य पचवून तिच्या डोळ्यावरचं झापड मी तसंच धरून ठेवलं आहे. कुणाला ठाऊक, कदाचित खोल अंतर्मनात तिला त्याची जाणीवही झाली असेल. तुमच्याकडून जेव्हा मी घरी परततो तेव्हा तिची नजर चुकवत बोलत राहतो. विषय बदलत राहतो. ती मात्र तेच बोलत राहते. सत्याचा सामना करून कच खाण्यापेक्षा तिला राहू देत खोटय़ा आशेवर, भ्रामक दुनियेत की पिंकी कधी तरी बरी होईल, संसार करेल, सामान्य आयुष्य व्यतीत करेल, या स्वप्नावर जितकं आयुष्य जाईल तेवढंच जगेल ती.’’ तारे सांगत होते नि मी मनोमन शरमलो. एकीकडे पिंकीच्या आईचं ‘रिअ‍ॅक्शन फॉर्मेशन’चं मनोकवच, ते खोटं कवच काढून वैज्ञानिक सत्याचा उजेड पाडण्याचं कर्तव्य बजावणारा मी आणि या सगळ्या तार्किक झटापटीपलीकडे जाऊन आयुष्य नावाच्या खेळाची एक मानवीय, विवेकी हाताळणी करणारे तारे!

एका जीवशास्त्रीय समस्येभोवती रचलेले किती ताणेबाणे! वास्तवाचा सामना करणारा बाप जोवर सक्षम आहे, तोवर पिंकीच्या आईला वैज्ञानिक ‘सत्याचे डोस’ पाजणं सोडून द्यावं हे मी मनोमन ठरवून टाकलं!

डॉ. नंदू मुलमुले nandu1957@yahoo.co.in