29 May 2017

News Flash

ठणका !

काकांचा दिवस पहाटे पाचला सुरू व्हायचा. हातात चांदीची मूठ असलेली काठी घेऊन फिरायला जायचे.

डॉ. नंदू मुलमुले | Updated: February 4, 2017 1:01 AM

मनोशारीरिक विकार म्हणजे ‘सायकोसोमॅटिक डिसॉर्डर’. असं म्हणतात की जेव्हा मन रडू शकत नाही, तेव्हा ते शरीराला रडायला लावतं. मात्र पायाचं हे रडणं, त्याचा ठणका वन्नींच्या पचनी पडला नाही, तसा काकांच्याही डोक्यावरनं गेला.

काका आणि वन्नीची एक प्राचीन प्रेमकहाणी होती, एकोणिसाव्या शतकातली! भुवया उंचावू नका, हल्ली वर्षांला युग बदलते! जेव्हा काकाचं लग्न वन्नीशी झालं तेव्हा एकोणीसावं शतक होतं चाळिशीत अन् काका पंचविशीत!

ही वन्नी म्हणजे आजी. (आजोबांना सारे काकाजी म्हणायचे) तिचं लग्न होऊन ती सासरी आली आणि कुण्या लहान मुलानं तिला बोबडय़ा शब्दात वहिनीच्या ऐवजी वन्नी म्हटलं, तेव्हापासून तिचं नाव वन्नी पडलं! मग घरचे सगळेच तिला वन्नी म्हणायला लागले. काका वकील होते. राजकारणात होते. वाडय़ातली समोरची बैठक कायम पक्षकार, कार्यकर्त्यांनी गजबजलेली असायची. मुलं, मुली, नातेवाईकांचा गोतावळा वेगळाच. वन्नी सतत स्वयंपाकघरात आल्या-गेल्याचं पाहात.

काकांचा दिवस पहाटे पाचला सुरू व्हायचा. हातात चांदीची मूठ असलेली काठी घेऊन फिरायला जायचे. सकाळी सातपासून पक्षकार येऊन बसायचे. दहा वाजता अंघोळ, लगेच पान तयार असायचं. कोट घालून अकराच्या ठोक्याला कोर्टात जायचे. संध्याकाळी सहाला घरी. आठवडय़ातून तीन दिवस ते कोर्टाजवळूनच बस पकडून सतरा कि.मी. अंतरावरल्या शेतावर जायचे. परतायला रात्रीचे दहा. तोवर झोपेला आलेली वन्नी ताट झाकून वाट पाहात असायची. तिला दिवसभराची गाऱ्हाणी सांगावी वाटायची. मात्र काकांचं जेवण झाल्यानंतर उष्टंवाष्टं करून वन्नी काही बोलेपर्यंत काकांची पाठ अंथरुणाला! दिवसभराच्या कष्टानं ते झोपून जायचे.

कष्ट वन्नीही करीत होती. मात्र कष्टाचा निचरा होत नव्हता. तिचा काकांशी संवाद होत नव्हता. मनात उदंड वाद होते, त्यांचे बुडबुडे मनातच फुटत होते. काका दुर्लक्ष करीत असे नाही. क्वचित रविवारी दोघे नाटकाला जायचे. परगावी गेले तर एखादे पातळ आणायचे. मात्र त्यांना बोलायला वेळ नसायचा. क्षुल्लक प्रापंचिक वादांसाठी तर मुळीच नव्हता!

अशातच संसाराची सात-आठ वर्षे गेली. एके दिवशी वन्नी सकाळी उठल्या तोच एक पाय अतोनात दुखत असल्याची तक्रार घेऊन. गळ्यात पँटचे पट्टे अडकवणारे डॉक्टर काणे हे काकांचे फॅमिली डॉक्टर. त्यांनी जुजबी तपासण्या करून सायटिकचं निदान केलं, गोळ्या दिल्या. त्याने फारसा फरक पडला नसला तरी वन्नीला झोप लागली. आयुष्यात पहिल्यांदाच काका कोर्टात उशिरा गेले. आठ दिवस गेले तरी वन्नीच्या पायाला उतार पडेना. उलट तो बुध्यांपासून शेंडय़ापर्यंत दुखायला लागला. त्या आठ दिवसांत वन्नींचा घरकामाला हात लागला नाही. दोन पोरी आणि काकांच्या आश्रयाला आलेल्या दोन भाच्यांनी सारं घर सांभाळलं. डॉ. काणेचा उपचार चालू होता. काका उभ्या उभ्या वास्तपुस्त करीत, मात्र पक्षकार, कोर्ट, शेती यातून त्यांना वेळ काढणं अवघड होतं. वन्नींची पायदुखी कमी झाली नाही. उलट वरचेवर वाढत गेली. त्यांनी आता खाट धरली. रोज पहाटे स्नान करून केसात परसातल्या मोगरा माळणाऱ्या वन्नी चार-चार दिवस आंघोळ टाळू लागल्या. खाटेवर बसूनच जेवणं, खाटेवर पडूनच पायाच्या दुखण्याचा आल्या-गेल्याजवळ उच्चार करणं सुरू झालं. ‘पाय दुखतो हो माझा, अगं आई गं, कुणी तरी पाय कापून टाका रे!’ असं कण्हत कण्हत, घरोघरी भाजी विकणाऱ्या बाईसारखा लयबद्ध आवाजात ठरावीक अंतराने त्यांचा हा पुकारा चाले! महिना दोन महिने आप्त-नातेवाईकांकडून विचारपूस करण्यात गेला. प्रत्येकाने आपापल्या परीने पायदुखीच्या कारणांचा शोध आणि उपचारांची दिशा सांगण्याची संधी सोडली नाही. स्वयंपाकासाठी बाई होतीच. आश्रित भाच्या उरलेली घरकामे करू लागल्या. पोरांची शाळा विस्कळीत झाली. आईची पायदुखी, मोठय़ानं कण्हणं, अमृतांजन बामचा वास त्यांच्या अंगवळणी पडला.

तसा तो काकांच्याही अंगवळणी पडला. त्यांच्या व्यस्त जगात कुठलीही समस्या रेंगाळत पडलेली त्यांना आवडत नसे (त्यांनी वन्नीकडे दुर्लक्ष केलं असं नाही. फक्त वन्नीला जे पाहिजे ते त्यांच्याजवळ नव्हतं, ते म्हणजे जवळ बसण्यासाठी निवांत वेळ!). तारखा पुढे न ढकलणारे आणि अशिलाच्या हिताचे निर्णय तडकाफडकी घेणारे म्हणून ते कोर्टात लोकप्रिय होते. ते वन्नीजवळ पाय दाबत बसले नसतील, पण तिच्यावर उपचार करण्यात त्यांनी कुठलीही कसर सोडली नाही. कुणाच्या तरी सल्ल्यावरून मुंबईची वाट धरली. केईएमचे प्रसिद्ध डॉ. साठेंचा सल्ला घेतला. त्यांनी सगळ्या तपासण्या पुन्हा केल्या. गोळ्या लिहून दिल्या. मात्र वन्नीला बाहेर पाठवून त्यांनी काकांना सांगितलं, ‘‘यांच्या पायाला कुठलाही आजार झालेला नाहीये. यांचं दुखणं मानसिक वाटतं आहे. या दुखण्याला ‘सायकोसोमॅटिक’ म्हणजे मनो-शारीरिक दुखणं मानतात. तुमचं मन ज्या भावना व्यक्त करू शकत नाही, त्याचा निचरा करू शकत नाही, त्या मनाच्या वेदना शरीराची वाट शोधतात. तुम्ही मानसतज्ज्ञाचा सल्ला घ्या!’’

मात्र वन्नीला हा सल्ला पटला नाही. त्यांच्या खरोखरीच्या दुखण्याला मानसिक म्हणजे मनाचं म्हणणं अपमान वाटला! काकांनाही पायाच्या दुखण्याचा मनाशी संबंध कसा हे कळेना.

मनोशारीरिक विकार म्हणजे ‘सायकोसोमॅटिक डिसॉर्डर’. म्हणजे मनातील दडपलेल्या भावनांचं शारीर दुखण्यात झालेलं रूपांतर! असं म्हणतात की जेव्हा मन रडू शकत नाही, तेव्हा ते शरीराला रडायला लावतं. पोटाला रडायला लावतं, पाठीला रडायला लावतं, पायाला रडायला लावतं! मात्र पायाचं हे रडणं वन्नींच्या पचनी पडलं नाही, तसं काकांच्याही डोक्यावरनं गेलं.

वन्नीच्या पायाला उतार पडला नाही. वन्नीची हयात खाटेवर गेली, काकांची कोर्टात, शेतात, कष्टात. काकांची मुले आईच्या संस्काराविनाच मोठी झाली. त्यांची लग्नकार्ये आटोपली, मुली सासरी गेल्या, वन्नी खाटेवरच. घरी सुना आल्या. काकांनी आयुष्यात कधी खाट धरली नाही, वन्नीने आयुष्यभर कधी खाट सोडली नाही. वन्नी आणि काकांचं या दुखण्यानं बांधलेलं असं एक आंतरिक नातं होतं. आता वाटतं, तो काळ वेगळा होता. भावना क्वचितच व्यक्त व्हायच्या अन् आकांक्षा अतृप्त राहायच्या. मन:स्थितीच्या हुंकारापेक्षा परिस्थितीचा स्वीकार महत्त्वाचा होता. पुढे काका थकले. शेती विकली. एके दिवशी आयुष्यभर विश्रांती न मिळालेल्या हृदयाने विश्रांती घेतली, काका गेले. वन्नीच्या मनोविकाराने दोन पिढय़ा करपल्या. वन्नीला आपलं दुखणं अंगवळणी पडलं होतं. मात्र त्यांना वारंवार डॉक्टरांकडे नेणारं आता कुणी उरलं नव्हतं. वन्नीच्या तीस वर्षे वयाच्या दुखऱ्या पायाचं कुणाला कौतुक उरलं नव्हतं. स्वारस्य नव्हतं. असे मनोशारीरिक विकार हे भोवतालच्या सहानुभूतीवर तरारतात. फुलून येतात. ती आटली की नुसते धुमसत राहतात.

एके दिवशी वन्नीला पहाटेच जाग आली. तशी रात्रभर नीट झोप लागलीच नव्हती. अंधारात घडय़ाळ पहाटेचे साडेपाच टिकटकत होतं. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं एव्हाना पांढुरका उजेड पसरू लागला होता. वन्नी खाटेवरनं उठल्या. रजई दूर ढकलली. पायात सपाता सरकवल्या. हातात काकांची चांदीच्या मुठीची काठी घेतली. हलक्या हातानं कडी काढली. बाहेर पडल्या. अडखळत चालू लागल्या. शेजारची बेकरी, किराणा दुकान, कोपऱ्यावरची पानटपरी, नदीवरचा पूल, चालत चालत त्या बऱ्याच दूरवर आल्या. मग पहाट-वाऱ्यानं अचानक भानावर आल्या. परत फिरल्या. घरी सारं नि:स्तब्ध होतं.

त्या काकांच्या बैठकीत आल्या. समोर काकांचा हार घातलेला फोटो होता. त्यांनी तो सुकलेला हार काढून टाकला. धूळभरली फ्रेम पदराने पुसली. ती फ्रेम घेऊन खाट गाठली. मांडी घातली. चालण्याच्या श्रमाने पायाचा ठणका उठला. त्यांनी पाय सरळ केला आणि पहाटेच्या अनाथ शांततेत हाताने स्वत:चा पाय दाबत पुकारा सुरू केला, ‘पाय दुखतो हो माझा, अगं आई गं, कुणी तरी पाय कापून टाका रे!’

डॉ. नंदू मुलमुले nandu1957@yahoo.co.in

First Published on February 4, 2017 1:01 am

Web Title: psychosomatic disorders
  1. No Comments.